आत्महत्या करायला निघालेला हा तरुण आज १३०० लोकांचं पोट भरतोय !!

मंडळी, कालच व्ही जी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची बातमी आली. कर्जापायी त्यांनी आपला जीव दिला. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट पण आत्महत्येच्या संदर्भात आहे, पण या गोष्टीला हॅपी एंड मिळालाय.
बी. मुरुगन नावाचा एक तरुण बसने प्रवास करत होता. त्याने ठरवलं होतं की ही बस आपल्याला जिथे सोडेल तिथे जाऊन आपण आत्महत्या करायची. बसने त्याला कोईमतुरच्या सिरमुगई येथे सोडलं. ह्यावेळी त्याला हे माहित नव्हतं की इथून पुढे आपलं आयुष्य बदलणार आहे. आपण ठरवतो एक आणि होतं दुसरंच, असंच त्याच्या सोबत घडलं. तो रात्रीच्या २ वाजता एका फुटपाथवर बसला होता. त्यावेळी तिथे एक चप्पल दुरुस्त करणारा माणूस आला आणि त्याने मुरुगनला फुटपाथवर झोपायला जागा दिली. एवढंच नाही तर पांघरायला गोधडी पण दिली. त्यावेळी मुरुगनने आजूबाजूला पाहिलं. त्याच्यासारखेच अनेक बेघर लोक त्याच्या आजूबाजूला झोपले होते.
दुसऱ्या दिवशी फुटपाथवर राहणाऱ्याच एका स्त्रीने त्याला जेऊ घातलं. तो तिथेच राहू लागला. फुटपाथवर राहणारे लोक त्याचे कुटुंब झाले. हे होईपर्यंत त्याच्या मनातला आत्महत्येचा विचार कुठल्याकुठे पळून गेला होता आणि त्याच्या मनात एक नवीन ध्येय जन्मलं होतं. त्याने उरलेलं आयुष्य या लोकांना समर्पित करायचं ठरवलं होतं.
पुढे वाचण्यापूर्वी मुरुगनची बॅक स्टोरी वाचूया.

मुरुगन हा त्यावेळी १६ वर्षांचा होता. त्याच्या घरातली परिस्थिती चांगली नव्हती. त्याचे वडील दारुडे होते. ते त्याला पुस्तकांना हात लावू देत नसत. त्याची १० विची परीक्षा जवळ आली तेव्हा त्याने नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. तो पुस्तक घेऊन जास्तीतजास्त वेळ बाहेर राहत असे. त्याने खूप मेहनत घेतली पण तो दहावीत नापास झाला. निकाल हाती आल्यावर त्याच्यासमोर जगण्यासाठी कोणतंच कारण उरलं नव्हतं. त्याने चेन्नईच्या चुलैमेडू येथून बस पकडली. त्या बसने त्याला घरापासून ५०० किलोमीटर लांब आणून सोडलं. पुढे काय घडलं हे तुम्ही वाचलंच आहे. आता पुढची गोष्ट वाचू.

मंडळी, नवीन ध्येय मिळाल्यावर त्याने मिळेल ती कामं केली. पेपर टाकणे, लॉटरीची तिकिटे विकणे, वेटरचं काम करणे, कुरियर पोचवणे, ट्रक चालवणे, एक ना दोन.. त्याच्याकडे पैसे जमा झाल्यावर त्याने एक घर भाड्याने घेतलं. तोवर त्याच्याकडे नोकरी होती आणि पैसेही होते. त्याने पुन्हा आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं. एकदा त्याने ३०० रुपयांचे तांदूळ आणले आणि मित्रांसोबत भात शिजवला. त्यादिवशी त्याने पहिल्यांदा २५ लोकांना खाऊ घातलं होतं. यानंतर हे नेहमीचं काम झालं. तो आलेल्या पगारातून गरिबांसाठी जेवण उपलब्ध करून द्यायचा.

सगळं काही सुरळीत असताना एक नवीन संकट आलं. त्याला काम देणारी कंपनी बंद पडली. पडेल ती कामं करायला तो सरावला होताच. त्याने ड्रायव्हींग लायसेन्स मिळवलं आणि रिक्षा चालवायला घेतली. दर महिन्याला त्याला ३००० रुपये मिळायचे. पगारातला मोठा वाटा हा स्वयंपाकासाठीची सामुग्री घेण्यात खर्च व्हायचा. मुरुगनचं काम बघून इतर लोकसुद्धा पुढे आले. त्यांनी प्रत्येकी १०० रुपये गोळा करून त्याला मदत केली. २००८ साली मुरुगनने ‘निझाल मलयम’ नावाची संस्था सुरु केली. ‘निझाल मलयम’चा अर्थ होतो “बेघरांना आसरा’.

संस्थेत आज ५० जण आहेत. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. सगळेच आठवडाभर काम करतात. पैसे मिळवतात. रविवारी या पैशातून जवळजवळ १३०० लोकांना पोटभर अन्न दिलं जातं. मुरुगनने आपल्या ३००० च्या पगारापासून सुरुवात केलेली ही चळवळ आता २०,००० पर्यंत पोचली आहे. मुरुगन स्वतः आजही रिक्षा-टॅक्सी चालवून पैसे कमावतो. ३० पेक्षा जास्त वर्षांच्या या प्रवासात त्याला मिळालेल्या माणसांनी देखील त्याची मदत केली. त्याच्या संस्थेत काम करणारा एकजण आजही संस्थेसाठी दर महिन्याला पैसे पाठवतो.

तुम्हालाही या संस्थेला मदत करायची असेल तर 'निझाल मलयम'च्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या. तुमचे १०० रुपये पण एखाद्यासाठी फार मोलाचे ठरू शकतात.
तर मंडळी, कधी निराश झालात तर बी मुरुगनच्या गोष्टीला नक्की लक्षात ठेवा