computer

'फूड चेन' : आजच्या पहिल्या लेखात वाचा 'डॉमिनोज पिझ्झा'च्या जन्माची गोष्ट !!!

“जानु, मला भूक लागली”

असे गर्लफ्रेंडने म्हटल्याबरोबर बॉयफ्रेंडच्या डोक्यात एकच विचार येतो…

“झालं! आता हजार पाचशे रुपयांना चुना लागणार!”

मंडळी, गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी एवढं तर करावंच लागतं म्हणा… आणि अश्या वेळी भुकेल्या शोना, पिल्लू, बेबीला तुम्ही ‘बजरंगबली शुद्ध शाकाहारी खानावळ’ किंवा ‘हॉटेल रामप्यारे’ सारख्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. कारण, इट्स सो डाऊनमार्केट यु नो! मग आहेतच डॉमिनोज, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड सारखे हाय फाय फास्ट फूड चेन्स! अश्या वेळी तुमच्या मनात हटकून विचार येतो, किमान माझ्या तरी येतो… या फूड चेन्स का आल्या असतील? कुठून आल्या असतील? तर एकदा असाच हजार रुपयांचा फटका बसल्यावर मात्र याच्या मुळाशी जाण्याची मी चंग बांधला. जरा शोधाशोध केली आणि या फूड चेन्सची माहिती गोळा केली. आज तीच माहिती घेऊन तुमच्यासमोर आलोय…

आज या मालिकेतला पहिला लेख वाचूया.

सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या ओळखीच्या डॉमिनोज पासून. ही एक अमेरिकन पिझ्झा कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील मिशिगन येथे आहे आणि विक्रीच्या दृष्टीने डॉमिनोज आजघडीला जगातील सर्वात मोठी फूड चेन म्हणून ओळखली जाते. आता बघूया या कंपनीचा इतिहास… 

डोमिनिक नावाच्या व्यक्तीने मिशिगन येथे आपली पिझ्झा बेकरी सुरू केली होती. काही कारणाने त्याने ती बेकरी टॉम आणि जेम्स या भावंडांना 1960 साली पाचशे डॉलर्स मध्ये विकली. थोड्या अवधीत या एका दुकानाच्या आधारावर भांडवल गोळा करून टॉम आणि जेम्सने आणखी दोन रेस्टॉरंट त्याच शहरात सुरू केले. तीन दुकाने झाल्यावर त्यांनी आपल्या फूड चेन चे नाव डॉमिनिक पिझ्झा असे ठेवायचे ठरवले, मात्र मूळ मालकाने स्वतःचे नाव वापरण्यास विरोध केला. शेवटी फक्त डॉमिनोज पिझ्झा इतकेच नाव ठेवून या कंपनीची वाटचाल सुरू झाली.
 

1967 पासून डॉमिनोजने आपली फ्रांचायजी देण्यास सुरुवात केली आणि बघता बघता दहा वर्षात 200 डोमिनोज पिझ्झा वेगवेगळ्या शहरात सुरू झाले. 1983 मध्ये प्रथमच अमेरिका सोडून बाहेरील देशात, कॅनडा येथे फ्रांचायजी दिली गेली आणि हळू हळू डॉमिनोज पिझ्झा कंपनी जगभरात पसरण्यास सुरुवात झाली. 1995 पर्यंत 1000 इंटरनॅशनल लोकेशन्स वर डॉमिनोजची पाटी झळकू लागली होती. 2014 पर्यंत ही संख्या 6000 इतकी झाली. आज या कंपनीचा विस्तार जगातील पाच खंडात आणि 84 देशात आहे. एकूण 15000 पेक्षा जास्त स्टोअर्स असून यातील सर्वाधिक स्टोअर्स अमेरिकेत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. भारतात हजार पेक्षा जास्त ठिकाणी डॉमिनोज पिझ्झा स्टोअर्स उभे आहेत. 

गमतीची गोष्ट अशी की जगभर यशस्वी व्यवसाय करूनही आजपर्यंत या कंपनीला चीन मध्ये जम बसवता आला नाही. यामागे चिनी ट्रॅफिक आणि काट्या चमच्याने न खाता स्टिक्सने खाण्याची संस्कृती अशी कारणे आहेत. 

 

तर मंडळी, कसा वाटला हा पहिला लेख ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required