हा पाकिस्तानी उबर ड्राईव्हर का देतोय भारतीयांना मोफत सेवा?

भारत आणि पाकिस्तानमधलं भांडण पाहायचं असेल तर भारत-पाक क्रिकेट मॅच पाहावी आणि प्रेम पाहायचं असेल तर कोक स्टुडिओच्या व्हिडीओखालच्या कमेंट्स पाहाव्यात.  काही असो, आपल्या दोन देशांत राजकीय पातळीवर वाद असला तरी सामान्य पातळीवर हा वाद दिसत नाही. हे वेळोवेळी सिद्ध करणारे अनेक किस्से घडत असतात. नुकताच असाच एक किस्सा घडलाय. 

नुकतंच प्रभदीप सिंग हा पाकिस्तानात गेला होता. त्याने परतल्यावर ट्विटरद्वारे तिथले अनुभव सांगितले. तो म्हणतो की भारत आणि पाकिस्तानात तसा फारसा फरक नाही. तिथली बोलीभाषा, खाण्यापिण्याच्या पद्धती या भारतासारख्याच आहेत. पुढे त्याने एक किस्सा सांगितला.

तो पाकिस्तानच्या लाहोरपासून वाघा बॉर्डरपर्यंत उबरने येत होता. वाघा बॉर्डरवर सोडल्यानंतर ड्राईव्हर अहमदने त्याच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. कारण विचारल्यावर तो म्हणाला, की ‘तुम्ही एक भारतीय आहात आणि पाकिस्तानचे ‘मेहमान’ आहात, मी भारतीयांकडून पैसे घेत नाही.’ प्रभदीपने वाघा बॉर्डर ओलांडेपर्यंत अहमद तिथेच उभा होता. 

मंडळी, प्रभदीप म्हणतो की हा माझ्या आयुष्यातला हा सर्वात चांगला उबर प्रवास होता. अहमद प्रभदीपशी दोन्ही देशातल्या प्रेम-बंधुत्वाच्या नात्याबद्दल बोलला. त्याच्या स्वतःच्या वागण्यातूनही त्याचे विचार दिसतात. हा किस्सा वाचून ट्विटरवर लोकांनी अहमदचं भरभरून कौतुक केलंय. 

गेल्यावर्षी स्वरा भास्करनेसुद्धा तिच्या लाहोरच्या अनुभवाबद्दल असंच काहीसं लिहिलं होतं. 

दोन्ही देशात असलेल्या तणावातही समान्य लोक कसा पुढारलेला विचार करतात याचं हे उत्तम उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required