२०१८मध्ये कोणत्या रंगाची चलती असणार आहे?? 

तुम्हांला माहित असेलच, दर वर्षी फॅशन इंडस्ट्री एका नव्या रंगाला प्राधान्य देते. आता २०१७ तर जवळजवळ संपल्यातच जमा आहे. म्हणजे २०१८च्या तयारीला लागायला हवं ना?

रंगांच्या बाबतीत बोलायचं तर, स्त्रियांना हजारो रंग वेगवेगळे दिसतील. पण पुरूषांना ठळक तेवढे पाच-सहाच!! होय ना? पटत नसेल तर एखाद्या मॅचिंगच्या दुकानात जा, पटकन खात्री पटेल. पुरूषांच्या मते "थोडं उन्नीस-बीस चालतं", पण बायकांना त्यांच्या चटणी, आमसुली ते अगदी कांदा, मेहंदी रंगांच्या शेडस अगदी नेमक्या हव्या असतात. 

साध्या मॅचिंगच्या बाबतीत लोक इतके कट्टर असतील, तर फॅशन जगताबद्दल तर काही बोलायलाच नको. इथे तर दरवर्षी एका नव्या रंगाची चलती असते. कोण ठरवतं पण हा रंग?  त्याला  इतकं महत्त्व का आहे? हे प्रकरण कधीपासून चालू झालं आणि इतकं सगळं असेल,  तर येत्या वर्षीचा रंग कोणता आहे?? 


अरे हो, हो, हो.. तुमच्या प्रश्नांची पंजाब मेल काही स्टॉपच घ्यायला तयार नाहीय हो.. वाचा तर मग..


तर असं आहे मंडळी, की प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र असतं. पण  ते फक्त रंग आणि भावना इथपर्यंत मर्यादित नाही बरं. तर मॅचिंग, काँट्रास्ट मॅचिंग, मूड, प्रसंग, व्यक्ती किती महत्त्वाची आहे, एकाच रंगाची खूप उधळण नको आणि खूप रंग वापरून पंचरंगी पोपट नको, ऋतू म्हणजे आपले फॅशन सीझन, कपड्यांचे पोत, वेगळेपणा उठून दिसणं असे बरेच नियम वापरून डिझायनर्स त्यांच्या ग्राहकांना योग्य ते रंग सुचवत असतात. त्यामुळं होतं काय, की या फॅशन आणि रंगांबाबत खूप माहिती नसलेल्या लोकांना पण हे शास्त्र समजायला थोडी मदत होते आणि का-कसं-असं केलं तर-पण पाहा, तसं केलं तर काय/ अशा प्रश्नांची उत्तरं २१ अपेक्षितसारखी तयार मिळतात. ते जाऊ दे, ज्यांना यातली काहीच अक्कल नसते, त्यांना पण इतरांसमोर फुशारक्या मारायला बरंच काही रेडिमेड मिळतं. 

पँटाँन ही  १९५० मध्ये चालू झालेली अमेरिकेतल्या न्यूजर्सीतली एक कंपनी आहे. त्यांनी रंगांसाठी पँटाँन कलर सिस्टीम तयार केलीय. रंगांच्या बाबतीत त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो आणि बरेचसे उद्योगधंदे या रंगांच्या बाबतीतल्या पँटाँनच्या शिफारसींचा वापर करतात. त्यात मग   कापडउद्योग, प्रिंटिंग व्यवसाय, घरांना आणि इमारतींना लावायचे रंग, प्लास्टिक, मेकअप वगैरे उद्योग तर सगळ्यात आधी येतात. 

पँटाँनने त्यांचा 'कलर ऑफ द इअर' प्रोजेक्ट चालू केला २०००मध्ये. अर्थात तो अजूनही चालू आहेच. तर यावर्षी त्यांनी निवडलेल्या रंगाचं नांव आहे अल्ट्रा व्हायोलेट.. म्हणजेच शुद्ध मराठीत  गडद जांभळा, हो ना?
 

पाहा मग यावर्षी या रंगाच्या नक्की कोणत्या प्रयोगांना तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही सामावून घेऊ शकता ते...

१. जम्प सूट

स्रोत

२. क्रॉप टॉप आणि स्कर्ट

स्रोत

क्रॉप टॉप आणि स्कर्ट हा प्रकार तर निळ्या रंगाच्या या शेडला खास न्याय देतो.

 

३. बनारसी ब्रोकेड

स्रोत

 बनारसी ब्रोकेडमध्ये तुम्ही प्लेन स्ट्रेट पँट, पलाझो किंवा ब्रोकेड स्कर्ट.. यातलं काहीही घाला, सुंदरच दिसेल..

 

४. पंजाबी ड्रेस... 

 

स्रोत

पंजाबी ड्रेस... कधीही आऊट ऑफ फॅशन न होणारा प्रकार. कॉटनचा ड्रेस घातलात तर डेलीवेअर म्हणून आणि सिल्कचा घेतलात तर खास प्रसंगी म्हणून कधीही बिन्धास्त घालू शकता..

 

५. वन पीस ड्रेस

 

स्रोत

लेस, चिकनकारी, कॉटन किंवा सिल्क.. कोणताही पर्याय मस्तच वाटेल.. एकदा ट्राय करुन पाहाच.

 

६. बनारसी साडी

स्रोत

मुळात साडी हाच ऑल टाईम हिट प्रकार आहे. बनारसी साडी असेल तर मग सोने पे सुहागा..

 

७. साडी 

स्रोत

प्लेन साडी आणि कशिदाकारी केलेले ब्लाऊजसुद्धा या रंगात उठून दिसेल.. 

 

मग, काय विचार आहे? आम्हांलाही सांगा या रंगात तुम्ही कायकाय प्रयोग करणार ते..

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required