कॅलिफोर्नियाची लेक झाली हरियाणाची सून...वाचा पुढे!!
मंडळी तुम्ही ‘सत्ते पे सत्ता’ हा अमिताभ बच्चनचा सिनेमा पहिला असेलच. त्यात एक गाणं होतं, ‘प्यार हमे किस मोड पे ले आया!’. या ओळींना शोभेल अशी एक घटना घडलीय. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या ४१ वर्षांची नाइट क्लब पार्टी गर्ल ‘अॅड्रीयाना पेरल’ हिने अमेरिका सोडून आपल्या प्रेमाखातर भारतातल्या एका गावात राहण्याचं ठरवलं आहे आणि तेही अगदी भारतीय गृहिणीसारखं.


पूर्वी अणि आता

मुकेश कुमार या हरियाणातल्या पानिपतमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीच्या तरुणाशी अड्रीयाना पेरलची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण लग्नाचा विचार करताना तिने थोडा वेळ घेतला आणि मुकेशला आपला होकार कळवला. नोव्हेंबर २०१३ साली त्यांचं हिंदू पद्धतीने लग्न झालं आणि अॅड्रीयाना नववधू प्रमाणे सासरी राहायला सुद्धा आली.

एका भारतीय गृहिणीसारखीच तीसुद्धा आता घरकाम करत आहे. झाडू मारणे, कपडे धुणे, घरच्यांसाठी स्वयंपाक करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणे अशी खेड्यातली कामं ती आता करत आहे. आश्चर्य म्हणजे कॅलिफोर्नियात जिमला जाणारी आणि पार्टीजमध्ये रमणारी करणारी अड्रीयाना या गावाच्या माहौलमध्ये चांगलीच रुळली आहे. ती म्हणते की मी यापेक्षा आनंदी केव्हाच नव्हते.

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तिने मुकेश बरोबर लग्न करण्याचा आणि भारतात स्थायिक होण्याचा निर्णय ३ आठवड्यांत घेतला. आपला हा विचार घरच्यांना ऐकवल्यानंतर ते चिंताग्रस्त झाले. त्यांच्या मते भारत हे सुरक्षित ठिकाण नव्हतं. तिला २५ वर्षांची मुलगी आहे. तीसुद्धा आईच्या काळजीने रडू लागली. काहींनी मुकेश हा धोकेबाज असल्याचं म्हटलं पण अड्रीयानाने तरीही भारतात यायचं पसंत केलं.

अॅड्रीयाना गावात आल्यानंतर सुरुवातीला तिला अडचण आली. अर्थातच या लहानश्या गावात घरात बाथरूम नव्हतं. स्त्रियांवर तिथे काही निर्बंधही आहेत. बाईने पूर्ण अंग झाकून राहावं लागतं, घरची सगळी कामं करावीत, वगैरे. हे सगळे नियम तिला आता अंगवळणी पडले आहेत. ती म्हणते की आनंदी राहण्यासाठी शॉवर किंवा बाथरूमची गरज लागत नाही.

जिथले लोकच नाही.. तर धर्म, भाषा, रीतीरिवाज सर्व निराळे आहेत अशा एका देशात येऊन कायमचं राहणं ही खऱ्या प्रेमाची निशाणी आहे असंच म्हणावं लागेल.




