'सब के साथ सब का फायदा' - पेटीएम चे कर्मचारी झाले करोडपती !!!

वन९७ कम्युनिकेशन्स या कंपनीचं नाव आपल्या फारसं परिचयाचं नसेल. पण " पेटीएम " तर सर्वांच्या ओळखीचं आहे. वन९७ कम्युनिकेशन्स ही कंपनी पेटीएमची मालक आहे. पेटीएम हे वन९७ कम्युनिकेशन्सचंच प्रॉडक्ट आहे.  या कंपनीत एकूण चार हजार लोक काम करतात आणि त्यांतल्या ५०० कर्मचार्‍यांकडे कंपनीचे ४ % टक्के शेअर आहेत.

इसॉपच्या योजने अंतर्गत हे शेअर्स कर्मचार्‍यांना मिळाले आहेत. गंमत म्हणजे  कंपनीचे संस्थापक विजय शेखर हे पण इसॉपचे लाभार्थी आहेत. मात्र गेल्या वर्षभरात कर्मचार्‍यांनी आपले शेअर कंपनीतल्या इतरांना आणि बाहेरच्या गुंतवणूकदारांना विकायला सुरुवात केलीय. आणि ......गेल्या काही सप्ताहात ४७ कर्मचार्‍यांनी असे शेअर्स विकून एकूण १०० कोटी रुपये खिशात टाकले आहेत, आहात कुठे ? पण, वन९७ कम्युनिकेशन्सचे शेअर बाजारात अजून लिस्टींग झाले नाहीत.  हे शेअर्स अधिकृतपणे बाजारात आले नाहीत, तर मग हे इसॉपमध्ये मिळालेले शेअर्स कोण बरं विकत घेत असेल?

तर हे शेअर्स लिस्टींग होण्याआधीच विकत घेऊन ठेवणारे काही श्रीमंत लोक असतात, ज्यांना बाजाराच्या भाषेत  "हाय नेटवर्थ इन्डिव्हीज्युअल " म्हटले जाते ते,  किंवा अनेक गुंतवणूक करणार्‍या कंपन्या असे शेअर्स विकत घेतात. उदाहरणार्थ अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलने सुरुवातीच्या काळात हे शेअर घेऊन विकले, तेव्हा त्यांना २७ पट नफा झाला होता. तर त्याच वेळी सामा कॅपिटलने जे शेअर्स विकले होते, त्यांना मूळ गुंतवणूकीच्या ५२ पट पैसे मिळाले होते. गेल्या वर्षी पेटीएममध्ये  गुगल -उबरचे अमित सिंघल, व्हॉट्सॅपचे नीरज अरोरा आणि फेसबुकची पहिली महिला इंजिनिअर रुची संघवी यांनी पैसे गुंतवले होते. अशा गुंतवणूका बरेचदा फायद्याच्या ठरतात.

असे इसॉप अंतर्गत मिळालेले शेअर्स कर्मचार्‍यांना अचानक कोट्याधीश करू शकतात.  उदाहरणार्थ, सिट्रस पेमेंट कंपनी जेव्हा Pay You या कंपनीने टेकओव्हर केली, तेव्हा कंपनीत आठ हजार पगारावर काम करणार्‍या एका प्यूनला त्याच्या इसॉपचे शेअर विकल्यावर  ५० लाख रुपये मिळाले होते.

यालाच आपण " सब के साथ सब का फायदा" असे ही म्हणू शकतो नाही का ?

सबस्क्राईब करा

* indicates required