computer

#MeToo या लंपटांना धडा शिकवू या!!

काही दिवसांपासून एक कॅम्पेन सोशल मिडीयावर पसरू लागलं आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. मग हा अत्याचार प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. या सर्वांचा आवाज दाबला जातो किंवा त्यांना त्यांच्या जवळ गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. याच आवाजाला वाचा फोडण्यासाठी हा कॅम्पेन सोशल मिडीयावर पसरत आहे. ऍलिसा मिलानो अभिनेत्रीनं #MeToo  हा ट्रेंड चालू केलाय.

जवळजवळ प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली असते. तुमच्या ओळखीच्या आणि कोणत्याही वयाच्या स्त्रीला विचारा, ती सांगेल तिला  कोणकोणत्या घटनांना तोंड द्यावं लागतं ते.. अश्लील शेरेबाजी, अश्लील खाणाखुणा, मेसेजेस, गर्दीचा फायदा घेऊन नको तिथं हात लावणं, नको ते अवयव चिवळणं, सार्वजनिक वाहनात मुद्दाम हाताची घडी घालून स्त्री बसलेल्या बाजूला आपल्या दंडाआड लपलेली बोटं लांब करून तिचे उरोज दाबणं, फोनवर बोलतोय असं दाखवून तिच्या बाजूनं चालत नाही नाही ते ऐकवणं, भाजी घेताना वरून किंवा जिन्यावरून उतरणाऱ्या बायकांचे खालून फोटो काढणं.. यादी अनंत आहे हो.. 

आता हा ट्रेंड सुरू झाल्यापासून आपल्या भारतीय बायका फक्त आवाहन कॉपी पेस्ट करून #MeToo लिहित आहेत. त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची चाड नाहीय असं नाही पण कदाचित त्यांना पब्लिकली नक्की काय झालं होतं ते लिहायचं नाहीय. 

हे लैंगिक अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात असं नाहीय. कित्येक पुरुषही याला बळी पडले आहेत. बरं, आपल्या फ्रेंड्स लिष्टीतल्या जवळजवळ झाडून सगळ्या बायका #MeToo लिहायला लागल्यावर पुरुष मंडळ काळजीनं हैराण झालंय. त्यामुळं पाठींबा म्हणूनही यात पुरुषांनीही सहभाग दाखवला आहे. आता बरेचजण आणि जणी असे  विनयभंग करणारे पुरुष शोधून रिपोर्ट करत आहेत. हा लेख वाचेपर्यंत यातले काहीजण ब्लॉक झाले असतील किंवा सरकारी जावई बनून लॉकअपमध्ये पण गेलेले असतील.. 


हे पाहा काही लिंगपिसाट लोक आणि ते काय काय करतात.. हे इतके निर्लज्ज आहेत की आपल्या विकृत कामांचे फोटोज आणि व्हिडीओज पण त्यांनी सोशल मीडियावर टाकायला कमी केलं नाहीय.. या प्रोफाईलमधली नांवं आणि इतर महिती खोटी असू शकेल. पण त्यामागची प्रवृत्ती खरी आहे.   आम्ही यांचे प्रोफाईल रिपोर्ट केले आहेत.. तुम्हीही कराल अशी आशा आहे. 
 

विनय नायर

हा मुद्दा ताजा असतानाच मुंबईतील एक किळसवाणी घटना समोर आली. ‘v8nair’ असे नाव असलेल्या एका विकृत माणसाने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर बॅकलेस ब्लाऊज घातलेल्या महिलांचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. यात तो त्यांच्या नकळत त्यांना स्पर्श करतोय. यात दिसणाऱ्या महिलांना हा प्रकार होत असल्याचं माहित देखील नाही.

अशा विकृत मनस्थिती असलेल्या माणसाला धडा शिकवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणारे अनेक आहेत हे त्याचे फॉलोवर्सकडे बघून दिसतं. तब्बल दीड हजार लोकांनी त्याला फॉलो केलं आहे. या माणसाचं नाव विनय नायर असून त्याने १०० महिलांना स्पर्श करण्याचं टार्गेट ठेवून हे व्हिडीओ बनवले आहेत. यात बळी पडलेल्या महिलांची संख्या ६३ आहे. आणि हे आत्ताचं नाही बरं का !! २०१५ पासून त्याने असले व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आहे.

अंगद गुम्माराजू याने फेसबुक वरून या माणसाला सर्वांसमोर आणलं. अंगद इंस्टाग्रामवर  काही ब्लाउज डिझाईन्स शोधत होता तेव्हा त्याला v8nair ही प्रोफाईल दिसली. त्याने अकाउंट तपासून बघितल्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

२०१५ पासून हा प्रकार घडत असताना या विरुद्ध कोणी काही बोललं का नाही ? हा एक प्रश्न पडतोच. अश्या विकृत लोकांना वेळीच शिक्षा झाली नाही तर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते. हे त्याचं ताजं उदाहरण !!

राज यादव

 हे दुसरं  प्रोफाईल आहे कुणा राज यादवचं. रस्त्यावरून फिरणाऱ्या स्त्रियांच्या पाठींचे फोटो काढणं, त्यांना हात लावणं.. इतकंच काय, ब्लाऊजमध्ये बोटं घालणं असले उद्योग ही व्यक्ती करते. बरं, असं करणारा हा एकटाच नाहीय. असे कितीजणींचे नकळत फोटो आणि व्हिडिओ अशा लोकांनी काढले असतील आणि गर्दीचा फायदा घेऊन स्त्रियांचे विनयभंग केले असतील कोण जाणे..

हा पाहा त्याच्या अनेक व्हिडिओंपैकी एक फोटो..

 

सम्राट पाटील

सम्राट पाटील असं नांव धारण करणारा आणि फेसबुकवर पुण्याचा आहे असं लिहिणारा हा मनुष्य फक्त स्त्रियांचे  फक्त पाठमोरे फोटोज टाकतो असं नाही, तर त्यांचे लेगिंग्ज वगैरेमधले फोटो पण सोशल मिडियावर शेअर करतो. 

असं करणं त्या स्त्रियांचा अवमान आहे, त्यांच्या प्रायव्हसीचाही भंग आहे. हे फक्त काही प्रोफाईल्स आहेत. याहूनही बरेच लोक वेगवेगळ्या अकांऊट्समधून हा विखार सगळीकडे पसरवत आहेत. 
आपण  असं काही दिसल्यास फक्त मौन न बाळगता किमान अशा पोस्ट्स आणि प्रोफाईल रिपोर्ट करण्याचं काम तर नक्कीच करू शकतो. आणि आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही हे ही पाह्यला हवंच..
 

 (सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा
 

सबस्क्राईब करा

* indicates required