'जेफ बेझोस'कडे लोक का करत आहेत मोनालिसा विकत घेऊन खाण्याची मागणी?

जेफ बेझोस हे नाव आज कोणाला माहीत नसेल? जगातला सर्वात श्रीमंत माणूस. ॲमेझॉन कंपनीचा सर्वेसर्वा. या सर्वात श्रीमंत व्यक्तीसाठी तितके विचित्र काम करण्याचे आवाहन एका याचिकेद्वारे करण्यात आले आहे. ही ऑनलाईन याचिका इतकी ट्रेंडिंग झाली आहे की आतापर्यंत हजारोंच्या संख्येत त्याच्यावर सह्या होत आहेत. त्यावर अनेक गंमतीदार टिप्पण्याही येत आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण बघूया.

चेंज डॉट ऑर्गच्या वेबसाइटवर अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना लोकांनी मोनालिसा.. हो, तीच ती लेओनार्डो दा विन्सीची प्रसिद्ध मोनालिसा, तिचे चित्र विकत घेण्याचे आणि ते खाण्याचे आवाहन केले आहे. हे विचित्र आवाहन करण्याचे कारण असे म्हणतात की ज्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे त्याला कोणती गोष्ट अशक्य आहे? मग जगातले सर्वात महागडे चित्र विकत घेऊन तेही खा अश्या आशयाची याचिकाच करण्यात आली आहे.

Change.org pition

ही ऑनलाइन खुली याचिका चेंज डॉट ऑर्गच्या वेबसाइटवर कोणीतरी केली आहे. ही वेबसाईट विधायक याचिकांसाठी चालू झाली असली तरी नंतर ती अशा विचित्र आणि गंमतीदार याचिकांसाठीच प्रसिद्ध झाली आहे आणि विशेष म्हणजे ही याचिका एक वर्षापूर्वी दाखल झाली आहे, परंतु गुरुवारी पुन्हा एकदा हा ट्रेंड आला आणि १०००हून अधिक लोकांनी त्यावर स्वाक्षरी केली. शुक्रवारीही ४४८लोकांनी या याचिकेवर सही केली आणि अजूनही सह्या होणं चालू आहेच.

कोट्यावधी मालमत्तांचा मालक असलेले बेझोस २० जुलैला अंतराळात जाणार आहेत. ते स्वत: ची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनच्या पहिल्या क्रू फ्लाइटमधून ११ मिनिटांच्या अंतराळ प्रवासासाठी जाणार आहेत. त्यावरही कोणीतरी एक गंमतीदार याचिका केली होती की बेझोसना अंतराळातून पृथ्वीवर येऊ देण्यात येऊ नये.

बेझोस अशा बर्‍याच गोष्टी करत आहेत, जे बहुदा इतर कोणीही करू शकत नाही. हेच कारण आहे की लोक आता त्यांच्याकडून या विचित्र मागण्या करीत आहेत, कारण जे कोणी हे करू शकत नाही ते बेझोस करू शकतात. मोनालिसा हे १६व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक जग प्रसिद्ध तैलचित्र आहे. पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र फ्रेंच सरकारने प्रदर्शनासाठी ठेवले आहे. मोनालिसा तिच्या गूढ स्मितहास्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडे फ्रान्सची आर्थिक परिस्थिती खालावली तेव्हा हे पेंटिंग विकून कर्ज फेडण्याचीही मागणी करण्यात आली होती. या पेंटिंगची किंमत अब्ज डॉलर आहे. त्यामुळे हे फक्त बेझोसच विकत घेऊ शकतात. असं लोकांचं म्हणणे आहे.

अश्या विचित्र याचिकेवर अनेकांच्या कमेंट ही गंमतीदार आहेत. 'बेझोस हे ​​बलिदान समाजासाठी द्या', ', जेफ, आपण समाजासाठी हा यज्ञ करावा अशी आमची इच्छा आहे' अशी भरपूर चर्चा चालू आहे. आतापर्यंत जेफ बेझोस यांनी या याचिकेवर प्रतिक्रिया दिली नाही. बेझोस यावर काही बोलतात का हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.

 

लेखिका:  शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required