computer

हम दिल दे चुके सनम : कोणत्या सत्यकथेवर आधारीत चित्रपट आहे हा ?

हम दिल दे चुके सनम!!  ८०-९० च्या दशकात जन्माला आलेल्या अख्ख्या एका पिढीला वेड लावणारा सिनेमा. 
संजय लीला भन्साळीचे डायरेक्शन, तगडी स्टारकास्ट, इस्माईल दरबारचे म्युझिक, जबरदस्त गाणी असा एकसे बढकर एक कॉकटेल झाल्यावर 'हम दिल दे चुके सनम'चा हँगओव्हर आजही उतरलेला नाही.सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कायच्या काय भन्नाट असणारी स्टोरी!! ही कहाणी अनेकांच्या मनात कालवाकालव करणारी ठरली होती.
आता तुम्ही म्हणाल तुमचे सर्व खरे आहे पण आम्हाला हे सर्व माहीत असताना परत का सांगताय?

तर या सिनेमाच्या कहाणीमागील जी सत्य कहाणी आहे ना ती यापेक्षा भन्नाट आहे. संजय लीला भन्साळी तसा अवलिया माणूस त्याने ही कहाणी उचलून जन्माला आला हम दिल दे चुके सनम!!अशा साहित्यिक किंवा वाङ्मयीन निर्मितीची चोरीला इंग्रजीत Plagiarism हा शब्द वापरला जातो. भारतात  Plagiarismचा धंदा फार जोरात चालतो. सोप्या शब्दात साहित्यिक चोरी म्हणजे पुस्तकांची, साहित्यकृतींची कॉपी करणे. संजय लीला भन्साळीचे नशीब , त्याने केलेल्या चोरीवर कोणीच तक्रार केली नाही  आक्षेप घेतला नाही आणि कोणीही न्यायालयाकडे दाद मागितली नाही.,
चला तर आज वाचू पडद्यामागची सत्यकथा या चित्रपटाची !

बंगालमध्ये एक एक थोर तत्वज्ञानी होऊन गेले सुरेंद्रनाथ दासगुप्ता. त्यांना एक अत्यंत हुशार मुलगी होती,मैत्रेयी तीचे नाव.या मुलीचा वयाच्या १६ व्या वर्षी कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता, आणि याला प्रास्ताविक होते, रविंद्रनाथ टागोर यांचे !
मैत्रेयीदेवी जेव्हा कॉलेजला जात होती, त्याच काळात तिच्या वडिलांनी एक रोमानियन स्कॉलर तरुण मर्सिया एलीएड याला त्यांच्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले. एकाच घरात राहत असल्याने मैत्रेयी देवी आणि एलीएड या दोन्ही अत्यंत हुशार जीवांचे एकमेकांवर प्रेम जडायला वेळ लागला नाही. आता एकाच घरात राहून फुलणारे प्रेम जास्त दिवस लपून राहणारे नव्हते.
दासगुप्ता साहेबांनी २३ वर्षीय एलीएडला त्यांचे घर सोडून जाण्यास सांगितले. तो निघून गेला आणि इकडे २० वर्षीय मैत्रेयीदेवीचे लग्न ३४ वर्षीय डॉ. मनमोहन सेन यांच्यासोबत लावून देण्यात आले.

एलीएड आणि मैत्रेयीदेवी यांच्या कहाणीचा हा इंटर्वल काळ म्हणावा असा होता. कारण १९७२ साली मैत्रेयी देवी यांना समजले की एलीएडने बेंगाल नाईटस् नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने या दोघांचे लैंगिक सबंध चवीने लिहिले होते.खरं तर बेंगाल नाईटस हे इंग्रजी भाषांतर होते. त्याने १९३३ साली रोमानियन भाषेत ला न्युट बंगाली नावाची कादंबरी लिहिली होती. या कादंबरीचे मूळ नाव हे देखील मैत्रेयी असे होते. पुढे ही कादंबरी इटालियन, जर्मन, स्पॅनिश अशा अनेक भाषांत प्रकाशित झाली. सर्वात गाजेलेले भाषांतर हे फ्रेंचमधील होते.

यावेळी मैत्रेयी देवी यांचे वय ५८ होते. त्या काळात त्यांनी एक कवितासंग्रह प्रकाशित केला. या कविता म्हणजे त्यांची इतक्या दिवसानंतर या गोष्टी निघाल्यावर बाहेर पडलेली अस्वस्थता व्यक्त करणाऱ्या होत्या असेही म्हणण्यात आले. याच काळात मैत्रेयीदेवी शिकागो येथे रविंद्रनाथ टागोर यांच्यावर लेक्चर द्यायला गेल्या. इथेच एलीएड प्रोफेसर होता. इथे या दोघांची अनेकदा पुन्हा एकदा भेट झाली.येथून परतल्यावर मैत्रेयीदेवी यांनी मग बंगाली भाषेत न हन्यते नावाची कादंबरी प्रकाशित केली. २ वर्षात या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. यात त्यांनी एलीएडने रचलेल्या लैंगिक कथा कशा चुकीच्या आहेत आणि फक्त त्याचा कल्पनाविस्तार आहे अशी मांडणी केली. ही कादंबरी इंग्लिशमध्ये पण आली it does not die : a romance या नावाने.
 

पुढे एलीएडच्या बेंगाल नाईटसवर ह्यू ग्रँट आणि सुप्रिया पाठक यांना घेऊन सिनेमा तयार झाला. पण यावर मैत्रेयी देवी यांनीच आक्षेप घेतला आणि सिनेमा बारगळला. संजय लीला भन्साळी त्यात हुशार ठरला, त्याने या कहाणीपासून प्रेरणा घेत पूर्णपणे वेगळा सिनेमा तयार केला मात्र 'न हन्यते' या कादंबरीचा उल्लेख त्याने चित्रपटाच्या क्रेडिट लाइनमध्ये केला नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required