इतिहासात पहिल्यांदाच गरोदर स्त्रीची ममी सापडली आहे? कसा लागला हा शोध?

ममी हा विषय गेली कित्येक वर्ष लोकांसाठी उत्सुकतेचा राहिला आहे. सापडणाऱ्या प्रत्येक ममीभोवती काही रहस्य गुंफले आहेत का याचा देखील सातत्याने शोध घेतला जात असतो. सध्या अशीच एक गोष्ट चर्चेत आहे. पोलंडमधील काही संशोधक एका पुरातन इजिप्शियन ममीवर संशोधन करत होते. सुरुवातीला त्यांना वाटलं की ही ममी एका पुरुषाची आहे, पण नीट तपासले असता ती महिला असल्याचं समजलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्युच्यावेळी ती चक्क ७ महिने गरोदर होती.
ममी सापडणं तसं नवीन नाही, पण आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच गरोदर स्त्रीची ममी सापडली आहे. ही ममी पहिल्यांदा १८२६ साली वॉर्सा येथे आणण्यात आली होती. या ममीच्या शवपेटीवर एका पुरुषाचे नाव होते. पण नव्या संशोधनाने ती ममी पुरुष नसून स्त्री असल्याचे सिद्ध केले आहे.
संशोधकांनी व्यवस्थित शोध घेतला असता, या ममीला पुरुषी जननांगे नसून स्त्री जननांगे असल्याचं निष्पन्न झालं. तसेच या ममीला लांब केस असल्याचे देखील दिसून आले होते. पुढे अजून खोलात जाऊ शोध घेतला असता ही ममी गरोदर असल्याचे समोर आले.
या कामात गुंतलेले पुरातत्वशास्त्रज्ञ मारझेना ओजारेक यांनी सांगितले की, 'जेव्हा त्यांनी अर्भकाचे पाय आणि हात बघितले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.' संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार मृत्युसमयी या स्त्रीचं वय २० ते ३० वर्षे असण्याची शक्यता आहे.
हा शोध वॉर्सा ममी प्रकल्पाचा भाग आहे. वॉर्साच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या अभ्यासात गरोदर स्त्रीची ममी आढळल्याने या अभ्यासाला मोठं महत्त्व आलं आहे. अभ्यासकांना कोड्यात पाडणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या मृतदेहाला ममीत रुपांतरीत करताना तिच्या पोटातून बाळाला काढण्यात का आलं नाही?
या निमित्ताने जुन्या काळातील गर्भधारणेशी संबंधित अनेक गोष्टींचा शोध घेणे आता सोपे होणार आहे. सध्यातरी या प्रकारचा अभ्यास कारणासाठी जगात ही एकच ममी उपलब्ध आहे.