computer

NEET परीक्षा, मेडिकलची ऍडमिशन, कॉलेजची निवड.. हे सगळे करायचं तर हा लेख वाचायलाच हवा!!

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या NEET2020 या स्पर्धापरीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ओरीसातल्या शोएब आफ़ताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळवून या स्पर्धा परीक्षेत AIR-1 (ऑल इंडिया रँकींग -१) चा बहुमान पटकावला आहे. गेली अडीच वर्षे घरापासून दूर राहून, अथक परिश्रमानंतर हे यश त्याने संपादन केले आहे. हा सन्मान पटकावणारा तो एकटाच नाही, दिल्लीची एक विद्यार्थीनीला-आकांक्षा सिंगलाही ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. NEET-2020 च्या नियमाप्रमाणे शोएब आफ़ताबचे वय जास्त असल्याने त्याला AIR-1 आणि आकांक्षा सिंगला AIR-2 चे मानांकन मिळाले आहे. या दोघांचेही कौतुक करावे तितके कमीच आहे. आपण त्यांचे अभिनंदन करूया!

शोएब आफ़ताब आणि आकांक्षा सिंग यांचे पैकीच्या पैकी गुण मिळवणे हे जसे प्रेरणादायी आहे, तसेच ते काहीजणांसाठी मानसिक दडपण निर्माण करणारेही आहे. इतकी बुद्धिमान मुलं जर NEETच्या परीक्षेसाठी स्पर्धेत उतरत असतील तर माझा (किंवा माझ्या पाल्याचा) या स्पर्धेत निभाव लागेल का? हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या मानसिक दडपण निर्माण करतो. इथे एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी की ही स्पर्धा परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यापुरतीच असते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला की सर्व विद्यार्थी एकसमान असतात. थोडक्यात प्रवेश मिळाला की या गुणांचे महत्व संपले.

या परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्याला 'कट ऑफ' पातळीच्या वर किती गुण मिळाले यावर अवलंबून असते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षीचा कट-ऑफ ५८० गुणांचा असेल अंदाज आहे. म्हणजे ज्यांना ५८०च्या वर गुण मिळतील त्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता प्रश्न उरतो तो फक्त कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो ते ठरवणे. घराजवळच्या की घरापासून दूर? सरकारी की खाजगी? हवं ते मिळत नसेल तर पुन्हा प्रयत्न करायचा का? असे अनेक उपप्रश्न यानंतर उभे राहतात.

आता या उपप्रश्नांची उत्तरं पण बघू या.

घराजवळच्या की घरापासून दूर? हा प्रश्न महत्वाचा नाही. कोणत्याही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे हेच फक्त महत्वाचे आहे. मुंबई-पुणे या शहरी भागातील पालक आपला पाल्य अंबाजोगाई, मिरज किंवा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजला जाणार या कल्पनेनेच घाबरले असतात. हा केवळ चिंतेपोटी निर्माण झालेला मनाचा कमकुवतपणा असतो. मिळेल त्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश घ्या. काही पालक येत्या वर्षी पुन्हा एकदा NEETसाठी प्रयत्न करूया असाही विचार करतात. पण हा विचार निर्धोक नाही. पण यावर्षीचे गुण पुन्हा मिळतील याची खात्री नाही आणि येत्या वर्षाचा कट-ऑफ पुढच्या वर्षी किती वर जाईल याची हमी नाही.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचं काय?

खाजगी महाविद्यालय हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. त्यात काही अनिवार्य, तर काही हट्टाचे भाग गुंतलेले असतात. ज्यांचे आई वडील डॉक्टर आहेत, स्वत:चे खाजगी हॉस्पिटल चालवत असतात त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पाल्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे ही व्यावसायिक अनिवार्यता असतो. कितीही खर्च झाला तरी चालेल, पण आमचा मुलगा/मुलगी डॉक्टरच होणार असा हट्ट असणारे काही पालक असतात. अशांसाठी खाजगी महाविद्यालय हा पर्याय मोकळा असतो. हा प्रश्न संपूर्ण वैयक्तिक असला तरी सरकारी महाविद्यालयात मिळणारा कार्यानुभव हा खाजगी महाविद्यालयात मिळणार्‍या कार्यानुभवापेक्षा काकणभर सरसच असतो असा अनुभव आहे.

परदेशातील वैद्यकीय महाविद्यालय

गेली काही वर्षं रशिया, चीन, फिलीपाइन्स असा देशात जाऊन डॉक्टर होण्याचा ट्रेंड आला आहे. त्यापैकी चीन हा पर्याय आता मोडीतच निघाला आहे. पण NEETच्या माध्यमातून -स्पर्धा परीक्षेतून- ज्यांना प्रवेश घ्यायचा नसतो आणि पालकांना आर्थिक अडचण नसते अशा विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग मोकळा आहे. या देशात जाऊन भाषा आणि जीवनशैलीत पडणारा फरक झेलण्याची तयारी असल्यास शिक्षण तेथेही पूर्ण होते. परंतु या विद्यार्थ्यांना भारतात आल्यावर पुन्हा एक परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५ % वर नाही.

वाचकहो, ज्यांचे पाल्य अकरावी-बारावीत आहेत त्यांच्या आणि मुलांच्या मनात एक प्रश्न सतत घर करून असतो तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर काही विशिष्ट नावाजलेल्या शिकवणी वर्गातच जावे लागते. हा एक गैरसमज आहे. अभ्यासातील सातत्य, योग्य दिशेने केलेला सराव या परीक्षांमध्ये यश मिळवून देऊ शकते. व्यावसायिक शिकवणी वर्गात त्यांचा शिकवण्याचा साचा ठरलेला असतो, त्यामुळे थोडी वेळेची बचत होते. पण स्वयंशिस्तीने पाठपुरावा केला तर सहज यश मिळते.

गेली काही वर्षे इंटरनेटच्या माध्यमातून स्वयंशिक्षण अधिकच सुलभ झाले आहे. फक्त एक फरक असा आहे की दिल्ली, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये स्पर्धापरीक्षांचे जे वातावरण तयार झाले आहे ते अजून बर्‍याच शहरात नाही. पण या स्पर्धापरीक्षांचा अतोनात बाऊ करण्याचा पायंडा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे "माझा मुलगा सध्या सातवीत आहे, NEETच्या परीक्षेसाठी आतापासूनच काय तयारी करता येईल?" असे आचरट प्रश्न विचारणार्‍या पालकांची संख्या वाढते आहे हे चिंताजनक आहे. अशा पालकांच्या दबावाखाली मुलांची मानसिक घुसमट होण्याचे प्रमाण वाढत जाते आहे.

NEETच्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने एक महत्वाची बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. ती अशी की वैद्यकीय शिक्षण हे इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा अतिश्रमाचे शिक्षण आहे. प्रवेश घेतल्यानंतर साधारण ८ वर्षांनी कमाईची सुरुवात होते. तोपर्यंत इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे 'लाइफ सेट' झालेले असते. पण डॉक्टर होणार्‍याचे 'लाइफ सेट' होण्यासाठी वयाची तिशी ओलांडावी लागते. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची नितांत आवड असलेल्यांनीच या क्षेत्रात जावे.

आज NEET2020 च्या स्पर्धा परीक्षेत जे यशस्वी झाले आहेत त्यांचे आपण अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊ या. आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे.

 

लेखक : विनायक प्रभू 
(शैक्षणिक मार्गदर्शक)

सबस्क्राईब करा

* indicates required