computer

या पठ्ठ्याने शोधलंय प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचं तंत्र....ही आयडिया कशी काम करते पाहा !!

मंडळी प्लास्टिक किती वाईट आहे सांगायची गरज नाही. म्हणूनच सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या कमीत कमी वापराने आपण पर्यावरण वाचवण्यात हातभार लावू शकतो हे आता तुम्हांला सांगण्याची गरज नाही. 

पण हा संदेश खोलवर रुजवण्यात सोशल मीडियाचा पण मोठा वाटा आहे राव!! प्लास्टिकमुळे येणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चेन्नई महापालिकेने तर लोकांनी प्लास्टिक वापरणे बंद करावे यासाठी थेट मोहीम सुरू केली आहे. पण सध्याच्या काळात समुद्रातसुद्धा माशांपेक्षा प्लास्टिक जास्त दिसायला लागले आहेत राव!! काही दिवसांपूर्वी समुद्राने मुंबईकरांनी फेकलेला सगळा कचरा परत बाहेर फेकला होता. तर त्या कचऱ्यात सगळ्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कॅरीबॅग होत्या. या सगळ्या गोष्टी बघता प्लास्टिकमुळे होणारे धोके मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 

पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक कमी करण्याची मोहीम सुरू असताना एका हैद्राबादी इंजिनिअरने यावर एक भारी उपाय शोधून काढला आहे. ४५ वर्षांच्या या मॅकेनिकल इंजिनियर सतीश कुमारांनी एक कंपनी काढली आहे. यात ते प्लास्टीकपासून पेट्रोल, डिझेल तयार करतात. मंडळी, हे म्हणजे भन्नाटच आहे नाही का? आजच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे प्लॅस्टिक वाढत आहे आणि पेट्रोल कमी होत आहे. पण जर प्लास्टिकपासून पेट्रोल तयार होऊ लागले तर चुटकीसरशी या दोन्ही समस्या सुटतील. 

सतीश कुमार सांगतात की, ३ स्टेपच्या प्रोसेसने प्लास्टिकचे पेट्रोल, डिझेलमध्ये रूपांतर करणे शक्य आहे. यासाठी त्यांना आधी प्लास्टिक रिसायकलिंग करावे लागेल. जवळपास ५०० किलो प्लास्टिकपासून ४०० लिटर पेट्रोल डिझेल तयार करणे शक्य आहे.

मंडळी, एवढं मोठे काम आहे पण अतिशय सोप्या पद्धतीने हे करता येते असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. पण या प्रक्रियेत थोडेसुद्धा पाणी वाया जात नाही. तेच नाही तर यात प्रक्रियेत प्रदूषणसुद्धा होत नाही. एकंदरीत ही प्रक्रिया पूर्णपणे सेफ आहे. आणि याच्यानंतर होणारा फायदा तर भन्नाटच आहे. 

सतीश कुमारांनी सगळ्या प्लास्टिकपासून पेट्रोल डिझेल तयार करण्याचा संकल्प केला आहे. आणि याच कामासाठी कंपनी सुरू केल्याचे ते सांगतात. 'आमचा हेतू हा पूर्णपणे पर्यावरणाचे रक्षण व्हावे हेच आहे, यातून आम्हाला खूप पैसे मिळावेत अशी अपेक्षा नाही. एवढेच नाहीतर आम्ही आमची टेक्नॉलॉजी एखाद्या हुशार उद्योजकासोबत शेयर करायलासुद्धा तयार आहोत असं ते म्हणतात. 

मंडळी, २०१६ पासून सतीश कुमारांनी जवळपास ५० टन रिसायकल होऊ न शकणारे प्लास्टिक पेट्रोल आणि डिझेलमध्ये कन्व्हर्ट केले आहे. आजच्या तारखेला त्यांची कंपनी  रोज २०० लिटर पेट्रोल २०० किलो प्लास्टिकपासून तयार करतात. आणि हेच प्लास्टिक पासून तयार केलेले पेट्रोल ते स्थानिक ठिकाणी ४० ते ५० रुपये लिटरमध्ये विकतात. तिथल्या लोकांची तर चांदी झाली असेल राव!! आपल्यापेक्षा तब्बल निम्म्या किंमतीत पेट्रोल मिळत असेल तर किती फायदा झाला असेल त्यांचा विचार करा!! 

तुम्ही म्हणाल मग हे काम वाढवून देशभर कमी किमतीत पेट्रोल द्यायला काय हरकत आहे? पण मंडळी, अजून त्यांनी तयार केलेले पेट्रोल किती शुद्ध आहे याची परीक्षा अजून झालेली नाही. त्या पेट्रोलचे टेस्टिंग झाल्यावरच त्याचा वापर देशभर होऊ शकतो. 

सध्याच्या काळात प्लास्टिकचे डोंगर उभे राहत आहेत. आणि त्याचवेळी पेट्रोल डिझेलच्या विहिरी आटत चालल्या आहेत. अशावेळी सतीश कुमारांच्या प्रयत्नांना यश मिळाले तर ते जगाच्या भल्याचे ठरणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required