ॲमेझॉनवरुन १९,०००चे हेडफोन्स चक्क फुकटात मिळाले? काय प्रकरण आहे हे?

देनेवाला जब भी देता, देता छप्पड फाडके ही म्हण ऐकली असेल. आता हीच म्हण ऑनलाईन विक्री कंपन्यांसाठी वापरली तर चुकीचे होणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? तर त्याला पण कारण आहे. या कंपन्यांचे कधी कुठले पार्सल आपल्या घरी येऊन धडकेल याचा नेम नाही.
पुण्यातील एका सद्गृहस्थांना या प्रकारामुळे चांगलीच लॉटरी लागली आहे. गौतम रेगे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी ३०० रुपये किंमतीचे स्किन लोशन ऑर्डर केले होते. पण क्रीमऐवजी त्यांना चक्क १९,००० रुपये किंमतीचे इअरफोन्स मिळाले. गौतम रेगे यांनी हा प्रकार अमेझॉनला कळवला. आश्चर्य म्हणजे ॲमेझॉनने हे इअरफोन ठेऊन घ्या असं गौतम रेगेंना सांगितले. एवड्यावरच ते थांबले नाहीत. स्किन लोशनचे ३०० रुपये सुद्धा कंपनीने परत केले. ही सर्व माहिती स्वतः गौतम रेगे यांनी ट्विट केलीय. मग काय, सोशल मीडियावर ही गोष्ट वायरल व्हायला वेळ लागला नाही.
Bose wireless earbuds (₹19k) delivered instead of skin lotion (₹300). @amazonIN support asked to keep it as order was non-returnable! pic.twitter.com/nCMw9z80pW
— Gautam Rege (@gautamrege) June 10, 2020
ॲमेझॉनची सर्व्हिस दोन प्रकारे चालते: एक प्रकार असतो फुलफिलमेंट बाय ॲमेझॉन आणि दुसरा आहे फुलफिलमेंट बाय मर्चंट. ॲमेझॉनची फुलफिलमेंट असेल तर पॅकेजिंगपासून डिलिव्हरी ते कस्टमर सर्व्हिस सगळं काही ॲमेझॉनची जबाबदारी असते आणि मर्चंट फुलफिलमेंट असेल तर ही सगळी जबाबदारी त्या विक्रेत्याची असते. या रेगेंच्या प्रकरणात कदाचित फुलफिलमेंट बाय ॲमेझॉन असावे, त्यामुळेच त्यांना १९,०००चे हेडफोन फुकटात मिळाले असावेत.
अनेकांनी गौतम रेगेंच्या ट्विटला रिप्लाय करताना म्हटलंय की आमच्यासोबत असे अपघात का घडत नाहीत? काहींनी यावर मीम्सही बनवलेत. अनेकदा चांगली वस्तू ऑर्डर केल्यावर खराब वस्तू आल्याची घटना घडत असते. पण जर अशापण घटना घडल्या तर कुणाला नको असेल, नाही का?