जुन्या कार्सच्या पार्ट्समधून त्याने घरच्या घरी फॉक्सवॅगन बिटल कशी तयार केली ?

भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. अनेकदा भारतीयांच्या जुगाडूपणावर टीका पण केली जात असते. पण काहीही म्हणा, जुगाडाचं कौतुकही तितकंच आहे. अधूनमधून अनेकजण अशा जुगाडामुळे व्हायरल होत असतात. या यादीत आता एक नवा भारतीय समाविष्ट झाला आहे. केरळमधील राकेश बाबू नाव असलेल्या पठ्ठ्याने जुन्या कार्समधील टाकाऊ साहित्य गोळा करून थेट फॉक्सवॅगन बिटल सारखीच कार तयार केली आहे.
राकेशच्या वडिलांचे एक वर्कशॉप आहे, जिथे ते जुन्या गाड्या दुरुस्त करण्याचे काम करतात. तिथेच राकेशला जुन्या कार्सचे पार्टस मिळाले. त्याने सुझुकी सामुराई बाईकचे इंजिन, तसेच ऑटोरिक्षाचे हेडलाईट्स आपल्या कारसाठी वापरले आहेत. बम्पर एका मोटरसायकलचे, आरसे एका टिव्हिएस बाईकचे, डोअर हँडल एका अँबेसिडर गाडीचे. अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्सचे भाग वापरून त्याने घरच्या घरी कार तयार केली आहे. त्याला रिव्हर्स गिअर घेणे परवडत नव्हते, म्हणून ते देखील त्याने घरच्या घरी तयार केले आहेत.
दोनजण बसू शकतील अशी ही कार आहे. खऱ्या फॉक्सवॅगन बिटलपेक्षा आकाराने काहीशी लहान असली तरी दोन्ही कार्समध्ये फारच कमी फरक आहे. राकेशने सांगितल्याप्रमाणे त्याच्या कारमध्ये ४ लिटर डिझेल सामावण्याची क्षमता आहे, तसेच ही गाडी एका लिटरमागे तब्बल ३० किमीचे मायलेज देते. ४० किमीचा वेग या गाडीला आहे.
ही गाडी तयार करण्यासाठी त्याला फक्त ४० हजार रुपये एवढा खर्च आला आहे, त्याने ही गाडी तयार करण्याचा संपूर्ण व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला आहे.
राकेशसारखे अजून काही भन्नाट डोक्याचे तरुण तयार झाले तर भारताची स्वतःची फॉक्सवॅगन तयार व्हायला वेळ लागायचा नाही.