computer

कागद कोणत्या तापमानाला पेट घेतो? वाचा या प्रश्न आणि उत्तरामागचा रंजक इतिहास!!

कागद कोणत्या तापमानाला पेट घेतो? काय विचित्र प्रश्न आहे हा? पाणी १०० डिग्रीला उकळतं, शून्य डिग्रीला त्याचा बर्फ होतो, हे सगळं शाळेत शिकलेलं आठवतं. पण अगदी सायन्स ग्रॅज्युएट असलेल्या कोणत्याही माणसाला कागद कोणत्या तापमानाला पेटतो हे माहिती नसणार याची आम्हाला खात्री आहे. थांबा, लगेच गुगलला विचारायला जाऊ नका. या प्रश्नामागे एक गंमतीदार वाङ्मयीन इतिहास आहे, त्याची कथा आज आम्ही सांगणार आहोत.

रे ब्रॅडबरी नावाच्या एका अमेरिकन लेखकाने एक कादंबरी लिहिली. या कादंबरीचा प्रकार डिस्टोपीयन होता. डिस्टोपियन म्हणजे अतीव दु:खाचं काल्पनीक लेखन. अशा कादंबरीत साधारणपणे जनतेला सत्तेतली राजवट जुलुमांनी पिळवटून काढते वगैरे वर्णन असते. ब्रॅडबरीच्या कादंबरीत त्याने अशी कल्पना केली होती की अमेरिकन सरकार पुस्तकविरोधी झालेलं आहे. पुस्तक लिहिणं, प्रकाशित करणं, पुस्तक वाचणं, पुस्तकाचा प्रसार करणं हे सगळे गुन्हे ठरवले गेले आहेत. जर पुस्तकाचा साठा सापडला तर तो जाळण्यासाठी खास फायरमन नेमलेले आहेत. पुस्तकं जाळून त्याची राख करणं हे त्यांचं काम आहे.

झालं! कादंबरी लिहून तयार झाली. पण ब्रॅडबरीसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला तो असा की कागद कोणत्या तापमानाला पेटतो हे त्याला ठाऊकच नव्हतं. मग तो गेला फायर ब्रिगेड डिपार्टमेंटमध्ये आणि त्यांनाही हाच प्रश्न त्यानी विचारला. त्यांनाही प्रशाचे उत्तर माहिती नव्हते. म्हणून त्यांनी लेखकाला नंतर या असे सांगून वेळ मागून घेतला. त्यांनीही प्रयोग सुरु केले. काहीच दिवसांत फायर ब्रिगेड डिपार्टमेंटने रे ब्रॅडबरीला उत्तर दिले, "कागद ४५१ डिग्री फॅरनहीट म्हणजे २३३ डिग्री सेंटीग्रेडला पेट घेतो."

रे ब्रॅडबरीच्या कादंबरीचे शिर्षक आहे "Fahrenheit 451". तर, अशा अनेक गंमतीजमती घडत असतात. पण त्यांची नोंद अशा विचित्र प्रकारांतून लक्षात राहाते.

आता तुम्हाला हे अशासाठी सांगतोय कारण केबीसीचा पुढचा भाग सुरु झालाय म्हणे. कदाचित ५ कोटींसाठी हा प्रश्न विचारला गेला तर काय घ्या!! तुम्ही केबीसीत गेलात आणि नेमका हा प्रश्नच विचारला तर एक छोटासा हिस्सा बोभाटाला द्यायला विसरू नका!

सबस्क्राईब करा

* indicates required