'वंदेमातरम्' आणि 'जन गण मन' वाद ते 'जन गण मन' मधले शब्दबदल....वाचा भारताच्या राष्ट्रगीताचा प्रवास !!

काही गाणी, काही कविता ह्या प्रेरणादायक असतात. अशा गोष्टी मग त्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या मानबिंदू ठरतात. अशा प्रेरणादायक गीतातून सर्वानुमते एका गीताची निवड होते तेव्हा त्या गीताला राष्ट्रगीत म्हटले जाते. थोडक्यात गीत, राष्ट्रीय गीत आणि मग राष्ट्रगीत असा हा प्रवास असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी बरीच प्रेरणादायी गीतं होती. त्यामध्ये बंकिमचंद्र कृत 'वंदे मातरम' आणि रवींद्रनाथ टागोर कृत 'जन गण मन अधिनायक जय हे' या दोन गीतांना अग्रक्रम होता.
विशेषतः सुरुवातीच्या काळात वंदे मातरम ही जणू स्वातंत्र्याची रणघोषणा होती. बंकिमचंद्रांनी मात्र हे गीत मातृभूमीला वंदना म्हणून लिहिलं, ते पुढे त्यांनी आपल्या 'आनंदमठ' कादंबरीतही घेतलं. १८८० -८२ सुमाराचा हा काळ होता. अर्थात ह्या गीताबद्दल दोन-तीन जन्मकथा सांगितल्या जातात. मात्र एक नक्की, बंकिमचंद्रांना आपल्या गीताच्या सामर्थ्याची खात्री होती.
(बंकिमचंद्र चट्टोपाध्याय)
त्यांनी म्हटलंय, "माझे सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल, परंतु एकच गीत शाश्वत उरेल. हे एक महान गीत होईल आणि देशाचे हृदय जिंकेल. एक दिवस असा उजाडेल की वंगभूमी या गीताने वेडी होऊन नाचू लागेल. एकटा बंगालच काय, पण सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल. पण त्याला आणखी पंचवीस -तीस वर्षे जावी लागतील."
बंकीमचंद्र द्रष्टे ठरले. अल्पावधीतच 'वंदे मातरम' मातृभूमीचे महन्मंगल स्तोत्र झालं. विशेषतः बंगालची ब्रिटिशांनी फाळणी केली तेव्हा वंदे मातरम म्हणजे म्हणजे ब्रिटिशांना विरोध हे नक्की झालं. हा वणवा इतका पेटला की बंगालच्या गव्हर्नरने - फुल्लर याने वंदे मातरम हे शब्द उच्चारायलादेखील बंदी केली. अर्थात, त्यामुळे हा क्षोभ वाढत गेला. हजारो सत्याग्रही आणि क्रांतीकारकांनी 'वंदे मातरम' म्हणत स्वातंत्र्य आंदोलन पेटतं ठेवलं. इ.स.१९१५ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात वंदे मातरम म्हणायची प्रथा विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी सुरु केली. काफी रागातील ही चाल आजही अनेक ठिकाणी म्हटली जाते.

('वंदेमारतम्'वर आधारित चित्र, १९२३)
याच सुमारास रवींद्रनाथ टागोरांनी २० डिसेंबर १९११ रोजी राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावर जन गण मन म्हटलं. महात्मा गांधी त्यांनी या गीताला तेव्हा भारताचे भक्तिगीत असं म्हटलं.
वंदेमातरमच्या तुलनेत जन गण मन सुध्दा संस्कृतमधून असलं तरी सुबोध-म्हणायला सोपं होतं. त्यामुळे ते चटकन लोकांना भावलं आणि ओठावर रुळलं.
मात्र वंदेमातरम भोवती क्रांतीकारकांच्या बलिदानाचं आणि हौतात्म्याचं वलय असल्यानं अनेकांच्या त्यात भावना गुंतल्या होत्या. त्यांना जन गण मन रुचणारं नव्हतं. झाल्या प्रकाराने असेल, पण त्यावेळी आवई उठली की हे गीत रवींद्रनाथांनी सम्राट पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी रचले आहे.
(रवींद्रनाथ टागोर)
अर्थात मग रवींद्रनाथांबाबत क्षोभ उसळला. उलटसुलट मतांचं पेव उठलं-फुटलं. जेव्हा ती गोष्ट रवींद्रनाथांपर्यंत गेली तेव्हा क्षोभानं त्यांनी जणू कैफियत मांडली की ज्यात त्यांनी जनगणमनची जन्मकथाच सांगितली. ते सांगतात, "सरकार दरबारी प्रतिष्ठा पावलेल्या माझ्या एका मित्राने मला सम्राटाचे जयगान रचण्याचा विशेषच आग्रह केला. ते ऐकून मी विस्मयचकीत झालो. त्याहीपेक्षा माझ्या मनात क्षोभ निर्माण झाला. याच मनस्तापाच्या धक्क्यातून प्रतिक्रिया उमटली तीच 'जन गण मन." ह्या गीताची ही जन्मकथा.
"पतन अभ्युदयामुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगानुयुगे प्रवास करणार्या यात्रिकांचा, जो चिरसारथी, जनगणांचा जो अंतर्यामी व मार्गदर्शक आहे, अशा त्या भारत भाग्य विधात्याचा, मी त्या गीतात जयघोष केला आहे"
अर्थात 'वंदे मातरम' आणि जन गण मन'चा वाद आणि पडसाद उमटतच राहिले. मात्र जन गण मन हे म्हणायला सोपं आहे असा दृष्टीकोण विशेषतः जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि बहुजनांकडून पाठिंबा मिळत गेला. जन गण मन हे प्रमुख राष्ट्रीय गीत असून वंदे मातरम हे दुय्यम राष्ट्रगीत आहे असंही म्हटलं जाऊ लागलं. मात्र दिनांक २४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय घटना परिषदेने 'जन गण मन' या गीतातल्या पहिल्या कडव्याला राष्ट्रगीतातील पहिल्या कडव्याची- राष्ट्रगीताची मान्यता दिली.
हे गीत
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता!
पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग|
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग|
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जय गाथा।
जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता!
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे। ||
हे सर्व भारतभर राष्ट्र्गीत म्हणून म्हटलं जाऊ लागलं. नि:संशयपणे ह्या राष्ट्रगीताला मान्यता मिळाली. पण भारतात सदैव कुठे ना कुठे तरी वाद उद्भवत असतात किंवा उद्भवले जातात हे आपण पाहतोच. त्यात जनगणमन राष्ट्रगीत देखील आले!
हे कसे घडले? फाळणी झाली आणि सिंध प्रांत पाकिस्तानाता गेला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्रगीतात सिंध शब्द कसा ठेवता येईल असं काही जणांचं मत पडलं. बघता बघता ते पसरत गेलं तेव्हा सिंधच्या ऐवजी तेथे सिंधू असा शब्द असावा असा सूर उमटत गेला.
सिंध शब्दाचा चुकीचा अर्थ लावल्याने हा संभ्रम निर्माण झाला. वास्तविक सिंधू नदी वाहते तो सिंध प्रदेश, असा तो प्रादेशिक विशेष आहे. त्याचा प्रांताशी संबंध नाही असा भाषा शास्त्रज्ञांनी वेळीच खुलासा केला असता तर गोंधळ उडाला नसता. पण आपल्याकडे जाणत्यांचा सूर नेहेमीच क्षीण असतो.
(सिंध प्रांत)
गैरसमजात भर टाकली ती केंद्रीय माध्यमिक बोर्डातर्फे! ह्या बोर्डातर्फे देशातील सर्व शाळांना राष्ट्रगीतासंदर्भात एक परिपत्रक पाठवण्यात आले. त्यात राष्ट्रगीतासंदर्भात कार्यवाहीच्या सूचना करण्यात आल्याचे आणि त्यानुसार दुरुस्त केले गेलेले (?) राष्ट्रगीतही नमूद केले गेले.
मूळ इंग्रजी परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रगीतात 'सिंध' 'आशिष' आणि 'मांगे' या शब्दाऐवजी ' सिंधु' 'आसिस' आणि 'मागे' असा बदल नमूद केलेला होता. अर्थात ह्या प्रकाराने अनेकजण चक्रावले. राष्ट्रगीत असे परिपत्रकाद्वारे बदलतात? बदलू शकतात? अर्थात योग्य-अयोग्य काय ह्याबद्दल संभ्रम निर्माण झालाच. त्यामुळं झालं काय, बोर्डाच्या अधिपत्याखाली जे जे आले ते, आणि बोर्डाच्या अधिपत्याखाली येत नाहीत ते, असे दोन तट निर्माण झाले. जुने होते ते 'सिंध' म्हणत राहिले आणि नवी मंडळी सिंधू म्हणू लागली....
एकाच देशात राष्ट्रगीताच्या दोन तर्हा. भेद सूक्ष्म असला म्हणून काय झालं?
ह्याबद्दल कुणालाच काही कसं वाटलं नाही? शेवटी २०११ मध्ये प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी राष्ट्रगीतात सिंध नव्हे तर सिंधू म्हणावे जावे यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्यावर सिंध व सिंधूपैकी राष्ट्रगीतात योग्य शब्दप्रयोग कोणता व योग्य शब्दप्रयोगाची चूक लक्षात आल्यानंतर सरकारने ती चूक का सुधारली नाही अशी विचारणा करत त्याबाबतीत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राला दिले होते.
त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर केले आणि राष्ट्रगीतात वापरले जाणारे हे दोन्ही शब्दप्रयोग योग्य असल्याचा दावा केला. दरम्यान 'सिंध' शब्दाच्या ऐवजी तेथे काश्मिर हा शब्दप्रयोग करावा अशाही याचिका केल्या गेल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या निकालाचा दाखला केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात दिला होता ही बाब लक्षात घेऊन त्या याचिका फेटाळून लावल्या.
या सगळ्याच बाबतीत वाद आणि वादंग होणे साहजिक होते. ह्यातून उच्च न्यायालयाने 'सिंध' आणि 'सिंधू' दोन्ही शब्द उच्चारले जाऊ शकतात असं जरी म्हटलं असलं तरी ह्या प्रश्नाची तड लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचे आदेश दिले आहेत.
आता त्याचा निर्णय कधी होईल हे कुणी सांगावे? हा वाद आणि खेळी ज्यांना खेळायची आहे त्यांनी खेळावी. मात्र त्याचा परिणाम तुम्हा-आम्हा सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची गरज नाही.
आपण जेथे जेथे राष्ट्रगीत म्हटले जाते तेव्हा त्याचा मान राखावा हे महत्वाचे. हीच बाब आपण सगळ्यांना सांगायला हवी.
राष्ट्रगीताची चाल
आज आपण जे राष्ट्रगीत जनगणमन ज्या चालीवर म्हणतो त्याची चाल कुणी लावली असा प्रश्न आपल्या मनात क्वचितच येतो.
ही चाल खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी लावलेली आहे. एवढेच नव्हे तर 'उदेर पाथे' ह्या बंगाली चित्रपटात आणि पुढे ह्याच चित्रपटावर हिंदी चित्रपत 'हमराही' (१९४५) आला, त्यात संपूर्ण जनगणमन आहे. ह्या चित्रपटाच्या ग्रामोफोन रेकॉर्डवर ह्या गीताची चाल रवींद्रनाथ टागोर यांची असून संगीत नियोजन रायचंद बोराल यांचं आहे अशी नोंद आहे.
देशाच्या राष्ट्रगीताची अशी ही बरीच मोठी कहाणी आहे..
लेखक : रविप्रकाश कुलकर्णी