computer

व्हॅलेन्टाईन्स डे प्रकरण आलं नक्की कुठून??

हा व्हॅलेंटाईन्स डे असतो तरी काय? लाल लाल फुललेले गुलाब, चॉकलेट्स आणि गिफ्ट्स?? नाही हो... व्हॅलेंटाईनची खरी कहाणी वेगळीच आहे. वाचा तर मग..

क्रूरकर्मा क्लॉडियस

तर मंडळी, इसवीसनाच्या तिसर्‍या शतकात म्हणजेच सुमारे १७०० वर्षांपूर्वी क्लॉडीयस(दुसरा) हा रोमन साम्राज्याचा राजा होता. त्याचं साम्राज्य भलंमोठं होतं. अगदी युरोप आणि उत्तर आफ्रीकेत पसरलेलं!! एवढं मोठं राज्य  जनता सांभाळायची तर तेवढंच मोठं सैन्यही त्याला बाळगावं लागत होतं. आणि हा क्लॉडियस काही दयाळू राजा नव्हता. तो होता क्रूरकर्मा क्लॉडीयस!!  या रोमन सम्राटाच्या काळात मोठमोठ्या मोहिमा निघत, नवीन राज्यं जिंकून घेतली जात. त्याच्या राज्याच्या चारही दिशांना हे सैन्य सतत मोहिमेवर असे.   असं असलं तरी क्लॉडीयसच्या या सैन्यात रोमन जनता मात्र सहजासहजी दाखल होत नव्हती. त्यामुळं त्याला नेहमीच सैन्याचा तुटवडा जाणवायचा.

संत व्हॅलेंटाईन

अशा परिस्थितीत या दुष्ट क्लॉडीयसला एकदा असं वाटलं, लोकांचं आपल्या बायका-पोरांवर खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच आपल्याला हवे तितके सैनिक मिळत नाही आहेत. झालं.. या क्रूरकर्मा क्लॉडीयसनं रोमन साम्राज्यात केवळ प्रेमाच्या आणाभाका तर सोडाच, चक्क लग्नावरच बंदी घातली. त्यानं साम्राज्यात तसा हुकूमनामाच फिरवला. आता राजाच्या हुकूमासमोर बिचारी जनता काय करणार? बर्‍याचजणांनी यासमोर मान तुकवली.  मात्र रोममधले एक पाद्रीबाबा, संत व्हॅलेन्टाईन यांनी काही हा हुकूम मानला नाही. त्यांच्या मते हा हुकूम जुलमी होता आणि असा निसर्गाविरूद्ध नियम बनवायचा क्लॉडीयसला काही अधिकारच नव्हता. या हुकूमाविरुद्ध जाऊन व्हॅलेन्टाईननं गुप्त रीतीनं रोममध्ये अनेक तरूण-तरूणींची लग्नं लावली.

संत व्हॅलेंटाईनचा छळ..

जेव्हा दुष्ट क्लॉडीयसला व्हॅलेन्टाईन काय करतोय हे कळालं, तेव्हा त्यानं आपल्या सैन्याला व्हॅलेन्टाईनला कैद करण्याची आज्ञा केली. त्यानं व्हॅलेन्टाईनला मृत्यूदण्ड सुनावला. या शिक्षेची अंमलबजावणी आजच्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी इ.स. २७०च्या सुमारास करण्यात आली. व्हॅलेन्टाईनला दांडक्यांनी मारहाण करून मृत्यूदंड देण्यात आला आणि नंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

असं सांगतात की जेव्हा व्हॅलेन्टाईन कैदेत होता तेव्हा त्याची जेलरच्या मुलीशी मैत्री झाली होती. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी जाण्यापूर्वी त्यानं आपल्या या नव्या मैत्रीणीला एक निरोपाचं पत्र धाडलं होतं आणि त्यात शेवटी त्यानं, ’तुझ्या व्हॅलेन्टाईनकडून’ असं लिहिलं होतं. व्हॅलेन्टाईनने दाखवलेल्या असामान्य लोकनिष्ठेसाठी त्याच्या मृत्यूनंतर पुढे त्यास संतत्त्व देण्यात आलं.

संत व्हॅलेन्टाईनचं नाव प्रेमाशी आणि प्रेमाराधनेशी कसं जोडलं गेलं, याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही.  पण १४ फेब्रुवारी हा दिवस प्राचीन काळापासूनच ल्युपरकॅलिया या नावाच्या उत्सवाशी निगडीत आहे. हा एक पेगन उत्सव आहे. या उत्सवात तरूण मुलींच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून एका बॉक्समध्ये ठेवत आणि तरूण मुलं त्यातून  चिठ्ठी उचलत. चिठ्ठीत जिचं  नाव आलं असेल, त्या मुलीशी हा तरूण मग मैत्री करत असे. इ.स. ४९६ मध्ये गेलॅशियस नावाच्या एका पोपने ल्युपरकॅलिया उत्सवावर बंदी घातली आणि त्या ऐवजी हा दिवस सेन्ट व्हॅलेन्टाईन दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला..

तेर्नी शहरातल्या संत व्हॅलेंटाईन यांच्या अस्थी...

ख्रिश्चन एन्सायक्लोपिडीयानुसार ’प्रेम’ या भावनेला पाठिंबा दिल्यामुळं एकूण ३ संत व्हॅलेन्टाईन शहीद झाले आहेत. त्यातला एक रोममध्ये पाद्री होता, एक इन्टराम्ना (सध्याचं तेर्नी, इटली) शहराचा बिशप आणि एक आफ्रीकेतल्या रोमन परगण्यातला होता.

तर या सगळ्या घडामोडीमधून पुढं १४ फेब्रुवारी हा प्रेमसंदेशांची आणि प्रेमकवितांची देवाणघेवाण करण्याचा आणि फुले किंवा तशाच छोट्या-छोट्या प्रेमभेटी देण्याचा दिवस बनला.

आहे ना गोष्ट चांगलीच मनोरंजक आणि रोचक!!

सबस्क्राईब करा

* indicates required