एका टनाचा ए.सी. म्हणजे नक्की काय असते? त्याचे प्रत्यक्ष वजन की आणखी दुसरेच काही?

आज ट्विटरवर एक नवा प्रकार पाह्यला मिळाला. तिथे एका व्यक्तीबद्दल त्याच्याच शेजारीण बाईंनी सोसायटीकडे तक्रार केली होती. आता तुम्ही म्हणाल की दोन शेजाऱ्यांच्या भांडणात काय मजा असणार? पण थांबा. इथे मजा आहे. त्यासाठी खालील पत्राचा नमुना वाचा.
प्रति,
सेक्रेटरी,
निनावी सोसायटी.
महोदय,
आपल्या सोसायटीमध्ये असणाऱ्या लिफ्टने जास्तीत जास्त ४५० किलो वजन खालीवर नेले जाऊ शकते. याबद्दलचा स्पष्ट संदेश आपल्या लिफ्टमध्ये लिहिलेला आहे. आपल्याच सोसायटीमधील रहिवासी श्री. अमुक तमुक हे आज चक्क त्यांच्याकडे आलेला १.५ टनाचा ए. सी. लिफ्टमधून घेऊन जात होते. त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला असता त्यांनी या एसीचे वजन १.५ टन नसून फक्त २० किलो आहे असा वाद घालण्यास सुरवात केली.
१.५ टन म्हणजे १५००किलो वजन असलेला ए. सी. ४५० किलो क्षमता असलेल्या लिफ्टमधून घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीवर सक्त कारवाई करण्यात यावी.
जागरूक रहिवासी
XyZ
आता तुम्हाला कळली ना मजा!! तुमचाही असा ए.सी.चे प्रत्यक्ष वजन आणि एसी युनिटसाठी आपण वापरतो त्या एककामध्ये गोंधळ नाही ना? नक्कीच नसावा. ए.सी. युनिटचं वजन आणि त्याची एखादी जागा थंड करण्याच्या क्षमतेचं एकक या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
आपण कधीही एसी युनिटच्या प्रत्यक्ष वजनाबद्दल बोलत नाही, तर आपण तो एखादी जागा कितपत थंड ठेऊ शकेल या दृष्टिकोनातूनच त्या युनिटच्या तपशीलांबद्दल बोलत असतो. ए.सीच्या जागा थंड करण्याच्या क्षमतेच्या एकाकाला टन म्हणतात आणि म्हणूनच आपण किती टनाचा एसी घेतला वगैरे प्रश्न एकमेकांना विचारत असतो. आता तुम्हांलाही प्रश्न पडला असेल ना या एककाला टन असे नाव का पडले असावे?
यासाठी आपल्याला इतिहासात थोडे मागे जावे लागेल. तर जेव्हा आतासारखे ए.सी. नव्हते, तेव्हा घरे, दुकाने अशा जागा थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जायचा. आता बर्फ उष्णता शोषून घ्यायचा आणि हळूहळू वितळायचा. तर आता एखाद्या घरात समजा एक टन बर्फ ठेवला आणि त्याला वितळवायचे ठरवले, तर तो एक टन बर्फ वितळविण्यासाठी जी उष्णता लागते त्याला टन म्हणतात. खरे तर ही ऊर्जा असते २८६००० बी. टी. यू. ( ब्रिटिश थर्मल युनिट)!!
आता बर्फ किती लवकर वितळेल हे त्याला किती वेळात किती प्रमाणात ऊर्जा दिली आहे त्यावर अवलंबून आहे. आता सगळीकडे सारखेपणा असावा म्हणून टेक्निशियन लोकांनी ही वेळ २४ तास अशी पाळायला सुरवात केली. म्हणजेच, सामान्य परिस्थितीत एक टन बर्फ वितळवण्यासाठी साधारणता ११,९१७ बी. टी. यू. प्रति तास एवढी ऊर्जा लागते हे प्रमाणित करण्यात आले.
ए. सी. हा एखाद्या बर्फाच्या गोळ्यासरखा काम करतो. कुलरमध्ये थंड हवा तयार होते, तर ए. सी. एखाद्या जागेतील गरम हवा बाहेर काढून टाकतो आणि म्हणूनच एखाद्या ए. सी.ची क्षमता तो किती प्रमाणात उष्णता कमी करू शकतो यावर ठरवण्यात येते. तर अशा प्रकारे एखाद्या ए. सी.ची क्षमता आपण एक टन समजतो, तेव्हा ती ११९१७ बी. टी. यू. प्रतितास असते.
आहे ना गंमतीची आणि तितकीच उपयोगी माहिती? असेच आणखी काही लहानसहान प्रश्न तुम्हांला पडले असतील तर ते आम्हांला नक्की कळवा.