पत्नीने पतीसाठी बांधलेला लाल ताजमहाल? कोणी आणि कधी बांधला?

आपल्याला आग्र्यामध्ये असणाऱ्या ताजमहालबद्दल माहिती असेलच. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याची गणना केली जाते. पण याच आग्र्यामध्ये एक ताजमहाल नसून दोन ताजमहाल आहेत, हे तुम्हांला माहित आहे का? मुघल सम्राट शहाजहांने आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये बांधलेल्या ताजमहालचा इतिहास सर्वानाच माहित आहे. चला तर मग दुसऱ्या ताजमहालचा इतिहास जाणून घेऊयात.
आग्र्यात रोमन कॅथलिक स्मशानभूमी आहे. ही ब्रिटिश पूर्व काळामध्ये युरोपातून भारतात आलेल्या व्यापारी आणि स्थानिक लोकांच्या रियासातींची आठवण करून देणारी उत्तर भारतातील सगळ्यात जुनी ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. भारताने देऊ केलेल्या उल्लेखनीय धार्मिक स्वातंत्र्यामुळे, नियमित वेतन आणि एकूणच चांगल्या शक्यतांमुळे हे लोक भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या खात्यांत नोकऱ्या मिळाल्या. अखेरीस ते स्थानिक संस्कृतीशी इतके जोडले गेले की त्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्न केले आणि कपडे, अन्न आणि जीवनशैली यासारख्या त्यांच्या अनेक प्रथा स्वीकारल्या. एवढंच काय, कबर बांधण्याची पद्धत आणि मुघलांचे वास्तुशिल्प सुद्धा युरोपियन लोकांच्या जगण्याचे विलक्षण भाग झाले. याचंच उदाहरण म्हणजे ‘लाल ताजमहाल’.
हा ताजमहाल नवऱ्याने बायकोसाठी न बांधता एका पत्नीने पतीसाठी बांधलेली वास्तू आहे. हा बांधला एका ब्रिटिश स्त्रीने. तिचं नाव ॲन हैसिंग. तीने तिचा पती कर्नल जॉन विल्यम हैसिंगच्या आठवणीमध्ये लाल ताजमहाल रोमन कॅथलिक स्मशानभूमीमध्ये बांधला.
‘लाल ताजमहाल’ हुबेहूब ‘ताजमहाल’ सारखा कसा काय बांधला गेला? त्यामागची गोष्ट काय आहे? ते आपण जाणून घेऊया.
जॉन विलियम हैसिंग एक साधा सैनिक म्हणून सैन्यात काम करत होता. सन १७६५ मध्ये श्रीलंकेत तो कैंडी युद्धामध्ये सहभागी झाला होता. त्यांनंतर हैद्राबादच्या निजामच्या सैन्यात त्याला नोकरी मिळाली. सन १७८४ मध्ये मराठा सरदार महादजी शिंदेंच्या सैन्यामध्ये त्याला उच्च पद मिळालं. सन १७९२ मध्ये महादजी त्याला पुण्याला घेवून आले. सन १७९४ मध्ये महादजीच्या मृत्यूनंतर कर्नल हैसिंग आग्रामध्ये आले. आग्र्यावर तेव्हा मराठ्यांची सत्ता होती. सन १७९९ मध्ये आग्र्याच्या किल्याच्या रक्षणासाठी सेनापती म्हणून या कर्नलची निवड झाली. याचदरम्यान कर्नल हैसिंग पत्नी ॲन हैसिंगला घेऊन ताजमहाल पाहण्यासाठी गेला. ताजमहालच्या गोष्टीमुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी एकमेकांना वचन दिले, की आपल्यातील जे कोणी आधी मरेल त्याच्या आठवणीमध्ये राहिलेल्या जोडीदाराने असाच ताजमहाल बांधायचा.
सन १८०३ मध्ये कर्नल हैसिंगचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलांनी ‘लाल ताजमहाल’ बांधला. पैशांच्या कमतरतेमुळे त्याची पत्नी ॲन हैसिंग संगमरवर विकत घेऊ शकली नाही. त्यामुळे तिने लाल दगडांचा ताजमहाल बांधला. त्याची रचना ही हुबेहूब ताजमहालसारखीच आहे. हा चारही बाजूंनी समांतर आहे, तसेच ताजमहालप्रमाणेच यालाही चारही बाजूनी प्रवेशद्वार आहे. याच्याही मुख्य इमारतीला ताजमहाल सारखेच स्तंभ आहेत. लाल ताजमहालची गोष्ट ही ताजमहाल इतकीच असाधारण आहे.
"इक शहनशाहने बनवाके हसीं ताजमहल हम गरीबोंकी मोहब्बतका उडाया है मजाक" असं म्हटलं जात असलं तरी या जोडप्यानेही आपल्या प्रेमाचे शहनशाह इतके भव्य आणि महागडे नसले तरी सुंदर स्मारक बनवले आहे.
लेखिका: कोमल वाघमारे