computer

'हीर-रांझा'च्या प्रेम कवितेमुळे भारताचा बासमती तांदळावरचा हक्क सिद्ध कसा झाला ?

"मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आंख चुरायें|हमे क्या हो गया है?" हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. बरं, हे आठवत नसेल तर "'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं"' हे तर नक्कीच आठवत असेल. आज आम्हाला या गाण्यांची आठवण होण्याचं कारण असं आहे की ज्या चित्रपटातील ही गाणी आहेत त्याचं नाव आहे 'हीर-रांझा'.

१७६६ साली वारीस शहा नावाच्या एका सूफी संप्रदायातील कवीने हीर-रांझाची प्रेमकहाणी कवितेत गुंफली आहे. या काव्यातील एका महत्वाच्या संदर्भाने आपल्याला दरवर्षी करोडो रुपयांच्या परकीय चलनाची प्राप्ती होते आहे. आता, १७६६ सालची प्रेमकहाणी आणि करोडो रुपयांची कमाई हे वाचून तुम्ही आम्हाला वेड्यात काढलं असणारच. पण आजचा हा लेख वाचला तर सगळा उलगडा होईल, पण त्यासाठी आपल्याला १९९७ पर्यंत मागे जावे लागेल.

१९९७ साली अमेरिकेतल्या राइस-टेक नावाच्या कंपनीने तांदळाच्या जातीचे एक वाण बनवले आणि त्याला नाव दिले बासमती! भारतातल्या बासमती तांदळाच्या रोपाचे अमेरिकन लांब शिताच्या तांदळासोबत जैविक-प्रक्रिया करून ही नवी संकरित जात (hybrid) बनवली होती. 'बासमती' तांदळाच्या नावावर त्यांनी संपूर्ण आणि सर्वसमावेशक बौध्दिक हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. अमेरिकन बौध्दिक संपदेच्या कायद्याच्या अंतर्गत हा अधिकार त्यांना मिळाला असता तर 'बासमती' या नावाने तांदूळ विकण्याचे जगभराचे हक्क फक्त त्यांना आणि त्यांनाच मिळाले असते. गेली हजारो वर्षं बासमती पिकवणार्‍या भारताला हा फारच मोठा अनपेक्षित धक्का होता.

अमेरिकेत किंवा इतर देशांत आपण जो बासमती पाठवत होतो त्याला एका टनामागे १२०० डॉलर्स आपल्याला मिळत होते. जर राइस टेकला बौध्दिक संपदेचे हक्क मिळाले असते तर आपला निर्यातीचा बाजारच संपुष्टात आला असता. भारतीय बाजारात त्यामुळे प्रचंड प्रक्षोभ माजला. गेली हजारो वर्षे जे पीक आपण काढतो त्या बासमती पिकावर कुठलीतरी उपटसुंभ कंपनी अधिकार कसा सांगू शकते? आणि त्यावर पेटंट देण्याचा अधिकार अमेरिकन पेटंट कोर्टाला कुणी दिला? असा प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. दोन्ही देशांत या प्रश्नांवरून तणाव वाढत गेला आणि भारत सरकारने अमेरिकन कंपनीच्या विरुध्द जाण्यासाठी कंबर कसली.

समस्या एकच होती की ती अशी की त्यावेळी भारतातच बौध्दिक संपदेबाबतचे कायदे जागेवर नव्हते आणि जे काही होते ते अत्यंत अपुरे होते. तरीही भारत सरकारने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आणि अचानक आणखी एक देश भारताच्या सोबतीने लढायला तयार झाला. तो देश म्हणजे पाकिस्तान! भारताच्या बरोबरीने जगात बासमती तांदूळ निर्यात करणार्‍या पाकिस्तानला या राइस-टेकच्या पेटंटची झळ पोहोचणार होती. पाकिस्तानला अमेरिकन कोर्टात एकट्याने लढा देणे शक्यच नव्हते, कारण त्यांच्याकडे बौध्दिक संपदेचा कायदाच अस्तित्वात नव्हता. अर्थात आजही पाकिस्तान या आघाडीवर सुधारलेला आहे असं नाहीच. असो.

शेवटी हे प्रकरण अमेरिकन कोर्टात पोहोचले. भारतीय कृषीतज्ञांनी ढिगावारी शास्त्रीय पुरावे कोर्टासमोर मांडून हे सिध्द केले की बासमतीचा सुगंध, बासमतीचा स्वाद, बासमतीच्या शितांचा पोत केवळ भारतातल्या गंगेच्या आणि इतर उत्तरेच्या नद्यांच्या खोर्‍यात असलेल्या मातीत उगवणार्‍या पिकालाच मिळतो. इतर कोणत्याही मातीत उपजणारा तांदूळ म्हणजे बासमती नव्हे. अमेरिकन कंपनीने तयार केलेले वाण हे निव्वळ 'डुप्लीकेट' या सदराखालीच मोडते.

भारतातील एक कृषीतज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. यशवंत लक्ष्मण नेने यांनी शास्त्रीय पुराव्यांसोबत काही ऐतिहासिक पुरावे दाखल केले. त्यापैकी एक म्हणजे १८९१ साली जॉर्ज वॅट नावाच्या ब्रिटिश गृहस्थाने तयार केलेल्या "A Dictionary of the Economic Products of India" या ग्रंथात नोंद करण्यात आलेली माहिती! जॉर्ज वॅटने प्र्जाती "Oryza" याखाली बासमती शेकडो वर्षे भारतातच (तेव्हा पाकिस्तान नव्हते) उगवणार्‍या पिकाला म्हणतात असे लिहिले होते.

यापुढे जाऊन डॉ. नेने यांनी भारतीय कृषी संस्कृतीचे संदर्भ शोधून काढले आणि त्यात त्यांना वारीस शाहच्या 'हीर-रांझा' या काव्यात बासमतीचा उल्लेख सापडला. हे काव्य १७६६ साली वारीस शाहने लिहिले होते. त्यावेळी वारीस शहाचे असलेले वय लक्षात घेता हे सहज सिध्द झाले की 'हीर-रांझा' च्या प्रेम कवितेत उल्लेख असलेला बासमती २५० वर्षांहूनही आधी केवळ भारतात उगवणारे पीक होते.

(डॉ. यशवंत लक्ष्मण नेने)

इतके सज्जड पुरावे दिल्यावर अमेरिकन कोर्टाने राइस-टेकचा दावा फेटाळून लावला आणि 'बासमती' भारतीय वाण असल्याचे सिध्द झाले. तर वाचकहो, यानंतर बासमतीच्या निर्यातीला आणखीनच जोर आला. सध्या भारत अनेक देशांना कोट्यावधी रुपयांचा बासमती पुरवतो. गेल्या वर्षी आपण ३७,७२,५५७ लाख रुपयांचा बासमतीचा व्यापार केला आहे. याचे श्रेय डॉ. नेने आणि त्यांच्यासारख्या अनेक शास्त्र्ज्ञांना जाते. पण 'हीर-रांझा' ला विसरूनही चालणार नाही. पुढच्या वेळी बासमतीचा घास घेण्यापूर्वी चार शितं त्यांच्यासाठी पण वाहायला हवीत. काय म्हणता?

(सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बासमतीवरून एक लढाई सुरु झाली आहे. त्याबद्दल आपण नंतर कधीतरी वाचूया!)

सबस्क्राईब करा

* indicates required