computer

दिनविशेष : जाणून घ्या १६व्या वर्षी हुतात्मा झालेल्या नंदुरबारच्या शिरीषकुमारबद्दल!!

गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत उतरल्यानंतर मूठभर लोकांची चळवळ सर्वसामान्यांची झाली. सविनय कायदेभंग आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून देशातला सर्वसामान्य नागरिक स्वातंत्र्य चळवळीत उतरला होता. १९४२ ची चलेजाव चळवळ ही गोऱ्या साहेबांच्या साम्राज्यावर शेवटचा खिळा ठोकणारी ठरली. 

दि. ८ ऑगस्ट १९४१ ला मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात गांधीजींनी 'करो या मरो'चा नारा दिला. इंग्रजांना देशातून हाकलून लावल्याशिवाय शांत बसायचे नाही हे ठरवूनच चले जाव आंदोलनाची सुरुवात झाली होती. इंग्रजांनी धोका ओळखून गांधीजी पंडित नेहरू यांच्यासारख्या सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. पण जनतेने आंदोलन स्वतःच्या हातात घेतले होते. प्रसंगी नोकरी-व्यवसाय सोडून सर्वसामान्य भारतीय नागरिक इंग्लिश जुलूमशाही विरुद्ध लढत होता. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी सर्व रस्त्यावर उतरले होते. देशभर भारतमातेचा गजर घुमू लागला होता. 

घनश्यामदास बिर्ला यांच्यासारख्या उद्योजकापासून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वानी या लढयात उडी घेतली होती. अशातच नंदुरबार जिल्ह्यात घड़लेल्या एका घटनेने साऱ्या देशाला हेलावून सोडले. 

अवघ्या सोळा वर्षाचा तरुण शिरीषकुमार आणि त्याचे साथीदार इंग्रजांशी लढताना धारातीर्थी पडले होते. ९ सप्टेंबर १९४२ या दिवशी शिरीषकुमारने इंग्रजांविरुद्ध असहकार पुकारत मोर्चा काढला होता. 

शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता हा तरुण त्याची मातृभाषा गुजरातीत 'नही नमशे नही नमशे', निशान भारत भूमीनू,' असा जयघोष करत नंदुरबारच्या रस्त्यावर मोर्चा घेऊन जात होता. शाळकरी मुलांच्या या जयघोषाने गोऱ्या साहेबांचे धाबे दणाणले आणि त्यांनी शिरीषकुमारचा मोर्चा अडवला. हा मोर्चा इथेच समाप्त करा असा आदेश इंग्रजांनी दिला. पण गांधीजींच्या शिकवणीप्रमाणे मागे सरायचे नाही हे शिरीषकुमारने आधीच ठरवले होते. 

शिरीषकुमार आणि त्याचे साथीदार पोलिसांनी अडवले तरी भारतमाता की जय, वंदे मातरमचा जयघोष करतच होते. इंग्रजांनी चिडून काही मुलींवर बंदूक रोखली.  त्यावर, "मुलींवर काय गोळ्या चालवता? हिमत असेल तर माझ्यावर गोळ्या चालवा" असे बाणेदार उत्तर शिरीषकुमारने दिले.  त्यावर क्रूर इंग्रजांनी शिरीषकुमारवर एकामागून एक सलग तीन गोळ्या झाडल्या आणि शिरीषकुमार धारातीर्थी पडला.  इंग्रज तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी मोर्चेकरी मुलांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात १२ वर्षांचा धनसुखलाल शहा, १४ वर्षांचा लालदास, २० वर्षांचा शशिधर केतकर, तर केवळ ८ वर्षांचा घनश्याम शहा शहीद झाले. 

शिरीषकुमारच्या हौतात्म्याची बातमी देशभर पसरली आणि स्वातंत्र्य चळवळ अजून जोमाने वाढू लागली. देशासाठी बलिदान दिलेल्या त्या पांच तरुणांचे हौतात्म्य वाया गेले नाही. नंदुरबारमध्ये हुतात्मा स्मारक आजही नंदुरबारकरांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देत असतो.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required