रिव्हॉल्व्हर दादी- ८२ वर्षांची धाकड शार्पशूटर आजी

तर ही आहे चंद्रो तोमर, उत्तर प्रदेशातली ८२ वर्षांची आजी. साठीच्या पुढच्या आज्या गुडघे धरून बसतात, पण ही आजी आहे जगातली वयानं सगळ्यात मोठी पक्की नेमबाज शार्पशूटर..

ही आजी बंदूक चालवायला शिकली २००२मध्ये. ते ही अगदी योगायोगानं. तिच्या नातीला त्यांच्या गावी म्हणजेच ’जोहरी रायफल क्लब’मध्ये जायचं होतं. पण तिला एकटीला जायला भीती वाटत होती म्हणून चंद्रोआजी तिला सोबत म्हणून गेल्या. तिथंच आजींनी एक पिस्तुल उचलून समोरच्या निशाण्यावर नेम धरायला सुरूवात केली. कोच  तिच्या नेमबाजीनं चकितच झाले  आणि त्यांनी नातीसोबत आजींनाही रायफल क्लब जॉईन करायची ऑफर दिली. 

आजीबाईंना आहेत सहा मुलं आणि १५ नातवंडं.  इतकं वय झालं असलं तरी त्या घरचं स्वयंपाकपाणी, गाईगुरांचं दूध-चारा-पाणी बघतात आणि आठवड्यातून एकदाच रायफल क्लबला प्रॅक्टिस करायला जातात. तसं त्या घरच्या शेतातही मधूनमधून सराव करतातच. बंदूक चालवताना त्यांचा हात स्थिर राहतो आणि निशाणा पक्का साधला जातो.  चंद्रोबाईंनी आजवर २५हून अधिक नॅशनल चॅंपियनशिप्स जिंकल्या आहेत. एकदा तर म्हणे त्यांनी दिल्लीच्या डी. आय. जीं.ना नेमबाजीत हरवलंय. त्यांचं पाहून त्यांच्या  घरच्या आणि शेजारच्या मुली-सुना आणि आज्या बंदूक चालवायला शिकल्या आहेत.

चंद्रा तोमर आणि त्यांच्या जाऊबाई प्रकाशी तोमर..

फोटोस्त्रोत

चंद्रोबाईंची मुलगी सीमा तोमर ही ’रायफल आणि पिस्तुल वर्ल्ड् कप’  जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय. आजीबाईंची नात, नीतू सोळंकीसुद्धा काही कमी नाही. तीही इंटरनॅशनल नेमबाज आहे आणि हंगेरी-जर्मनी या देशांत तिनं आपल्या नेमबाजेची चुणूक दाखवली आहे. 

पाहा हां, अपनी छोरीयॉंही नहीं.. दादीयॉंभी छोरोंसे कम नहीं है!!

माहितीस्त्रोत- विकिपिडिया

सबस्क्राईब करा

* indicates required