computer

प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत तर हा रिक्षावाला फुकट सैर घडवतो, पण प्रश्न कसे असतात?

सामान्य माणसाच्या हातात काय आहे?’ असं म्हणून नेहमीच सामान्य माणसाच्या क्षमतेला, ताकदीला दुर्लक्षित केले जाते. पण मनात आणले तर सामान्य माणूसही आजूबाजूच्या परिस्थितीत काही चांगला बदल घडवून आणू शकतो. यासाठी खास काही न करता आपले आहे तेच काम वेगळ्या पद्धतीने केले तरी हे होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल पण नेमकं कसं? तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचवा लागेल.

सुरंजन कर्माकर हा बेंगालच्या लिलूहा गावाचा एक सामान्य रिक्षाचालक. रिक्षाचालकांशी लोक कशी घासाघीस करून कमी पैशात आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हुज्जत घालतात हे तुम्ही अनेकदा पहिले असेल किंवा कधी कधी तुम्हीही अशाप्रकारचं बार्गेनिंग केले असेल. तर या पद्धतीलाच फाटा देण्यासाठी सुरंजनने एक भन्नाट कल्पना शोधून काढली. सुरंजन इ-रिक्षा चालवतो आणि त्याच्या या रिक्षातून तो तुम्हाला फुकटात सैर करवून आणण्याचीही सूट देतो, पण कधी? जर तुम्ही त्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर...!

सुरंजन नावाच्या या अवलियाची जगाशी ओळख झाली ती संकलन सरकार नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्यामुळे. काही कारणाने संकलन आपल्या पत्नीसह लीलुहा गावी गेले होते. गावातून फिरण्यासाठी त्यांनी सुरंजनची टोटो (बॅटरीवर चालणारी रिक्षा) निवडली. रिक्षात बसता क्षणीच सुरंजनने त्याच्यासमोर आपली ही फ्री सफारीची भन्नाट ऑफर ठेवली. फ्री म्हटले की काही तरी गोलमाल असणारच अशी आपल्या सर्वांचीच कल्पना एव्हाना दृढ झाली आहे. संकलन यांनाही सुरुवातीला तसच काहीसं वाटलं. हा काहीही उलटसुलट प्रश्न विचारेल आणि आपण अडकलो की नेमके भाडे वाढवून मागेल.

पण त्यांच्या पत्नीला ही कल्पना आवडली आणि तिने होकार दिला. रिक्षाच्या प्रवासासोबतच प्रश्नोत्तराचा प्रवासही सुरू झाला. सुरंजन यांनी संकलन यांना विचारलेला पहिला प्रश्न होता, ‘जन-गण-मन अधि’ हे गाणे कुणी लिहिले?’ आपल्या राष्ट्रीय गाण्याला आपण जन-गण-मन एवढ्याच नावाने ओळखतो पण हा तर त्यात अधिसुद्धा जोडून आपली फिरकी घेत आहे, असा समज करून संकलन यांनी मोठ्या थाटात या प्रश्नाचे उत्तर देऊन सिक्स मारल्याचा आव आणला खरा, पण पुढच्याच प्रश्नावर त्यांची दांडी गुल झाली.
सुरंजन यांनी विचारलेला दुसरा प्रश्न होता, ‘बंगालचे पहिले मुख्यमंत्री कोण?’ कार्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या संकलन यांना कधीच या प्रश्नाची ओळख झाली नव्हती तरीही वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी बी. सी. रे हे उत्तर दिले, जे त्यांच्या दुर्दैवाने चुकीचे होते.

अर्थात चुकीचे उत्तर दिल्याने हा प्रश्नोत्तराचा प्रवास थांबला नाही त्यानंतरही तो सुरूच राहिला. अगदी श्रीदेवीच्या जन्मतारखेपासून ते जगातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीपर्यंत या प्रश्नावलीने कितीतरी घटकांना स्पर्श केला. पण संकलन यांना दुसऱ्याच प्रश्नावर जाणीव झाली होती की, ही परीक्षा खूप खडतर असणार आहे.

एक सामान्य रिक्षावाला आपली अशी फिरकी घेऊ शकतो तर आपण त्याचीच ही विद्या त्यालाच का शिकवू नये, अशा विचाराने संकलन यांनीही सुरंजन यांना काही प्रश्न विचारले आणि आता पुन्हा थक्क व्हायची वेळ होती ती संकलन यांचीच. कारण त्यांनी विचारलेल्या दोन तीन प्रश्नांचीही सुरंजन यांनी अगदी अचूक उत्तरे दिली होती.

सुरंजन यांचा दांडगा अभ्यास त्याच्या टोटोच्या आतल्या बाजूला लावलेल्या फोटोतूनही जाणवत होता. या ठिकाणी मैसूरचा सुलतान टिपू पासून ते अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीफन हॉकिंग, कल्पना चावला, मनोहर एच. अशा अनेक दिग्गज लोकांचे फोटो लावलेले होते. पुढे जाऊन सुरंजन यांनी दिलेली माहिती तर अजूनच थक्क करणारी आहे, जगातील सर्व महान लोकांची जयंती ते आठवणीने साजरी करतात आणि ज्या दिवशी संकलन आणि त्यांची भेट झाली तो दिवस टिपू सुलतान यांचा जन्मदिवस असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता तुम्ही म्हणाल इतका हुशार माणूस मग हा रिक्षा का चालवतो?

याचे उत्तर काय, तर नशीब!! दुर्दैवाने लहानपणीच घरची जबाबदारी खांद्यावर पडल्याने सुरंजन यांना सहावीतून शाळा सोडावी लागली. त्यांनी शाळा सोडली पण अभ्यास नाही. घरचा चरितार्थ चालवण्यासाठी आवश्यक ते काम दिवसभर केल्यानंतर ते रात्री २.०० पर्यंत वाचन करत असत. त्यांनी आपली वाचण्याची ही आवड आणि सवय आजही जपली आहे. या वाचनातूनच त्यांनी हे प्रगाढ ज्ञानकण जमा केले आहेत. इतकेच नाही तर लीलुहा गावामध्ये दरवर्षी एक पुस्तक जत्रा भरते. सुरंजन या समितीचे सदस्य आहेत.

ज्ञान घेण्यासाठी चार भिंतीची शाळाच गरजेची आहे, असे कुठल्या शास्त्रात सांगितलं आहे? सुरंजन यांच्या या जिद्दीवरून तुम्हालाही हे पटले असेल.
सुरंजन म्हणजे फक्त ज्ञानाचे प्रतीक नाही तर ते भारताच्या सर्वधर्मसमभावाच्या तत्वाचेही जिवंत आणि मूर्तिमंत प्रतीक आहेत. ते धर्माने हिंदू असले तरी सर्व धर्मीय सण तितक्याच आत्मीयतेने साजरे करतात. कधी कधी मुस्लीम धर्मीय वापरतात तशी गोल टोपीही परिधान करतात. पेहराव कुठलाही असला तरी आत्मा भारतीय असल्याचे ते अभिमानाने सांगतात. म्हणूनच त्यांना ‘अद्भुत रिक्षावाला’ या टोपणनावानेही ओळखले जाते.

सामान्य मनुष्य आपल्या रोजच्या कामातून कशाप्रकारे एक वेगळेपणा जपू शकतो आणि त्यातून सुशिक्षित लोकांनाही महान संदेश देऊ शकतो तो सुरंजन यांच्या या उदाहरणावरून लक्षात येते. सकारात्मक संदेश देणारे अनेक फोरवर्ड्स तुम्ही रोज वाचत असाल, पण असे जिवंत उदाहरण रोज रोज वाचायला ऐकायला मिळत नाही. एका सामान्य माणसाची ही असामान्य गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required