computer

१९ वर्षांचा मुलीचा उच्चभ्रू वस्तीतला निर्घृण खून! इतका भीषण होता की खुन्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली!!

या मालिकेत आम्ही भारत आणि जगभर झालेल्या, गाजलेल्या खूनखटल्यांचा मागोवा घेणार आहोत. आजची घटना आहे श्रीलंकेतली.

'रॉयल पार्क मर्डर' हे नाव अगदी हॉलिवूड सिनेमाला शोभेल असे वाटते ना? पण हे नाव कुठल्याही काल्पनिक कथेला दिले नसून हे हत्याकांड खरोखर घडले आहे. २००५ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे अख्खे श्रीलंका हादरून गेले होते. एका १९ वर्षीय मुलीचा इतका भीषण खून करण्यात आला होता की अंगावर काटा येईल. आज पाहूयात काय घडले होते?

यव्होन जॉन्सन आणि कॅरोलिन जॉन्सन या स्वीडिश बहिणी आपल्या आई वडिलांसह श्रीलंकेत राहत होत्या. आई श्रीलंकन आणि वडील स्वीडिश. आईचे नाव चामलका सपरमाडू जॉन्सन आणि त्यांचे वडील रॉजर जॉन्सन. रॉजर जॉन्सन पहिल्यांदा श्रीलंकेत १९७५ मध्ये पर्यटक म्हणून आले होते. चामलकाच्या प्रेमात पडून ते श्रीलंकेत कायमचे स्थायिक झाले. तिथे त्यांनी दोन रबर उत्पादन कंपन्या सुरू केल्या आणि ते यशस्वी झाले. श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव झाले. यव्होनचा जन्म १५ ऑगस्ट ८५ रोजी झाला. तिची धाकटी बहीण कॅरोलिन ही तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. यांनी कोलंबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हे कुटुंब रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स येथे आलिशान घरात राहत होते. रॉयल पार्क ही कोलंबोमधील श्रीमंत लोकांची लक्झरी सोसायटी आहे.

१ जुलै २००५ रोजी, एका महिलेला सकाळी रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्सच्या पायऱ्या चढत असताना अचानक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलीचा मृतदेह दिसला. ते पाहून तिला धक्काच बसला. तिने अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मॅनेजरला तात्काळ याची माहिती दिली. त्याने ती मुलगी यव्होन जॉन्सन आहे हे ओळखले. तिची जीन्स तिच्या घोट्यापर्यंत खाली ओढली गेली होती आणि तिच्या गळ्यात गुंडाळली गेली होती. काही वेळात ही बातमी "रॉयल पार्क मर्डर" या शीर्षकाखाली श्रीलंकेत वाऱ्यासारखी पसरली.

चामलका आणि कॅरोलिन अपार्टमेंटमध्ये परतले तेव्हा त्यांना अपार्टमेंटच्या गेटजवळ पोलिसांची जीप दिसली. ती वरच्या मजल्यावर गेली. तिथे तिला तिच्या घराच्या दारासमोर उभे असलेले अनेक पोलीस अधिकारी भेटले. चामलका घाबरली. एका पोलिस अधिकाऱ्याने यव्होनचे ओळखपत्र दाखवले आणि चामलकाला विचारले की तिला यव्होनबद्दल माहिती आहे का. त्या क्षणी चामलका आणि कॅरोलिन यांना यव्होनच्या भीषण हत्येबद्दल कळले. पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला.

त्या रात्री काय घडले होते?

३० जून २००५ रोजी यव्होन, कॅरोलिन आणि श्रमंथा या सर्वांना एका मित्राने पार्टीसाठी आमंत्रित केले होते. श्रमंथा जयमाहा हा त्यांचा बालपणीचा जिवलग मित्र. जयमाहा आणि जॉन्सन ही दोन्ही कुटुंबे जिवलग मित्र होते. यव्होन, कॅरोलिन आणि श्रमंथा यांनी एकत्र कोलंबो इंटरनॅशनल स्कूलमध्येही शिक्षण घेतले. श्रमंथा हा एका श्रीमंत घरातला मुलगा, त्याचे वडील कोलंबोमधील एक प्रसिद्ध व्यापारी होते. आईवडिलांचा घटस्फोट झाल्याने श्रमंथा आपल्या वडिलांसोबत कोलंबोच्या बागताळे रोडवर राहत होता. यव्होन आणि श्रमंथा एकाच वयाचे होते. कॅरोलिन आणि श्रमंथा प्रेमात पडले होते. यव्होनला हे आवडत नव्हते कारण श्रमंथा खूप विचित्र स्वभावाचा होता. लहापणापासूनच तो बंडखोर वृत्तीचा आणि लाडावलेला होता. यव्होनने बऱ्याच वेळा कॅरोलिनला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले, पण तिने ऐकले नाही.

३० जूनच्या रात्री ८.३० वाजता यव्होन, कॅरोलिन या दोघी त्यांच्या कारमधून अपार्टमेंटमधून बाहेर पडल्या. त्यांनी श्रमंथाला त्याच्या घरातून पीक अप केले. त्यानंतर ते कोलंबोतील नवाम मावाथा येथील व्हाइट हॉर्स या लोकप्रिय पबमध्ये गेले. तिथे त्यांना त्यांचे चार मित्र भेटले. पुढे यव्होन, कॅरोलिन आणि श्रमंथा यांनी बार-हॉपिंग सुरू केले.

व्हाईट हॉर्समधून ते कोलंबोच्या गॅले-फेसवरील दुसर्या क्लब ग्लोमध्ये गेले. त्यानंतर ते कोलंबोच्या हिल्टन हॉटेलमध्ये ब्लू एलिफंटकडे गेले. तिथे त्यांना एक कोरियन मुलगी भेटली जी जॉन्सनच्या कुटुंबाची मैत्रीण होती. रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्समध्येही ती राहत होती. त्यानंतर ते चौघे हिल्टन हॉटेलमधील ब्लू एलिफंटकडे परत गेले. हिल्टन हॉटेलमध्ये कॅरोलिन आणि श्रमंथा यांचा वाद झाला. कॅरोलिन रडत होती. यव्होनने चिडून श्रमंथाला दोष दिला. ती त्याला खूप बोलली. कॅरोलिनला घरी परत जायचे होते. यव्होननंतर कोरियन मित्रासह हिल्टनमधून ग्लोला गेले, तर कॅरोलिन आणि श्रमंथा हिल्टन हॉटेलच्या कॅबने १ जुलैच्या पहाटे २ वाजता रॉयल पार्क कम्युनिटी कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. ते दोघेही कॉम्प्लेक्सच्या २३व्या मजल्यावर असलेल्या कॅरोलिनच्या घरी गेले होते. नंतर श्रमंथाने कॅब बोलावली. यव्होन पहाटे २:५० वाजता रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्समध्ये पोहोचली. पण तिथे श्रमंथाला ती दिसली आणि त्यांच्यात वाद झाले. चिडून श्रमंथाने यव्होनची निर्घृण हत्या केली. यव्होनचा मृतदेह १९ व्या मजल्यावर पायऱ्यांच्या पायथ्याशी पडला होता. तिच्या गळ्यात पँट बांधलेली होता. तिचा चेहरा फ्रॅक्चर होईपर्यंत श्रमंथाने तिच्या डोक्यावर वार केले होते.

त्यानंतर तिला तसेच टाकून श्रमंथाने त्याचा मित्र रिल्वनला रॉयल पार्कच्या तळघरात बोलावले. पहाटे ३:२५ ते ३:३० च्या दरम्यान रिल्वन आला तेव्हा त्याला श्रमंथा दिसला नाही. त्यानंतर लॉबीत त्याने श्रमंथाला बाहेर पडताना पाहिले . त्याच्या हातात दुमडलेली पॅन्ट होती तो घाबरलेला होता. रिल्वनला थोडीशी शंका आली होती तरीही त्याने त्यावेळी श्रमंथाला विचारले नाही. श्रमंथा घरी गेला.

या हत्याकांड प्रकरणाचा सीआयडीने तातडीने तपास सुरू केला. त्यांनी श्रमंथा वगळता सर्व मित्र आणि कुटुंबीयांची चौकशी केली. त्या दिवशी श्रमंथा आणि त्याचे कुटुंब कोलंबोमध्ये नव्हते. २ जुलै रोजी सीआयडीने शफराज रिल्वान मोहम्मद म्हणजे श्रमंथाच्या मित्राची चौकशी केली. त्याच्याकडून श्रमंथाची माहिती मिळाल्याने पोलिसाचा संशय बळावला. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. श्रमंथाविरुद्ध पुरावे मिळण्यास सुरुवात झाली. सीआयडीला रेलिंगवर त्याच्या हाताचे ठसे सापडले. त्यांच्यात भांडण झाल्याचा पुरावा ही सापडला. रिल्वन, कॅरोलिनच्या जबानीत त्याची विचित्र वागणूक, त्याचा राग सगळ्या गोष्टी बाहेर आल्या.

त्याच्या अटकेनंतर श्रमंथाला कोलंबोच्या उच्च न्यायालयात यव्होन जॉन्सनच्या हत्येसाठी श्रमंथाला दोषी ठरवले. २८ जुलै २००५ रोजी कोलंबोच्या उच्च न्यायालयाने त्याला १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने त्याला ३00,000 श्रीलंकन ​​रुपयांचा दंड ठोठावला. श्रमंथा अपील करत होता. पण ११ जुलै २०१२ रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. २०१४ मध्ये श्रमंथाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात अपील केले. तेही अपील निष्फळ ठरले आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज मागितला आणि ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी श्रमंथा जयमाहा याला मैत्रीपाल सिरिसेना यांनी माफी दिली. त्याचे तुरुंगात वर्तन चांगले होते म्हणून तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर ही बरीच चर्चा झाली.
बौद्ध धर्मगुरू वेन रथना थेरो, वेन बड्डेगामा समिता थेरो आणि वेन डॉ केराडेवाला पुन्नरथना नायके थेरो यांच्या शिफारशींच्या आधारे त्याला माफी मंजूर करण्यात आली असे म्हणतात. तर काहीजण राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे शक्य झाले असे म्हणतात.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required