computer

कांद्यावर ८ वर्षे संशोधन करून स्वतःचं नवीन बियाणं तयार करणाऱ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची गोष्ट !!

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये अनेक तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. शेतात नवीन प्रयोग करून आपले पिक कसे सकस होईल हा त्यांचा प्रयत्न असतो. असाच एक  यशस्वी प्रयोग पुण्यातल्या दौंड तालुक्यातील तरुण शेतकरी संदीप घोले यांनी केला. त्यासाठी त्यांना नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराने गुजरात येथे सन्मानित करण्यात आले आहे. काय काही हा प्रयोग? पाहुयात आजच्या लेखात.

संदीप घोले हे पुणे जिल्ह्यातील असलेल्या दौंड तालुक्यामधील पाटस गावाचे रहिवाशी आहेत. बारावीनंतर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना बाहेरुन आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले. त्यांनीही पारंपारिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. तिथे उसाची शेती केली जायची. पण काहीतरी वेगळं करावं असं मनाशी ठरवून त्यांनी कांदा शेतीकडे आपला मोर्चा वळवला. मात्र कांदा पीक नाशवंत असल्यामुळे शेतकरी कमी दरातही कांदा विकून टाकतो हे त्यांच्या लक्षात आले. फेकण्यापेक्षा कमी दरात विकेलेला बरा, असा कांदा उत्पकदांचा विचार असतो.

घोले यांनी यावरच लक्ष केंद्रित करून कांदा जास्त कसा टिकेल यावर अभ्यास सुरू केला. त्यांच्या लवकरच लक्षात आलं की कांदा टिकण्याची क्षमता ही बीजावर अवलंबून असते. बहुतेक वेळा बियाणे निकृष्ट प्रतीचे असायचे त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. मग संदीप यांनी या सर्व बाबींच्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला. तब्बल ८ वर्षे संशोधन करून पुना फुरसुंगी जातीतून कांद्याची नवी जात तयार करण्यात त्यांना यश मिळालं. संदीप यांची सुमारे १२ एकर शेती आहे. त्यात प्रत्येकी चार एकर ऊस व चार एकर कांदा असतो. ज्या भागात कांदा पीक घेतले जात नाही त्या भागात त्यांनी ८० टक्के शुद्ध कांदा बीज तयार केले आणि अख्या देशात आपलं नाव पोहोचवलं. ‘संदीप प्याज’ असं नाव त्यांनी या नवीन जातीला दिले आहे.

संदीप प्याज याची वैशिष्ट्य काय आहेत ही पाहुयात

या जातीचा कांदा अधिक काळ टिकतो. याच्या बीजनिर्मितीसाठी सिंगल रिंगच्या कांद्यांची निवड करण्यात आल्यामुळे या कांद्यात ओलसरपणा कमी असतो. त्यामुळे हा लवकर खराब होत नाही.

संदीप प्याज या बियाणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती इतर जातीपेक्षा अधिक आहे. कारण कांदा बीज निर्मितीसाठी चांगल्या गुणवत्तेच्या कांद्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे या कांद्यावर करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.

संदीप प्याजचे कांदे हे फक्त ४ महिन्यात काढणीला येतात. यामुळे संदीप प्याजची काढणी ही ठरलेल्या वेळेत येत असल्याने याला सर्वाधिक मागणी होत आहे.

हा कांदा चवीलाही चांगला असल्याने या कांद्याला बाजारातही मागणी अधिक आहे. यासह या कांद्याचा आकर्षक लाल रंग असल्यामुळे ग्राहकही आकर्षित होतो.

घोले हे ऊस पट्ट्यातील शेतकरी आहेत. त्यांच्या परिसरात कांदा पीक सहसा घेतलं जात नाही. संदीप प्याज बियाणांच्या लागवडीतून दर हेक्टरी ३७.५ टन इतकं उत्पन्न येते. दापोली येथील कृषी विद्यापीठात संदीप घोले यांच्या कांदा बियाणांची चाचणी झाली आणि त्या चाचणीत संदीप प्याज पहिल्या क्रंमाकावर आला. त्यांचे बीज महाराष्ट्र राज्याबरोबरच  इतर राज्यांतही लोकप्रिय झाले आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संदीप यांच्या कांदा बियाण्याची चाचणी झाली आहे. त्यात संदीप प्याज हेक्टरी ३७. ५ उत्पादनासह पहिल्या क्रमाकांवर आले होते.आपल्या यशाचे श्रेय ते राहुरी जवळ मानोरी येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय वने गुरुजी यांना देतात. विविध प्रयोग करण्याचे प्रोत्साहन त्यांनीच दिल्याचे संदीप सांगतात. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे वाढवता येईल यावर त्यांचा भर असतो. संदीप यांनी केलेल्या धाडसी प्रयोगामुळे आज अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल.

संदीप यांनी उसाच्या उत्पादनातही यश मिळवले आहे. त्यांनी एक  एकर शेतीमध्ये १०९ टन उत्पादन करून एक महत्वाचा पल्ला गाठला आहे. संदीप यांनी हा यशस्वी प्रयोग फक्त स्वतःपुरता न ठेवता त्यांनी इतर शेतकऱ्यांबरोबरही शेयर केला आहे. इतर शेतकऱ्यांना देखील व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियाद्वारे ते पीक सल्ला आणि पाणी व्यवस्थपानविषयी माहिती देतात.

महाराष्ट्रातल्या धाडसी तरुण शेतकरी संदीप घोले यांना पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required