पेरूच्या डोंगराळ भागात २००० वर्ष जुनं मांजरीचं चित्र सापडलंय... वाचा प्राचीन 'नाझका लाईन्स'बद्दल !!

माणसाला चित्र काढण्याची कला आदिम काळापासून अवगत होती हे आता सर्वज्ञात आहे. जगभरातल्या मानवसमूहांमध्ये चित्र काढण्याच्या पद्धतीत वेगळेपणा दिसून येतो. भित्ती चित्रे, भांड्यांवर केलेली कलाकुसर किंवा दगडावर चित्र कोरण्याची कला, अशा विविध पद्धती दिसून येतात. असाच एक प्रकार पेरू देशात आढळून येतो. या देशात मोठ्या जागेवर भल्यामोठ्या अकराची चित्रं आढळून आली आहेत. ही चित्रं जमिनीवरून पाहिल्यास फक्त रेघोट्या वाटतात, पण आकाशातून पाहिली की या फक्त रेघोट्या नसून कलाकृती आहेत हे पटतं. मग आपण मनोमन विचार करतो की आदिम काळात मानवाने ही चित्र तरी काढली कशी?
ही चित्रं नाझका शहरात आढळून आल्याने त्यांना नाझका लाईन्स म्हणून ओळखलं जातं.
आज नाझका लाईन्सची आठवण काढण्या मागचं कारण असं की याच धर्तीवर एक नवीन चित्र शोधण्यात आलं आहे. हे चित्र एका मांजरीचं आहे. सध्याच्या माहितीनुसार हे चित्र इसविसनपूर्व २०० ते १०० या काळात काढण्यात आलं होतं. या चित्राचा आकार ३७ मीटर एवढा आहे. डोंगराच्या उतारावर हे चित्र आढळून आलं आहे.
नाझका लाईन्सच्या चित्रसमूहात आढळलेली चित्रं प्राणी, झाडे आणि इतर वेगवेगळे आकार दाखवतात. खास करून प्राणी हे नाझका लाईन्सचं वैशिष्ट्य आहे. जगभरात अशा फार कमी ऐतिहासिक जागा आहेत जिथून अजूनही नवनवीन शोध लागतायत. नाझका लाईन्स त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या भागात बरीच नवीन चित्रे आढळून आली आहेत. पुढच्या काही वर्षातही सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मांजरीच्या चित्राने जगभर हवा करण्या कारण म्हणजे अनेक कॅट लव्हर्सना हे चित्र बेहद आवडलंय.बोभाटाच्या वाचकांना हे चित्र कसं वाटलं नक्की सांगा.