computer

या आजीआजोबांनी तर अवघ्या १६ दिवसांत पुणे ते कन्याकुमारी अंतर पार करून दाखवलं !!

एकेकाळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. जसजसे शहर वाढले वाहतूक वाढली, तशी ही सायकल कुठेतरी कोपऱ्यात जाऊन धूळ खात पडली. पुण्याची ही ओळख पुसली जाते का काय अशी भीती असतानाच एका तरुण सिनिअर्सच्या ग्रुपने एक अनोखी कामगिरी केली आहे. पुणे ते कन्याकुमारी हे १६००किमीचे अंतर ८ सीनिअर सिटीझन्सनी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण केले आहे. तेही कोणत्याही वाहनाशिवाय. फक्त सायकलवर स्वार होऊन त्यांनी हे ध्येय गाठले आहे.

अनिल पिंपळीकर ( वय - ७०), प्रकाश टेंभेकर ( वय - ६१), अविनाश मेढेकर ( वय - ६३), संजय जोशी ( वय - ६२),मिलिंद सैंदाणे ( वय - ६३), दत्ता गोखले (वय - ६३), प्रदीप  भवाळकर ( वय - ६५) आणि पद्माकर आगाशे ( वय - ६८) अशी या तरुण सिनिअर्सची नावे आहेत. पुण्यात यंग सिनियर्स नावाची संस्था आहे जिथे ५०-८० वयोगटाचे जेष्ठ मंडळी सायकलिंग करतात. त्यांच्यातर्फे हे आठजण प्रवासाला निघाले. ५ जानेवारीला ते पुण्याहून निघाले आणि कन्याकुमारीला १८ जानेवारीला पोहोचले. एकूण १६०० किमीचे अंतर त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्याबरोबर एक वैद्यकीय तज्ञांची टिमदेखील होती. सायकलिंग द्वारे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण जागृतीही त्यांनी केली.

पुण्यात परत सायकलचा सुवर्ण काळ परत यावा या उद्देशाने त्यांनी ही सायकलिंग मोहीम केल्याचे त्यांनी सांगितले. दररोज त्यांनी १२५-१३० कि.मी.चा प्रवास केला. प्रवासात त्यांचा उत्साह बघून अनेकजण चकित झाले. याआधीही त्यांनी पुणे ते पंढरपूर, पुणे ते नाशिक, पुणे ते मुंबई हा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. त्या मोहिमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकलवर जायचे ठरवले. मोहिमेत उत्तम नियोजन केल्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. हे सगळे साठीच्या वर असूनही एकालाही कुठलीच शारिरीक व्याधी नाही.

सायकलिंगमुळे तब्येत ठणठणीत राहते आणि उत्साहही वाढतो. पण या वयात या सिनिअर्सनी केलेली कामगिरी पाहून थक्क व्हायला होतं. सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. ' Age is just a number ' हे खरोखरच त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

त्यांच्या या जिद्दीला बोभाटाकडून सलाम.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required