computer

सात वर्षांच्या जन्नतबद्दल तिच्याच पुस्तकात चक्क धडा आहे!! काय करतेय ही चिमुरडी?

चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला वयाचं किंवा स्थळकाळाचं बंधन नसतं. याचीच प्रचिती जन्नत तारीक या सात वर्षाच्या काश्मिरी मुलीकडे पाहिल्यावर येते. खरंतर तिचं वय बाहुल्या, खेळणी आणि भातुकली यात रमण्याचं. पण प्रत्यक्षात ती करतेय एक महत्त्वाचं काम. तिच्या लाडक्या दल सरोवराची साफसफाई.

हो, तेच ते दल सरोवर. काश्मीरच्या सर्वांगसुंदर सौंदर्यात भर घालणारा राजस मुकुटमणी. कोणे एके काळी नितळशंख पाण्यासाठी हे सरोवर प्रसिद्ध होतं. त्यावर तरंगणारे शिकारे, त्यातला रंगांची उधळण असलेला तरंगता बाजार त्याच्या सौंदर्याला चार चाँद लावत. सिनेमातली कितीतरी गाणी या सरोवराच्या विहंगम पार्श्वभूमीवर चित्रित केली गेली. काश्मीरला भेट देणार्‍या पर्यटकांना या सरोवराने भुरळ घातली आणि त्यांचा ओघ सतत वाढत राहिला.

मात्र त्या जोडीला दुसरी एक समस्या उभी राहिली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांनी केलेल्या कचर्‍यामुळे या सरोवराचं पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालं. त्याची चव बदलली, गुणवत्ताही घसरली. प्रदूषणामुळे अनावश्यक तण वाढलं आणि सरोवराचा गळाच घोटला गेला. २२चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या तलावात आता निम्म्याहून अधिक क्षेत्र पाणवनस्पतींनी आणि तणाने, तसंच अतिक्रमणांनी व्यापलं आहे. या सगळ्याबद्दल केवळ आरडाओरड न करता जन्नत तिच्या वडिलांसह प्रत्यक्ष साफसफाईसाठी पुढे झाली आहे.

जन्नत ही श्रीनगरमधील लिंटन हॉल स्कूलची विद्यार्थिनी. गेल्या दोन वर्षांपासून, म्हणजे सन २०१८ पासून तिची ही मोहीम सुरू आहे. दर रविवारी ती आपले वडील तारीक अहमद पतलू यांच्याबरोबर शिकार्‍यात बसून बाहेर पडते. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ती आता शिकाराही उत्तम चालवते. सफरीदरम्यान ती तलावातला कचरा गोळा करते. त्यात अनेकदा रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या आणि पॉलिथिनच्या बॅगा असतात, तर कधी रिकामे डबे, खाद्यपदार्थांची रॅपर्स आणि सिगारेटची पाकिटंही असतात. वापरलेले शूज, अंडरगारमेंट्स, इतर कपडे, चिप्सची रिकामी पॅकेट्स असा कचराही कधीकधी प्रकटतो. हे पाहून त्या कोवळ्या वयाच्या मुलीवर काय संस्कार होत असतील! ती मात्र या सगळ्याला आता सरावली आहे. कदाचित त्यामुळेच ती स्थितप्रज्ञतेने आपल्याकडील मासेमारीच्या जाळ्याच्या साहाय्याने हा सर्व कचरा बाहेर काढते आणि शिकार्‍यामध्ये तात्पुरता साचवून ठेवते. नंतर तो सर्व कचरा कचरापेटीत जातो आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते.

या सगळ्यामागचा हेतू एकच: दल सरोवराला परत एकदा पूर्वीचं सौंदर्य प्राप्त करून देणं.

दल लेकमध्ये कचरा टाकणार्‍या लोकांचा तिला सर्वात जास्त त्रास होतो. कधी कुणी त्यात प्लास्टिकच्या बाटल्या टाकत असेल तर ती अशांना तसं करण्यापासून रोखते. कधी समजावून सांगते, तर कधी ओरडतेसुद्धा. हे सांगून खरं वाटणार नाही, पण एकदा एका पर्यटकाला तिने रस्त्यावरून परत येण्यास भाग पाडलं होतं आणि त्याने सरोवरात फेकलेली प्लास्टिकची बाटली बाहेर काढायला लावली होती!

जन्नतचे वडील तारीक अहमद पतलू या सगळ्यात तिच्याबरोबर आहेत. ते स्वत:ही असेच. दल लेकमधून फिरताना ते शक्य होईल तितका कचरा स्वत:च्या हाताने गोळा करत. त्यांनी फेसबुकवर ‘मिशन दल लेक’ हे पेजदेखील सुरू केलं. तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारने किमान तलाव परिसरात तरी दारूबंदी करावी, असं त्यांचं मत आहे. त्यांना स्वत:ला याबद्दलची प्रेरणा एका विदेशी पर्यटकाकडून मिळाली.

त्याचं असं झालं, ते एकदा एका विदेशी पर्यटकाबरोबर नावेतून जात होते. त्यावेळी तो सिगारेट ओढत होता. मात्र ओढून झाल्यावर त्याने ते थोटूक सरोवरात न टाकता एका कागदाच्या तुकड्यात गुंडाळलं आणि खिशात ठेवलं. त्या घटनेने तारीक यांना जणू नवीन दृष्टी दिली. त्यांना हे जाणवलं, की दल लेक स्वच्छ राखण्याची आपलीही जबाबदारी आहे. मग त्यांनी तलावातला कचरा गोळा करायला सुरुवात केली. हे सगळं बघून छोट्या जन्नतला प्रेरणा मिळाली आणि यथावकाश तीही त्यांना येऊन मिळाली. तिची वयाच्या मानाने असलेली समज कुणालाही थक्क करेल अशी आहे. तारीक यांना जन्नतचा अभिमान वाटतो तो यासाठीच. भविष्यात आपल्या मुलीने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामाला वाहून घ्यावं आणि तलाव स्वच्छ ठेवण्याचं काम नेटाने सुरू ठेवावं अशी त्यांची इच्छा आहे.

सुदैवाने जन्नतला तिच्या कामाची पावती मिळत आहे. शाळेच्या पाठ्यपुस्तकात चक्क तिच्यावर आधारलेला ‘जन्नत की जन्नत’ हा धडा समाविष्ट केला गेला आहे. या धड्यात तिच्या या कामाची ओळख करून दिली गेली आहे. ही खरी प्रसिद्धी. एरवी पेपरमध्ये नाव आलं, तरी मुळात पेपरचंच आयुष्य एक दिवसाचं असतं. त्यामुळे ती प्रसिद्धीही अल्पायुषी असते. इथे मात्र पुस्तकात तिच्या नावाचा समावेश झाल्याने ती बराच काळ लोकांच्या, विशेषत: मुलांच्या, स्मरणात राहणार आहे. शाळकरी मुलांना प्रेरणा देत राहणार आहे. त्यातून मुलांना स्वच्छतेचं, पार्यावरण जपण्याचं महत्त्व तर पटेलच आणि कदाचित अजून काही श्वास कोंडलेले नद्यानालेही परत मोकळा श्वास घेऊ लागतील. सध्या निदान अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?

 

लेखिका : स्मिता जोगळेकर