computer

आपल्याच सोसायटीतल्या बाईंचा फोटो वापरुन फेसबुकवरून शेजाऱ्यांनाच ब्लॅकमेल करण्याचा किस्सा!! यातून तुम्ही काय धडा घ्याल?

सध्या डिजिटल लुटालुटीला मोठा पेव फुटलं आहे. अनेकजण स्मार्टफोन आणि सोशलमीडिया तर वापरतात, पण त्यांना यातल्या खाचाखोचा माहीत नसतात, त्यांच्या या सापळ्यात अडकवणे सोपे असते. अनेकवेळेस माहीत असूनही काही लोक मोहात अडकतात. मेहनत करायची दानत नसलेले लुटीचे नवनवे मार्ग असेही शोधतच असतात.

मुंबईत बोरिवलीमध्ये एकाने तर चक्क आपल्याच सोसायटीतील डझनभर लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीच्या नावे अकाउंट उघडायचे आणि एखाद्याला अश्लील मॅसेज पाठवायचे. त्याने तसा रिप्लाय दिला की तोच स्क्रीनशॉट घेऊन त्याला ब्लॅकमेल करायचे किंवा एखादी मुलगी हाताशी धरून त्याला थेट अश्लील व्हिडिओ कॉल करून ती रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी द्यायची असा हा प्रकार आहे.

या केसमध्ये सुशांत तळाशीकर नावाचा एक तरुण तिशी आली तरी बेरोजगार होता. या नैराश्यातुन तो काहीतरी मेहनत करून पैसे कमावण्यापेक्षा भलत्याच नादाला लागला. एखाद्या क्राईम पेट्रोलचा एपिसोड वाटावा अशी ही पूर्ण स्टोरी आहे. या स्टोरीचे पूर्ण कथानक त्याच्या सोसायटीच्या बाहेर जात नाही.

या तरुणाने सोसायटीमधल्याच एका महिलेचा फोटो वापरून फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. सोसायटीमधील एका ५२ वर्षीय गृहस्थाला त्याने मग या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सोसायटीमधीलच महिला असल्याने त्यांनी ही रिक्वेस्ट घेतली. या अकाऊंटवरून मग "जे१ झाले का?" पासून चॅटिंगला सुरुवात झाली आणि त्यांनी व्यवस्थित रिप्लाय दिल्यावर मग इकडून अश्लील मॅसेज सुरू झाले.

पुढची पायरी म्हणजे धमकवण्याची. जर का १२,००० रुपये पाठवले नाही तर हे स्क्रीनशॉट तुझ्या घरी पाठवेन अशी ती धमकी. त्याने हा सापळा एकाच व्यक्ती साठी रचला नव्हता, तर सोसायटीतील जवळपास १२ लोकांसोबत तो अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता. ज्यांनी १२,००० दिले त्यांना अजून १०,००० देण्याची मागणी करण्यात येऊ लागली.

आता या काळात ज्या महिलेचा फोटो वापरून तो हे सर्व करत होता, त्यांना सोसायटीतील काही लोकांनी या प्रकाराची खबर दिली होती. या सर्व प्रकाराने त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगोलग पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी अकाऊंटधारी व्यक्तीला पैसे घ्यायला बोलावले आणि त्या ठिकाणी सापळा रचून त्याला बरोबर उचलले.

१० वी पर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण याआधी कुठलाही गुन्हा न केलेला किंवा केस दाखल न झालेला असला तरी त्याने निवडलेला गुन्हेगारीचा हा मार्ग त्याला आयुष्यात पुन्हा स्थैर्य मिळू देणार नाही. म्हणून पैसे कमविण्याचे शॉर्टकट शोधण्यापेक्षा मेहनतीवरच भर द्यायला हवा.

सध्या अशाप्रकारे लूट करण्याचे प्रकार सगळीचकडे आणि वेगाने वाढत आहेत. अशावेळी एखाद्या ओळखीच्या असो की अनोळखी महिलेच्या अकाऊंटवरून मॅसेज आला तर पुरेशी खात्री केल्याशिवाय बोलणे करूच नये. या लुटीचा एक फॉर्म्युला असतो तो म्हणजे आधी विश्वासात घ्यायचे आणि मग फसवणूक करायची.

फेसबुक किंवा व्हाट्सअपवर थोडं फार बोलणं झालं की थेट अश्लील व्हिडिओ कॉल करायचा, तो रेकॉर्ड करायचा आणि मग ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. एकतर असे मेसेजकडे प्रत्येकाने दुर्लक्ष करायलाच हवे. पण जर चुकून कोणी या सापळ्यात अडकला तर त्याने पैसे देऊन विषय मिटवण्याचा प्रयत्नही करू नये. थेट पोलीस स्टेशन गाठावे.

कारण एकदा पैसे दिले तरी विडिओ डिलीट होत नसतो. ते परत परत पैसे मागतात आणि या गोष्टीला अंत नसतो. सध्या अशी इतकी प्रकरणे समोर येत आहेत की पोलीस देखील यात सापडलेल्या माणसाला दोष न देता ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढतात. या विषयी वेळोवेळी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्याविषयी माहिती देण्यात येत असते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required