शशी कपूर : वाचूया तेजस्वी तार्‍याचा जीवनप्रवास...

तुम्हाला त्या 'एक था गुल और एक थी बुलबुल' गाण्यातला तो हसरा चेहरा आठवतोय ना? 'मेरे पास मां है' म्हणणारा तो घनगंभीर आवाज आठवतोय ना? का नाही आठवणार... शशी कपूर या नावाने सिनेरसिकांच्या मनावर घातलेली भुरळ ही कधीही न संपणारी आहे. पण तो महान, सदाबहार कलाकार मात्र आपल्यातून निघून गेलाय. प्रदीर्घ आजाराने ४ डिसेंबर, २०१७ रोजी शशी कपूर यांचं वयाच्या ७९व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा आम्ही घेतलेला हा संक्षिप्त आढावा.... 

शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कलकत्त्यात झाला. हिंदी सिनेमाचे पितामह पृथ्वीराज कपूर हे शशी कपूर यांचे वडिल. त्यामुळे अभिनय हा त्यांच्या रक्तातच भिनलेला होता. आईचं नाव होतं रामशरणी कपूर. त्यांच्या चार अपत्यांपैकी शशी हे सर्वात लहान अपत्य. आपले भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर या दोघांसोबत शशी कपूर यांनीही अभिनय क्षेत्राचीच वाट पकडली. 

स्त्रोत

राज कपूरचं खरं नाव रणबीरराज, शम्मीचं समशेरराज, तसं शशीचं खरं नांव बलबीरराज!! अभिनयाची आवड असलेल्या  या बलबीरला  शाळेतल्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण आपल्याच वडिलांच्या 'पृथ्वी थिएटर्स' मधून त्यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. 'शकुंतला' नावाचं ते नाटक त्यांच्या करियरचा श्रीगणेशा होता. पुढे त्यांनी संग्राम, समाधी या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.

शशी कपूर यांचं लग्नही थोडं वेगळ्या पध्दतीने झालं. पृथ्वी थिएटर्समध्ये काम करतानाच भारतात आलेल्या इंग्लिश अॅक्टर गॉडफ्रे केंडल यांच्या 'शेक्सपियेराना' या थिएटर ग्रुपमध्ये ते सहभागी झाले. या ग्रुपसोबत काम करत त्यांनी अनेक देशांच्या यात्रा केल्या. यादरम्यानच आपली सहकलाकार आणि गॉडफ्रे यांची मुलगी जेनिफर हिच्यासोबत त्यांचं प्रेम जुळलं. आणि वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या जेनिफरसोबत लग्न केलं. कपूर घराण्यात अशाप्रकारचं हे पहिलं लग्न होतं.

स्त्रोत

आंतराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या भारतातल्या काही पहिल्या अभिनेत्यांपैकी शशी कपूरना गणलं जातं.  त्यांच्या या यादीत दि हाउसहोल्डर, शेक्सपियर वालाह, बॉम्बे टॉकीज, हिट अॅन्ड डस्ट यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

 

वयाने लहान असणार्‍या अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी दिवार, सिलसिला, सुहाग, त्रिशूल, नमकहलाल, कभी कभी या चित्रपटात काम केलं. नलिनी जयवंत, माला सिन्हा, तनुजा, रेखा, राखी, शर्मिला टागोर, झीनत अमान, हेमा मालिनी, परवीन बाबी, नीतू सिंग या सगळ्या नायिकांसोबत शशी कपूर यांनी अभिनय केलाय.

स्त्रोत

स्त्रोत

श्याम बेनेगल, अपर्णा सेन, गोविंद निहलानी, गिरिश कर्नाड अशा दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी जूनून, कलयुग, ३६ चौरंगी लेन, उत्सव असे काही चित्रपट त्यांनी बनवले. हे चित्रपट बॉक्स अॉफीसर चालले नसले तरी समिक्षकांकडून त्यांचं कौतुक झालं. आजही हे चित्रपट म्हणजे शशी कपूर यांच्या अभिनय प्रवासातील मैलाचे दगड मानले जातात. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीत त्यांनी १७५ हून जास्त सिनेमे केले! 

हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल २०११ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 'जूनून' साठी त्याना निर्माता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर 'मुहाफिज', 'न्यु डेल्ही टाईम्स', 'जब जब फूल खिलें' या चित्रपटांसाठीही ते राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

स्त्रोत

१९९८ मध्ये आलेला 'जिन्ना' हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीत शेवटचा चित्रपट मानला जातो. शशी कपूर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा हसता-खेळता, हरहुन्नरी आणि तितकाच संयमी चेहरा होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशा या श्रेष्ठ महानायकाला बोभाटा परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली!!

सबस्क्राईब करा

* indicates required