तेज:पुंज चेहेर्यासाठी चांदण्याचा चुरा
गेल्या काही वर्षात सौंदर्य शास्त्रज्ञांनी पुनरुज्जीवनाची अनेक रसायने शोधून काढली आहेत. उदाहरणार्थ, चेहर्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी बोटॉक्ससारख्या विषाचा वापर केला. बोटॉक्समुळे सुरकुत्या नाहीशा होतात पण सोळाव्या वर्षातला उजळ चेहेरा साठाव्या वर्षी कसा आणायचा ही मोठीच समस्या होती. सोळाव्या वर्षी उसन्या चंद्रप्रभेची गरज भासत नाही. वय वाढत गेले की चेहर्यावरची चंद्रिका मावळत असल्याची खंत जाणवायला लागते. महाभारतातल्या ययातीला चिरतारुण्यासाठी त्याच्या मुलाकडे म्हणजे राजपुत्र पुरुकडे याचना करावी लागली.
काही वर्षांपूर्वी चेहेर्याला प्रकाशित करणार्या रसायनांचा शोध लागला.Y2 फॉर्म्युला- कोलाजेन एक आणि दोन, हॅलोरॉनीक ऍसिड ही ती रसायने. ही रसायने त्वचेच्या आतल्या स्तरांपर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक अशी पूरक रसायने बनवणे ही यापुढची समस्या होती. त्यासाठी सौंदर्य शास्त्रज्ञांनी चक्क चांदण्यांचा चुरा वापरला. पृथ्वीवर होणार्या उल्कापातातून मिळणार्या उल्कांच्या चुर्यात अतिसूक्ष्म असे कार्बनचे म्हणजे हिर्याचे कण मिळतात. या कणांचा वाहक म्हणून उपयोग केल्यावर त्वचेच्या खोलवर स्तरांपर्यंत पुनरुज्जीवनाची रसायने पोहचतात आणि पुन्हा एकदा चेहेर्यावर चांदणे चमकायला लागते.
’सेलेस्टीअल ब्लॅक डायमंड’ या क्रीममध्ये अशाच हिर्याचा वापर केला आहे. हे उसने चांदणे अर्थातच महागडे आहे. ’सेलेस्टीअल ब्लॅक डायमंड’च्या पन्नास मिलीची किंमत आहे फक्त रुपये ७००००!!!
सौंदर्य स्वस्त नाही हे खरेच आहे आणि रुपये म्हणजे चिंचोके नाहीत. मात्र चिंचोके सौंदर्यवर्धनात मदत करू शकतात. वर उल्लेख केलेली काही रसायने चिंचोक्याच्या पिठात पण असतात. पर्याय ग्राहकाकडे आहे, चिंचोके किंवा सत्तर हजाराचे १११ सेलेस्टीअल ब्लॅक डायमंड क्रीम.




