computer

किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: अ‍ॅपलवॉचमुळे पडल्या सूनबाईंना बेड्या!!

जसजसा काळ बदलतोय तसतश्या गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीही. गुन्हा करण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या वापरून पोलिस‌ यंत्रणेला चकवा देणारे अनेक सराईत गुन्हगार आज आपण बघतोय.‌ पण गुन्हेगारांनी उभं केलेलं हे आव्हान मोडून काढण्यात आज तपास यंत्रणांना मोलाची मदत होतीय ती आपल्या दैनंदिन वापरातल्या स्मार्ट उपकरणांची. क्राईम पॅट्रोलमध्ये पाहातो ते मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्डस याच्यापलिकडेही बरंच काही यात येतं.

आज जवळपास ८५‌ टक्के गुन्हे तपासांमध्ये अशा डिजिटल पुराव्यांची निकड भासते. या डिजीटल पुराव्यांमध्ये तुमच्या इमेल्स आणि लॅपटॉपपासून ते बिटकॉईन वॉलेटस्, वेब सर्व्हर लॉग्स, IoT (आपापसांत एकमेकांशी कनेक्ट असलेली स्मार्ट संगणकीय उपकरणं) अशा ८५हून अधिक स्त्रोतांचा समावेश होतो. या लेखमालिकेत आपण पाहणार आहोत असे‌ काही किस्से जिथं पोलिसांनी अशा स्मार्ट उपकरणांची मदत घेऊन‌ अचूक गुन्हेगार ओळखले....

प्रकरण १ :

ही घटना आहे सप्टेंबर २०१६ मधली. ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड शहरात राहणाऱ्या ५७ वर्षीय मायर्ना निल्सन यांची त्यांच्या राहत्या घरात क्रूरपणे हत्त्या झाली होती. मायर्ना यांची २६ वर्षांची सून, कॅरोलीन निल्सन हि रात्री १०.१०च्या सुमारास बिथरलेल्या अवस्थेत घराबाहेर पडली आणि तीनं तीच्यावर आणि तीच्या सासूवर हल्ला झाल्याचं आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं. शेजाऱ्यानं पोलिसांना बोलावून घेतलं.‌

कॅरोलिननं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काही लोक तिच्या सासूचा पाठलाग करत कारमधून आले. त्यानंतर घराबाहेरच २० मिनिटं मायर्ना आणि त्या लोकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर त्या लोकांनी तिच्या सासूवर हल्ला केला. पण कॅरोलिनला तिच्या सासूवर प्राणघातक हल्ला झालेला कळलंच नाही, कारण ती दरवाजा बंद असलेल्या स्वयंपाकघरात होती. त्यानंतर थोड्याच वेळात हल्लेखोरांनी तिलाही बांधून टाकलं. ते गेल्यानंतर कॅरोलीननं स्वतःची सुटका करून घेतली.

(कॅरोलीन निल्सन आणि मायर्ना निल्सन)

या प्रकरणात पोलिसांच्या नजरेत प्रमुख संशयीत म्हणून कॅरोलिन होती. आणि तपासानंतर पोलिसांनी तिला सासूच्या खुनाच्या‌ आरोपाखाली अटकही झाली. पोलिसांनी कोर्टाला पुरावा सादर केला‌ तो मृत मायर्ना यांच्या ॲपल आयवॉचचा. या स्मार्टवाचमधून मिळालेला तपशील हा कॅरोलिननं घरावरच्या हल्ल्याचा बनाव रचल्याचं दर्शवत होता.

अशा प्रकारची स्मार्ट मनगटी घड्याळं ही त्यामध्ये असणाऱ्या सेन्सर्सच्या सहाय्यानं ते परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींची, हलचालींच्या गतीची दैनंदिन नोंद‌ ठेवतात, आपल्या हृदयाचे ठोकेही मोजतात. पोलिसांनी मायर्ना यांच्या आयवॉचमधून मिळवलेल्या डेटानुसार त्यांच्यावर ६ वाजून ३८ मिनिटांनी कोणीतरी अचानक हल्ला केला आणि ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. या ॲक्टिव्हीटी आणि हा हार्टरेट डेटावरून हेही दिसून येतं होतं की मायर्ना यांना धक्का बसून त्या बेशुध्दावस्थेत गेल्या होत्या.

स्मार्टवॉचचा हा पुरावा खरा मानल्यास कॅरोलिनने सांगितलेला २० मिनिटांचा वादावादीचा प्रसंग हा खोटा होता. यावेळी घरी परतणाऱ्या शेजाऱ्यानेही मायर्नाच्या घराबाहेर कोणतीही कार पाहिली नव्हती. DNA रिपोर्टनुसार घरात कोणीही हल्लेखोर घुसलेले नव्हते. या‌ सगळ्यांवरून पोलिसांनी कॅरोलिनने रचलेली खोटी कहाणी सहज पकडली होती. याचबरोबर कॅरोलिन १० वाजता घराबाहेर पडली, पण आयवॉचमधून मिळवलेल्या डेटानूसार मायर्ना यांचा मृत्यू ३ तासांआधीच झाला होता. या वेळेत कॅरोलिनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. पण तिनं‌ कधीही विचार‌ केला नसेल की एका स्मार्टवॉचमुळं तीचा खोटेपणा पकडला जाईल.

विज्ञान शाप की वरदान हा निबंध तुम्ही शाळेत बरेचदा वाचला असेल, कधी लिहिलाही असेल. या आमच्या मालिकेवरून आपण इतकं नक्कीच म्हणू शकतो की विज्ञान शाप आहे की वरदान हे आपण ते कसं वापरतो यावर अवलंबून आहे. खरं ना?

सबस्क्राईब करा

* indicates required