computer

या देशाच्या राजधानीची लोकसंख्या चक्क शून्य आहे! का झाले हे शहर "घोस्ट टाऊन"?

संपूर्ण देशाचा प्रशासकीय विभाग जिथे असतील अशा शहराला त्या देशाची राजधानी म्हटले जाते. राजधानीचे शहर विविध प्रशासकीय कार्यालये आणि महत्वपूर्ण ठिकाणांनी गजबलेले असते. पण तुम्हाला माहीत आहे का या जगात अशीही एक राजधानी आहे जिथे कुणीही राहत नाही, म्हणून त्याला घोस्ट टाऊन म्हटले जाते. असा कोणता देश आहे ज्याच्या राजधानीची लोकसंख्या "शून्य" आहे आणि इथे कुणीही राहायला का जात नाही जाणून घेऊया या लेखातून!

ब्रिटनचा समुद्री प्रांत असणाऱ्या आइलन्ड ऑफ मॉंटेसरॅटची राजधानी प्लायमाऊथ हे शहरकधी काळी अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेले होते. अँटिग्वापासून २५ मैल अंतरावर हे बेट वसले आहे. स्वच्छ, नितळ पाण्याचे समुद्र किनारे, किनाऱ्यावर उधळणाऱ्या लाटा आणि जवळच असलेला एक जिवंत ज्वालामुखी अशी नैसर्गिक देणगी लाभलेले हे शहर अचानकच असे काही उध्वस्थ झाले की आज या शहरात कुणालाही राहू वाटत नाही.

१८ जुलै १९९५ रोजी या बेटावरील त्या जिवंत ज्वालामुखीतून लाव्हारस धडका देऊ लागला. त्यामुळे या ज्वालामुखीतून २० फूट उंचीचे राखेचे मोठमोठे लोट उठले आणि संपूर्ण शहर या राखेने व्यापून टाकले. ज्वालामुखीतून एकसारखी राख बाहेर पडत होती. त्यामुळे या शहरात जिथे तिथे गरम राखेचे थर साचले होते. निसर्गाच्या या अवकृपेमुळे इथल्या शहर वासियांना शहर सोडून दुसरीकडे जाणे भाग होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या शहरातील १२,००० नागरिकांनी आपले ठिकाण इतरत्र हलवले. ज्वालामुखी शांत झाला असे वाटल्यावर यातील काही लोक पुन्हा आपल्या शहरात परतले. पण त्यांच्या दुर्दैव की पुन्हा एकदा १९९७ साली या ज्वालामुखीतून लाव्हारस आणि राख एकत्र बाहेर पडू लागले. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे हे धुराचे लोट खूपच शक्तिशाली होते. यावेळी पुन्हा एकदा आलेले नागरिक दूरवर परतून गेले. याचे कारण म्हणजे इथला ज्वालामुखी होय.
 

आजच्या घडीला या शहरात कुणीही राहत नाही. सगळी सरकारी कार्यालये ज्वालामुखीपासून दूर असलेल्या ब्रेड्स शहरात उभारण्यात आली आहेत. या शहरात सगळी प्रशासकीय आणि सरकारी कार्यालयीन कामकाज चालत असले तरी आजही या देशाची अधिकृत राजधानी प्लायमाऊथच आहे.

पूर्वी या छोट्याशा देशाची लोकसंख्या १२,००० होती ती कमी होऊन १२०० झाली होती. सध्या ती पुन्हा ५०००च्या आसपास स्थिरावली आहे. बेटाच्या दक्षिण भागात जिथे हा ज्वालामुखी आहे त्या परिसरात जाण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. बेटाचा दक्षिण भागास भेट देण्यास बंदी असली तरी याचा उत्तर भाग मात्र पूर्वीप्रमाणेच गजबजलेला आहे. इथे दवाखाने, शाळा, हॉटेल्स, दुकाने, मॉल अशा अत्यावश्यक सोयी उभारण्यात आल्या आहेत. अँटिग्वापासून विमानाने फक्त २५ मिनिटे तर बोटीने जाण्यास ९० मिनिटे लागतात.

कधीकाळी इथले प्लायमाऊथ शहर म्हणजे पर्यटकांचे आकर्षण केंद्र होते. इथली अलिशान हॉटेल्समध्ये बारा महिने पर्यटकांची गर्दी असायची. हा शहराला भेट दिल्यानंतर लोकांना धरती वर स्वर्ग पहिल्याची अनुभूती मिळायची तेच शहर आज नरकासमान झाले आहे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required