शेअरबाजार: एक गुंतवणूकीचा मार्ग -जे शहाणे होतील ते कर्ज मुक्त होतील!
(शेअर बाजारावरचा हा लेख वाचताना तो ललित साहित्य प्रकारात मोडणारा आहे असे तुमचे मत होण्याची शक्यता आहे.तो समज बाजूला ठेवून हा लेख वाचावा.कठीण संकल्पना सहजसोप्या भाषेत समजाव्यात म्हणून ललित लेखनाची शैली वापरली आहे.)
माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांची ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ह्यांचे व्यक्तीमत्व फार उत्तम.गाठीला चार पैसे बांधूनही होते.समस्या एकच होती.त्यांचं लग्न जमत नव्हतं.लग्न न जमण्याचं एकच कारण होतं.ते मुंबईच्या शेअरबाजारात नोकरीला होते नोकरी करता करता अधून मधून सट्टा पण करायचे.
आता सट्टा करणार्याला मुलगी देणार कोण ? बर्याच वर्षांनंतर त्यांचं लग्न झालं .संसार मार्गी लागला.काल परवा एका लग्नात मला भेटले. मुलगा लग्नाचा आहे वगैरे सांगत होते. मुलगा सीए आहे. एका म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर म्हणून काम करतो आहे. हे सगळं सांगता सांगता हसायला लागले. मी हसण्याचं कारण विचारलं तर म्हणाले
"अहो आमच्याच ओळखीतली पंचवीस स्थळं आलीत सांगून. निर्णय घेणं कठीण झालं आहे. बाप सठीसामाशी सट्टा करायचा तर केव्हढी अडचण लग्नाला आणि मुलगा रोज सट्टा करतो तर ढिगभर स्थळं."
साधारण २००० सालापासून समाजमनात किती फरक पडला आहे हे सांगण्यासाठी हा किस्सा सांगीतला.
शेअर बाजार -सट्टा-असं काही म्हटलं की नुकसान -कर्ज -दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यासमोर उभे राहण्याचे दिवस आता राहीले नाहीत पण अजूनही मराठी माणसाला शेअरबाजाराची आणि त्यातल्या गुंतवणूकीबद्दल जी अढी आहे ती नाहीशी झालेली नाही.योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा नवसागरात बुडून जातो हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली शोकांतीका आहे
मराठी माणसाची (शेअर बाजारातील ) प्रतिमा उत्तम नोकरी करणारा माणूस अशी आहे. सचोटीने काम करणे हे त्याचे भांडवल आहे .त्यामुळे कर्ज देणार्याला हवी तशी प्रतिमा (प्रोफाईल)मराठी माणसाची आहे .त्यामुळे गरजेला कर्ज घेणारा मराठी माणूस गुंतवणूक करून पैसे कमावण्याचया मार्गाला न जाता कर्ज काढून गरज भागवण्याच्या मागे असतो.साहजीकच आहे की मराठी माणसाच्या हातात शेअरबाजारातला एकही शेअर नसेल पण को ऑपरेटीवह क्रेडीट सोसायटीचे शेअर पहील्या पगाराच्या दिवशी असतील .
पण नोकरीतला माणूस दरवर्षी गरीब होत जातो हे सत्य आपल्या लक्षात येत नाही.
आपलयाला पगार मिळतात वर्षभरात फक्त बारा.
त्यापैकी एक फंडात जमा होतो.
एक आयकरात जातो.
एक वैयक्तीक कर्ज फेडण्यात जातो.
एक पगार लग्न -बारशी किंवा इतर सामाजीक जबाबदार्यांसाठी .
अचानक उदभवणार्या समस्यांसाठी एक पगार जातो.
एक पगार विम्याचे हप्ते भरण्यात .
हातात उरले पगार सहा .त्यात खर्च चालवायचा बारा महीन्याचा .
पुढच्या दोन वर्षात महागाई वाढली की हे प्रमाण पाच पगार आणि बारा महीने असे होईल .
म्हणजे एकूण अंदाजपत्रक असलंच तर ते तूटीचे आहे.
मग आपला संसार चालतो कसा ?
तो चालतो कर्ज काढून किंवा हातात अचानक लाभानी येणारे पैसे वापरून .दरवर्षी नवीन कर्ज काढून किंवा असलेल्या कर्जाची मुदत वाढवून्.
थोडक्यात काय तर आगामी भविष्यकाळातील मिळणारा वाढीव पगार वर्तमान काळातच संपून जातो .
मग या दुष्टचक्रातून सुटका होणार कशी ?
थोडक्यात-एकच रस्ता आहे या गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा तो म्हणजे सुयोग्य गुंतवणूकीचा .
एक प्रश्न मनात नक्की येईल तो म्हणजे मी गुंतवणूक का करायची ?
कारण तुमची बचत खात्यातली रक्कम अडीच ते तीन टक्के व्याज देते -मुदतबंद खात्यावर परतावा फक्त आठ टक्के मिळतो आणि महागाई दहा टक्क्यानी वाढते. म्हणजे दरवर्षी बचतीची किंमत वाढण्याऐवजी कमी होत जाते आहे. महागाईवर मात करायची असेल तर महागाईपेक्षा जास्त दरानी वाढ होईल अशाच क्षेत्रात जायला हवे. या साठी अनेक रस्ते आहेत .
क्रमांक एक : शेअर बाजारात गुंतवणूक .
क्रमांक दोन : कमोडीटी बाजारात गुंतवणूक करणे .
क्रमांक तीन : फॉरेन एक्सेंजची खरेदी विक्री म्हणजेच फॉरेक्स मार्केट
तीन पर्यायातून कुठलाही निवडा .दर महीत्यात -दर आठवड्यात -दर दिवशी उत्पन्न मिळवून देणारे तीन सोपान आहेत. सोपे आहेत म्हणून ते सोपान आहेत .
सुरुवात मात्र शेअर बाजारातून करायला हवी
चला तर सुरुवात करू या डीमॅट अकाउंट सुरु करण्यापासून .हे डिमॅट खाते आहे तरी काय ?फार सोपे आहे.आपण पैसे बचत करण्यासाठी बँकेत खाते उघडतो. तसेच शेअर घेऊन जमा करण्यासाठी आणि विक्री केल्यानंतर शेअर काढण्यासाठी जे खाते असते त्याला म्हणतात डीमॅट खाते. आता या खात्यात जमा करण्यासाठी शेअर विकत घ्यायला हवेत ते घ्यायचे बाँबे स्टॉक एक्स्चेंजमधून किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून. या बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकर किंवा मराठीत ज्याला आपण दलाल म्हणतो त्यांच्या मार्फत जावे लागते. तुमच्या पसंतीनुसार दलाल निवडा आणि त्याच्याकडे ट्रेडींग खाते उघडा . थोडक्यात आता तुमच्या कडे तीन खाती झाली .१ तुमचे बचत खाते -२ दुसरे डीमॅट खाते -३ ट्रेडींग खाते .बँकेत बचत खाते उघडताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे बाकीची दोन खाती उघडताना लागतात .ही खाती सुरु केली की शेअरबाजारात येण्याची तयारी पूर्ण झाली .
पुढच्या भागात आपण शेअर कधी घायचे -किती घ्यायचे - का घायचे -आणि घेतलेल्या शेअरची विक्री कधी करायची याचा विचार करणार आहोत पण तो पर्यंत खाती उघडून तयार रहा . आता गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल हवे . भांडवल म्हणजे डोळ्यासमोर लाखाचे आकडे यायला नकोत. हाताशी असलेल्या अगदी पाचशे रुपयापासून गुंतवणूकीला सुरुवात करता येते.