computer

चीन सरकार टँकमॅनची माहिती दडपण्यासाठी जंगजंग पछाडतंय. सरकारला धडकी बसवणाऱ्या टँकमॅनची गोष्ट काय आहे?

हिंदीतली एक फार जुनी म्हण आहे.

कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों |

चीनच्या ‘टँकमॅन’ला बघून ही म्हण आठवते. पांढरा शर्ट, काळी पँट आणि हातात पिशव्या घेतलेला एक साधारण माणूस - ज्याच्याकडे कोणतंही शस्त्र नाही,  एका युद्धातल्या रणगाड्यासमोर जाऊन उभा राहतो आणि जागचा हलत नाही हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं होतं. हे रणगाडे शांततेत जात होते असंही नाही. त्यांनी आदल्यादिवशीच शेकडो माणसांचा जीव घेतला होता. चीनमधल्या त्या अज्ञात व्यक्तीने फक्त रणगाड्याला आव्हान दिलं नव्हतं, तर संपूर्ण चीनी दडपशाहीलाच आव्हान दिलं होतं. ही हिम्मत, ही जिद्द ऐतिहासिक ठरली. हा पाहा व्हिडिओ.

मंडळी, हा इतिहासातला महत्वाचा क्षण होता. आज ५ जून २०१९ रोजी या घटनेला ३० वर्ष पूर्ण होतील. आश्चर्य म्हणजे हा माणूस नेमका कोण होता हे कधीच समजू शकलं नाही. जगाला त्याचं साधं नावही माहित नाही. तेव्हापासून सगळे त्याला "टँकमॅन" म्हणून ओळखतात.

मंडळी, टँकमॅनबद्दल आणखी जाणून घेण्यापूर्वी या घटनेमागचा इतिहास जाणून घेऊया.

माओ त्से-तुंगने चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती आणली. लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली. माओच्या मृत्युनंतर चीनमध्ये खुली राज्यव्यवस्था आणण्याची मागणी होऊ लागली. कम्युनिस्ट पक्ष हा देशातला एकमेव पक्ष असेल या गोष्टीला पण विरोध होऊ लागला. लोकांमध्ये पसरणाऱ्या लोकशाही विचारसरणीला त्याला आधार देण्यासाठी चीनमध्ये काही राजकीय नेते पण होते. अशा नवीन विचारांच्या नेत्यांमधले एक नेते म्हणजे “हू याओबांग”. आधी तर त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि पुढे १९८९ साली हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये मोठी खळबळ माजली.

१५ एप्रिल रोजी हू याओबांग यांच्या मृत्यूनंतर मोठ्याप्रमाणात लोकांनी निदर्शनं केली. या निदर्शनांनी लवकरच मोर्चा आणि आंदोलनाचं रूप घेतलं. लोकशाही व्यवस्था, स्वातंत्र्य आणि खुले राजकीय वातावरण या लोकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

हे आंदोलनल ‘तियानानमेन चौकातलं आंदोलन’ म्हणून ओळखलं जातं. तियानानमेन चौक हा चीनची राजधानी बीजिंगचा मध्यवर्ती भाग. या भागात लोकांची झुंबड उडाली होती. ३ आणि ४ जून रोजी तर तरुण विद्यार्थ्यांनी आंदोलनात उडी घेतली. १५ एप्रिलपासून सुरु असलेलं हे आंदोलन आता मोठं होत होतं. चीन सरकारला या आंदोलनाचा शेवट करणे आवश्यक वाटत होते. यासाठी त्यांनी जो मार्ग पत्करला तो भयानक होता. विद्यार्थ्यांवर, लोकांवर सैन्य पाठवण्यात आलं आणि सामान्य नागरिकांची अक्षरशः कत्तल घडवण्यात अली. शत्रूवर हल्ला करावा तसा चीनने स्वतःच्याच नागरिकांवर सशस्त्र हल्ला केला होता.

तियानानमेन चौक हत्याकांडात किती लोक मारले गेले याचा अधिकृत आकडा आजवर समजलेला नाही. असं म्हणतात की २०० लोक मारले गेले असावेत, पण खरा आकडा यापेक्षा मोठा असू शकतो.

टँकमॅन

टँकमॅनचा तो ऐतिहासिक क्षण दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून १९८९ चा आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी जेव्हा रणगाडे तियानानमेन चौकाच्या दिशेने जात होते, तेव्हा एक चीनी माणूस रणगाड्यांच्या रांगेसमोर येऊन उभा राहिला. हा क्षण आजूबाजूच्या इमारतींमध्ये असलेले फोटोग्राफर, व्हिडीओग्राफार टिपत होते.

या प्रसंगात तो रणगाड्यावर चढून आतल्या अधिकाऱ्यांशी काही तरी बोलला. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला उभा रहिला. रणगाडे पुढे जाऊ लागले तसा तो पुन्हा त्यांच्या मध्ये येऊ लागला. तेवढ्यात काही माणसं तिथे आली आणि त्याला घेऊन निघून गेली. यानंतर तो कुठे गेला आणि त्याला घेऊन जाणारी माणसं कोण होती याबद्दल काहीच समजलं नाही. त्यादिवशी तिथे उपस्थित असलेले न्यूजविक या मासिकाचे चार्ली कोल यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दोन लोक स्थानिक पोलीस होते, तर दुसरे एक पत्रकार जॅन वॉंग यांनी म्हटलं की ते लोक साधारण नागरिक होते.

पुढे काय घडलं?

त्यादिवशी जे घडलं ते सगळं चीनने इतिहासातून कायमचं पुसण्याचा प्रयत्न केला. आजही तो प्रयत्न थांबलेला नाही. चीनच्या नागरिकांना त्या दिवशी जे घडलं ते आठवू नये याचा पूर्ण बंदोबस्त चीन करत आहे. परिणामी चीनच्या तरुण वर्गाला टँकमॅनबद्दल काहीच माहित नाही.

आजच्या डिजिटल युगात गोष्टी लपून राहणं कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. त्यासाठी चीन सरकार आक्रमक झालं आहे. त्यांनी ऑनलाईन सेन्सॉर बसवला आहे. जो कोणी या प्रसंगाबद्दल माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा पण होते. चीनमध्ये नुकतंच ४ नागरिकांना पकडण्यात आलं होतं. त्यांनी टँकमॅनच्या स्मरणार्थ बाटलीवर “Never forget, never give up.” अशी अक्षरं असलेली दारू विकली होती.

महिनाभरापूर्वी कॅमेरा विकणाऱ्या ‘लायक कॅमेरा’ कंपनीला चीनकडून टीकेचा सामना करावा लागला होता. या कॅमेरा कंपनीने जाहिरातीत कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टँकमॅनचा प्रसंग दाखवला होता.

गंमत अशी आहे की कधीकाळी चीन सरकारने १९८९ च्या घटनेत स्वतःचा बचाव करण्यासाठी याच टँकमॅनचा फोटो वापरला होता. त्यांना हे दाखवायचं होतं की “आम्ही त्या माणसाला सोडून देऊन शांततेने तो प्रसंग हाताळला होता.” त्यांना आदल्यादिवशीचा रक्तपात लपवायचा होता.

जगभरात मात्र टँकमॅन अजरामर झाला. टाईम्सने त्याला २० व्या शतकातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिलं आहे. सोबतच त्याचा फोटो इतिहासात स्वातंत्र्य आणि विरोधाचं प्रतिक बनला.

टँकमॅनचा शोध

मंडळी, प्रश्न जशाचा तसाच आहे. हा व्यक्ती होती तरी कोण ? अधूनमधून बातम्या येत असतात की त्याला काही दिवसांतच गोळ्या घालण्यात आल्या. काही लोक म्हणतात की तो अजूनही जिवंत आहे. चीनचे माजी अध्यक्ष जिआंग झेमिन यांनी १९९० साली सांगितलं होतं की ‘त्याला’ आम्ही मारलं नाही.

टँकमॅनचं पुढे काय झालं हे जगासमोर उघड करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यंग जिआन्ली  यांनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे केली होती. यंग जिआन्ली यांनी लोकांकडून एक पिटीशन भरून घेतलं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चीन सरकारने फक्त टँकमॅनबद्दल नाही तर संपूर्ण तियानानमेन चौक हत्याकांडाबद्दल माहिती द्यायला हवी.

मंडळी, लोकांनी आरडाओरडा केला, मागण्या केल्या तरी चीन सरकार कोणालाच भीक घालत नाही. त्यामुळे टँकमॅनबद्दल काही समजण्याची तूर्तास तरी शक्यता नाही.

या अज्ञात हिरोला बोभाटाचा सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required