computer

हैद्राबादच्या या सुप्रसिद्ध बेकरीला 'कराची बेकरी' हे नाव कसे मिळाले ? कसा झाला कराची बेकरीचा जन्म ?

मंडळी, बेकरीचे पदार्थांशिवाय आताशा आपलं पान हलत नाही.  बिस्कीट, ब्रेड वगैरे तर रोज लागतातच. लहानांपासून  मोठ्यापर्यंत सर्वच जण बेकरी प्रॉडक्ट्स अगदी आवडीने खातात. भारतात काही मोठ्या परंपरा आणि लोकप्रियता लाभलेल्या बेकऱ्या आहेत  आणि त्यांनी आपल्या विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे जनमानसात स्वतःचे स्थान अगदी घट्ट केले आहे.  मुंबईची याझदानी बेकरी, दिल्लीची वेंगर्स, बंगळुरूची अल्बर्ट बेकरी ही काही उदाहरणे… हो, पण एका नावावाचून भारतातल्या प्रसिद्ध बेकऱ्यांची यादी अपूर्ण आहे हो मंडळी. कोणती काय?  आपली हैद्राबादची सुप्रसिद्ध कराची बेकरी हो! 

काय म्हणता? भारतात असून कराची नावाची बेकरी? या बेकरीचा मालक पाकिस्तानी आहे की काय? 

अशा शंकाकुशंका येणे साहजिक आहे मंडळी. कराची हे पाकिस्तानातले शहर आहे आणि याचे नाव एखाद्या बेकरीला असेल तर आपल्या मनात असे प्रश्न येणे यात काही गैर नाही. भारतात जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळून आली. या लाटेचा फटका कराची बेकरीला सुद्धा बसला. ज्या बेकरीने कित्येक वर्षे आपल्या फ्रुट बिस्कीट आणि इतर पदार्थांमुळे खवय्यांच्या मनावर आणि जिभेवर राज्य केले, त्याच बेकरीला काही काळासाठी आपल्या नावावर पडदा टाकून ते नाव झाकावे लागले. पण खरंच कराची बेकरी आणि पाकिस्तानचा काही संबंध आहे का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला इतिहासात डोकवावे लागेल. 

भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले ते फाळणीची भळभळती जखम सोबत घेऊनच. या फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत आणि वेळोवेळी त्यावरच्या खपल्या निघतच असतात. धर्माच्या आधारावर झालेली ही विभागणी अनेकांचे संसार उध्वस्त करून गेली. कित्येकांना आपला मुलुख सोडून परमुलूख गाठावा लागला. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणारे सिंधी खेमचंद रामनानी हे त्यापैकीच एक विस्थापित होते. हिंदू असल्याने त्यांना पाकिस्तान सोडावा लागला आणि ते मजल-दरमजल करत हैद्राबादला आले.

सिंधी लोकांमध्ये अशी पद्धत असते की त्यांना आडनावासोबत गावाच्या नावानेही ओळखले जाते. मूळ गाव कराची असल्याने रामनानी यांची ओळख कराचीवाला अशीच राहिली. त्यांच्या हातात बिस्कीट तयार करण्याची कला होती. त्यांनी त्याच कलेचा वापर उदरनिर्वाहासाठी करण्याचे ठरवले आणि १९५२ मध्ये हैद्राबादच्या मोज्जम जाही मार्केटमध्ये त्यांनी एक बेकरी चालू केली. हीच ती कराची बेकरी!

मंडळी, गाव सोडला तरी गावाच्या आठवणी कायम सोबत असतातच. खेमचंद यांनी याच आठवणी जपण्यासाठी आपल्या बेकरीला कराची हे नाव दिले होते. 

अल्पावधीतच कराची बेकरीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्यांचे खास फ्रुट बिस्कीट, उस्मानिया बिस्कीट, केक आणि ब्रेड हातोहात विकले जाऊ लागले. बेकऱ्या तर बऱ्याच होत्या, पण या बेकरीत असे काय खास होते की ही इतकी लोकप्रिय झाली? तर यांची पदार्थ तयार करण्याची पारंपरिक पद्धत! बेकरी सुरू झाल्यापासून ते आजतागायत इथले पदार्थ हाताने तयार केले जातात. मशिनरीपेक्षा ती हाताची खास चव लोकांना आवडते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, बेकरी पदार्थात सुक्यामेव्याचा वापर… ही खास कराची शहराची पद्धत आहे.

मंडळी, हैद्राबाद जसे हलीम, बिर्याणी साठी ओळखले जाते, तसेच कराची बेकरीसाठी सुद्धा ओळखले जाते इतकी ही बेकरी हैद्राबादच्या नसानसांत भिनली आहे. या पुढे सांगायचे झाले तर सन २००० नंतर ही ओळख फक्त हैद्राबादपुरती मर्यादित न ठेवता या बेकरीने इतरत्र शाखा उघडण्यास सुरुवात केली. अहमदाबाद, बंगळुरू अश्या शहरातही लोकप्रियता मिळवली. आज खेमचंद रामनानी यांचे वंशज हा वारसा अतिशय उत्कृष्टपणे, त्याच चवीसह सांभाळत आहेत. 

मंडळी, हा झाला इतिहास… आता वर्तमानात येऊ या. पुलवामा हल्ल्यानंतर या बेकरीच्या जिथे जिथे शाखा होत्या तिथे धमक्यांचे फोन येऊ लागले. राष्ट्रप्रेमाच्या भावना उचंबळून वाहत असताना ‘कराची’ हे नाव राष्ट्रवाद्यांना खटकले नाही तरच नवल! पण त्याचे काय आहे, आपल्या राष्ट्रवादी भावना क्षणिक असतात. आता हेच बघा ना, पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच भविष्यात कधीही होऊ देणार नाही म्हणणारे लोक कालची मॅच टीव्हीला डोळे लावून बघत बसले होते. असो! तर येणाऱ्या धमक्यांमुळे कराची बेकरीच्या व्यवस्थापनाला जाहीरपत्रक काढून खुलासा करावा लागला की, “बाबांनो, नाव जरी कराची असले तरी याचा मालक भारतीय आहे! आमच्या मनात भारताविषयी प्रेम आहे आणि पाकिस्तानसोबत आमचा कुठलाही, कसलाही संबंध नाही!” 

इतकंच नाही तर काही दिवस त्यांनी कराची हे नाव झाकून बेकरीवर तिरंगा फडकत ठेवला, तेव्हा कुठे लोक शांत झाले. पण एक विशेष बाब या ठिकाणी नमूद करावी वाटते की, इतका सगळा गोंधळ होऊनही कराची बेकरीच्या पदार्थांच्या विक्रीवर मात्र परिणाम झाला नाही. त्यांचा खप पूर्वी होता तितकाच राहिला. 

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी मिडियामध्ये एक मेसेज फिरत होता…

“आमच्या पाकिस्तानात बॉम्बे बेकरी, दिल्ली निहारी, बॉम्बे चौपाटी, अंबाला स्वीटस, मीरत कबाब हाउस, मद्रास बेकरी, काठियावाडी चाट.. इत्यादी नावे राजरोसपणे चालतात आणि आम्ही त्यावर हरकत घेत नाही तर कराची बेकरी या नावावर भारतीयांचा आक्षेप का?”

मग मंडळी, कराची बेकरीचा तुमचा आवडता पदार्थ कोणता? काय, अजून चाखला नाही? हरकत नाही. आम्हांला फोर्टातल्या यझदानी बेकरीची खारी आणि श्रूजबेरी बिस्किट्स खूप आवडतात. तुमच्या आसपासच्या प्रसिद्ध बेकरीचा कोणता पदार्थ तुम्हांला आवडतो आणि का? आम्हांला कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required