computer

विमानातून तिहार जेलवर बिस्किट आणि चॉकलेटचा पाऊस?? जाणून घ्या यामागची खरी गोष्ट!!

जेल ब्रेक किंवा तुरुंगातून पलायन म्हटलं की आपल्याला आठवतो शोले मधला 'जय -विरू'चा जेल ब्रेक, काहींना चार्ल्स सोभराज नावाच्या गुन्हेगाराने तुरुंगातून काढलेला पळ पण आठवेल. नव्या जनरेशनला जेलब्रेक म्हटल्यावर अ‍ॅपलचे ऑपरेटींग सिस्टीम तोडणारे सॉफ्टवेअर आठवेल, इंग्रजी सिनेमे बघणार्‍यांना जेलब्रेकवर आधारीत अनेक चित्रपट आठवतील. एकूण जेलब्रेक हा प्रकार वाचायला ऐकायला चित्तथरारकच असतो नाही का ?

तर मंडळी आज आपण वाचणार आहोत तिहारसारख्या तुरुंगातून पलायन केलेल्या एका स्मगलरच्या जेलब्रेकची कथा !! या कथेत हा स्मगलर फक्त तुरुंगातून पळाला इतकंच नाही तर त्यानंतर अगदी दिवसाढवळ्या दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावरून विमान घेऊन चक्क पाकीस्तानला फरार झाला !! काहींच्या मते तर पाकीस्तानला पळून जाण्यापूर्वी त्याने तिहार जेलवर घिरट्या घालून त्याच्या कैदी मित्रांवर चॉकलेट बिस्कीटांचा वर्षाव केला होता ! या प्रकरणातले सत्य असत्य काय ते या लेखात आपण बघूच पण भारत सरकारला वाकुल्या दाखवत तो पळाला हे नक्की !!

चला तर वाचू या डॅनीयल वॉलकॉट या कुप्रसिध्द स्मगरलरच्या पलायनाबद्दल !!

१९६२ सालची गोष्ट आहे डॅनीयल वॉलकॉटने एअर इंडीयाचे एक काँट्रॅक्ट मिळवले. या काराराच्या अंतर्गत डॅनीयल वॉलकॉटची कंपनी ट्रान्स अ‍ॅटलांटीक एअरलाइन्स -एअर इंडीयाच्यावतीने अफगाणीस्तानातून पार्सलची ने आण करण्याचे काम करत होती.

१९६२ साली एअर इंडीयाच्या ताफ्यात असणार्‍या विमानांची संख्या मर्यादीत असल्याने असे करार केले जायचे. या कामासाठी त्याच्या स्व्तःची डग्लस स्कायमास्टर -डीसी-३ डीसी-४ या जातीची दोन तीन विमाने होती आणि सोबत त्याच्या वैयक्तिक वापरासाठी ऍपाचे हे विमानही होते.

१५ मार्च १९६२ या दिवशी अफगाणीस्तानातून फेरी मारून परत आल्यावर सफदरजंग विमान तळावर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केल्यावर त्यांना विमानात बंदूकीच्या काडतूसांचे १०००० राऊंड ( १०००० फैरी झाडता येतील इतके) सापडले. डॅनीयल वॉलकॉटला दिल्लीच्या अशोका हॉटेल्मधून ताब्यात घेण्यात आले आणि कोर्टासमोर हजर करण्यात आले. विमानतळावर असलेली त्याची विमाने जप्त करण्यात आली. बँकेचे खाते गोठवण्यात आले. सगळे काही कायद्यानुसार झाले.

(डग्लस स्कायमास्टर डीसी-४)

कोर्टाने डॅनीयल वॉलकॉटला सहा महीन्याची शिक्षा ठोठावली आणि त्याची रवानगी तिहारच्या तुरुंगात केली. पण आपली व्यवस्था भोळसटच म्हणायला हवी कारण 'मी तुरुंगात असताना माझ्या विमानाचे एंजीन जर अधून मधून सुरु केले नाही तर विमान कायमचे बंद पडेल' असा अर्ज करून डॅनीयल वॉलकॉटने तुरुंगातून दर आठवड्यात बाहेर पडण्याची परवानगी मिळवली. प्रत्येक आठवड्यात थोडे थोडे इंधन टाकत पुरेसे इंधन जमा केले आणि या नाटकाचा दुसरा अध्याय सुरु झाला.

त्यावेळेस डॅनीयल वॉलकॉटला एक विशेष सवलतही मिळाली होती ज्यावर आपण विश्वासही ठेवू शकत नाही. ती अशी की शिक्षेच्या दरम्यान डॅनीयल वॉलकॉटला अनेकवेळा कामानिमित्त देशाच्याबाहेर जाण्याची पण परवानगी देण्यात आली होती. एकूण ६ महिन्यात ५ वेळा तो देशाच्या बाहेर फेऱ्या मारून आला. (अशा प्रकारची सवलत कधी कोणत्याही कैद्याला मिळते का ? कदाचित याचा संदर्भ तो CIA चा एजंट असल्याची नेहमी बतावणी करायचा या सोबत असू शकेल.)

थोडक्यात डॅनीयल वॉलकॉटला तुरुंग फोडून देशाच्या बाहेर पळून जाण्याची काही आवश्यकताच नव्हती. भारतातील सर्व वर्तमानपत्रात तो तुरुंगातून पलायन करून गेला हा गवगवा १००% चुकीचा आहे हे निश्चित. सोबत तिहार जेलवरून फेरफटका मारून चॉकलेट बिस्किटं टाकण्याचा जो उल्लेख आहे तोही चुकीचाच आहे.

तर मग सत्य काय आहे ?

ज्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी डॅनीयल वॉलकॉट पाकिस्तानला पळून गेला तेव्हा तो जेलमध्ये नव्हताच. त्याला २३ सप्टेंबर रोजी जमीन देण्यात आला होता. नंतरच्या ३ दिवसात त्याने कस्टममध्ये जाऊन पूर्ण दंड भरल्याची देखील नोंद आहे. हा जामीन झाल्यावर त्याचे बँकेचे गोठवलेले खातेही सरकारने मोकळे केले होते. तेव्हा तो पळून गेला हे जरी सत्य असले, तरी तो तुरुंग फोडून बाहेर पडला हे असत्य आहे. आता राहता राहिला प्रश्न तिहारजेलवरून मारलेल्या हवाई फेरफटक्याबद्दल. ही पण एक निखालस सांगोवांगी गोष्ट आहे, जी टाईम नावाच्या मासिकाने तिखट-मीठ लावून सांगितलेली आढळते.

मग त्याने नेमके पलायन कसे केले ?

ज्या दिवशी पलायन केले त्या दिवशी तो सरळ सफदरजंग विमानतळावर गेला. त्याची विमाने कोर्टाने मोकळी केली असल्याने त्याला कोणीही अडवण्याचा प्रश्नच नव्हता. इंजिन मेंटेनन्सच्या नावाखाली त्याने भरपूर इंधन जमा केलेच होते. यानंतर एअर ट्राफिक कंट्रोलला कोणतीही सूचना न देता तो सरळ पाकिस्तानकडे रवाना झाला. रडारवरती मागमूस लागू नये म्हणून त्याने विमान ३००० फुटापेक्षा कमी उंचीवरून उडवले. अशारितीने दिवसाढवळ्या दुपारी १२.३० वाजता सरकारच्या तोंडाला पानं पुसून डॅनीयल वॉलकॉट पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाला.

मग सरकार काय करत होते ?

(या प्रकारच्या विमानातून डॅनीयल वॉलकॉट पळाला)

डॅनीयल वॉलकॉट पाकिस्तानच्या दिशेने उडत गेल्यावर तासाभराने सरकारला जाग आली आणि वायुदलाची विमाने त्याच्या पाठलाग करायला लागली. या आदेशांमध्ये एक विचित्र गोष्ट अशी आढळते की वायुदलाला डॅनीयल वॉलकॉटचे विमान पडायचे नाही असे सांगण्यात आले होते. या गोंधळात आणखी एक भर अशी की डॅनीयल वॉलकॉट लाहोरला जातो आहे असे वायुदलाला सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तो कराचीला निघाला होता. वायुदलाच पाठलाग अर्थातच वाया गेला आणि थोड्याचवेळात डॅनीयल वॉलकॉट सुखरूप पाकिस्तानला पोचला.

त्याची उरलेली विमानं अर्थातच सफदरजंग विमानतळावर तशीच पडून राहिली. त्यानंतर पाकिस्तानने त्याचा एक इंटरव्ह्यूदेखील प्रकाशित केला होता. ज्यामध्ये त्याने भारत सरकारची शक्य तितकी खिल्ली उडवली होती.

तुम्हाला काय वाटतं त्याची स्टोरी इथेच संपली ? मंडळी, डॅनीयल वॉलकॉट हे इतकं विचित्र व्यक्तिमत्व होतं की कोणत्याही कायद्याला फाट्यावर मारण्यात त्याला नेहमीच एक ‘किक’ मिळायची. त्याचं पूर्ण आयुष्य असेच कारनामे करण्यात गेलं.

(डॅनीयल वॉलकॉटच्या चौकशीचा रिपोर्ट)

अमेरिकेत आणि कॅनडात तो एक रईसजादा म्हणून ओळखला जायचा, तर इतरवेळी तो कुप्रसिद्ध स्मगलर म्हणूनच ओळखला जायचा. कधीकधी तो एका देशातून दुसऱ्या देशात निर्वासितांना घेऊन जायचा. काहीवेळा प्रतिबंधित प्राणी इकडचे तिकडे नायचे उद्योग करायचा. दक्षिण अमेरिकेतील एका देशात त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून त्याला ७ वर्षांची सजा ठोठावण्यात आली होती, पण नेहमीप्रमाणे तो तिथून पळूनच गेला होता.

तर वाचकहो, सांगायची गोष्ट अशी की हाच डॅनीयल वॉलकॉट ४-५ वर्षांनी पुन्हा भारतात आला. यावेळी मात्र त्याचा उद्देश सोन्याची तस्करी करण्याचा होता. बेरुट येथून विमानात सोने भरून हा पठ्ठ्या मुंबईकडे निघाला. ऐनवेळी साथीदारांनी केलेल्या गोंधळामुळे विमान मुंबई ऐवजी मुरुडजवळ समुद्र किनाऱ्यावर उतरले. पुन्हा एकदा मुरुडच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन डॅनीयल वॉलकॉट मुंबईत आला, पण ही दिल्ली नव्हती. ही होती मुंबई!! इथे त्याची गाठ पडली रमाकांत कुलकर्णी यांच्याशी. मुंबईत आल्या आल्या काही दिवसातच रमाकांत कुलकर्णी यांनी त्याच्या विरुद्ध असे सज्जड पुरावे जमा केले की त्याला पुढची ६ वर्ष जेलची हवा खावी लागली. पण या तपासादरम्यान डॅनीयल वॉलकॉटने रमाकांत कुलकर्णी यांना त्याच्या भारत भेटीच्या इतक्या कथा सांगितल्या की त्यावर नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजचे ४ सिझन तयार होतील.

बोभाटाकडे अर्थातच हा तपशील तयार आहे तो आम्ही पुढच्या आठवड्यात सांगूच, पण त्याआधी वाचा डॅनीयल वॉलकॉटचं पुढे काय झालं.

भारतातून सुटका झाल्यावर डॅनीयल वॉलकॉट अमेरिकेला पळाला. यावेळी त्याने आणखी एक धाडसी कारनामा केला. पाकिस्तानमधल्या कराची बंदरातून त्याने १ टन हशीश (अंमलीपदार्थ) त्याच्या लग्झरी यॉटवर भरले आणि अमेरिका कॅनडाच्या सीमेपर्यंत तो पोचला. पुन्हा एकदा त्याच्या साथीदारांनी घोळ घातला आणि अमेरिकन सागरी सुरक्षा दलाला चुकून बोट बुडते आहे असा रेडीओ मेसेज पाठवला. हा मेसेज मिळाल्यावर अमेरिकन तटरक्षक दल त्याच्या यॉटपर्यंत पोचले. ऐनवेळी झालेल्या घाईगडबडीत डॅनीयल वॉलकॉट ४०० किलो हशीश गाडीच्या डिक्कीत भरून सटकला.

पुन्हा एकदा त्याने नको ती चूक केली. त्याच्या कारचा पार्किंग सिग्नल ऑन ठेवून हायवेवर गाडी सुस्साट पळवायला सुरुवात केली आणि पोलिसांच्या ताब्यात सापडला. वाहतुकीचे नियम मोडले म्हणून पोलीस त्याला दंडाची रक्कम आकारात असताना पोलिसांचे लक्ष त्याच्या कारच्या डिक्कीकडे गेले. त्यांनतर साहजिकच अंमलीपदार्थांची वाहतूक केल्याच्या आरोपाखाली तो पुन्हा ६ वर्ष जेलमध्ये गेला.

२००० साली वयाच्या ७३ व्या वर्षी काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारेपर्यंत डॅनीयल वॉलकॉटचे आयुष्य असेच कायद्याला हुलकावण्या देण्यात गेले. या शेवटच्या प्रवासातसुद्धा त्याच्या गाडीत २०० किलो कोकेन सापडले.

कायद्याने डॅनीयल वॉलकॉटला बऱ्याचवेळा सूट दिली असली, तरी ज्या अंमलीपदार्थांच्या रॅकेटमध्ये तो काम करत होता तिथे चुकीला माफी नव्हती.

सबस्क्राईब करा

* indicates required