दर्शन पटेल यांनी दहा पेक्षा कमी वर्षांत बाजारात फक्त "फॉग चल राहा है।" हे सिद्ध कसे केले?? वाचा फॉगची यशोगाथा!!

२०११ साली भाराताच्या बाजापेठेत डिओड्रंट ह्या उत्पादनाचे मार्केट हे हिंदुस्थान लिव्हर च्या AXE (ऍक्स), पार्क अव्हेन्यू आणि निव्हिया या तीन ब्रँड्सच्या ताब्यात होते. पण येत्या दोन वर्षात एक नवा आणि अनोळखी ब्रँड या मार्केट मध्ये येणार होता आणि बाजारात disruption म्हणजेच उलथापालथ करणार होता. एवढेच नाही, तर पुढील काही दिवसात तो ब्रँड पहिल्या नंबरवर पोहचणार होता. हि कथा आहे त्या ब्रँडची म्हणजेच फॉगची!!
आपल्या या कथेचा नायक आहे दर्शन पटेल. १९८६ साली दर्शन यांनी आपल्या घरातला व्यवसाय म्हणजेच पारस नावाचा फॅमिली बिझनेस चालवायला सुरवात केली. दर्शन यांनी मार्केटिंग विषयात कोणतेच शिक्षण घेतलेलं नव्हतं. पारसची मूव्ह, रिंग गार्ड, सेट वेट, डर्मी कूल, डी कोल्ड ही उत्पादने होती. दर्शननी एकापाठोपाठ एक असे हे सगळे ब्रँड्स काढत त्यांनी पारसला घराघरात पोहचवले होते. २०१० साली पारस हि कंपनी ८५० मिलियन डॉलरला रेकीट बंकीसेर (reckitt benckiser) या कंपनीला विकल्या गेली. पुढे काय हा प्रश्न दर्शन यांना सतावत होता. त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता नव्हती. त्या भांडवलाच्या आधारावर त्यांनी विनी कॉस्मेटिक्स हि कंपनी स्थापन केली आणि पुढच्या मोठ्या आयडियाच्या शोधात प्रवास सुरु झाला.
दरम्यानच्या काळात भारतात डिओड्रंटचा वापर बऱ्यापैकी वाढला होता. यासाठी अर्थात कारणही तसेच होते. भारतात असलेल्या उष्ण वातावरणामुळे उकाडा आणि घाम आपल्या पाचवीला पूजलेत. त्यात तरुण पिढीने डिओड्रंटचा स्वीकार करून जोरादार वापर करायला सुरवात केली होती. यात सगळ्यात पुढे लिव्हरचा AXE होता तर दुसर्या क्रमांकावर पार्क एव्हेन्यू आणि त्यामागे इतर ७-८ ब्रँड होते.
२०१० मध्ये पटेल स्वतः ग्राहक अभ्यासात भाग घ्यायला लागले. ग्राहकांमध्ये बाजारात असणाऱ्या बऱ्याच ब्रँडची माहिती म्हणजेच ब्रँड रिकॉल होता. यातूनच एक सगळ्यात कॉमन तक्रार पुढे आली. आमचा डियो खूप लवकर संपतो हीच ती. दर्शन पटेल यांना हवी ती दिशा मिळाली होती. त्यांनी यावर काम करायला सुरवात केली. डियोसाठी लागणारे पंप अएरोसोल वापरतात म्हणजेच द्रव्याचे गॅसमध्ये रूपांतर करतात. दर्शन यांनी विना अएरोसोलचा म्हणजेच फक्त द्रव्य बाहेर फेकणारा पंप तयार केला. हीच त्यांच्या प्रॉडक्टची खासियत असणार होती आणि असा तयार झाला विना गॅसवाला डियो.
आता पुढचा खेळ मार्केटिंगचा असणार होता. प्रॉडक्टची पोझिशनिंग तयार होती. त्यांनी आपल्या डियोच्या बाटल्या लहान आकाराच्या केल्या. यामध्ये गॅस नाही हे ग्राहकांना लक्षात आणून द्यावे हा मागचा उद्देश. नावाच्या बाबतीत फॉग असे बारसे करण्यात आले. फ्रेंड्स ऑफ गुड गाईज अँड गर्ल्स असा त्याचा लॉन्ग फॉर्म असण्याची आख्यायिका आहे. पुढचा खेळ जाहिरातीचा होता. इतर ब्रॅण्ड्समध्ये गॅस आहे त्यामुळे हा लवकर संपतो तर फॉग हा फक्त लिक्विड स्प्रे आहे आणि ८०० वेळा वापरता येतो हीच गोष्ट ग्राहकांना सहज सोप्या भाषेत समजावून सांगायची होती. बिनागॅस वाला डियो अशी टॅगलाईन घेऊन आलेली जाहिरात जोरात चालली.
फॉगची कल्पना ग्राहकांनी उचलून धरली, त्यांच्यासाठी ते स्वस्त सुंदर टिकाऊ प्रॉडक्ट होते. पहिल्याच वर्षात फॉग ने १०० कोटी पेक्षा जास्त विक्री केली आणि बाजारात आता त्यांचा वाटा १०% एवढा होता. २०१३ साली म्हणजेच बाजारात आल्यापासून दोन वर्षातच फॉगने ॲक्स विरुद्ध बाजी मारून पहिला क्रमांक मिळवला होता.
फॉगची उत्तरोत्तर प्रगती होत राहिली. यातच २०१५ साली त्यांची "क्या चल रहा है?", "फॉग चल राहा है।" हि आयकॉनिक जाहिरात कॅम्पेन बाजारात आली. आजही हि जाहिरात फॉगसाठी ब्रँड रिकॉल करून देते. इथून पुढे फॉगच्या प्रगतीला अधिक वेध आला. २०१९ साली पर्यंत फॉगने १००० कोटींच्या टर्नओव्हरचा टप्पा पार केला होता. त्यावर्षी फॉगचा बाजारातला हिस्सा २०% पेक्षा जास्त होता आणि ॲक्स ३-४ नंबर वर फेकले गेले होते.
२०२१ साली दर्शन यांनी विनी कंपनीमधला आपला हिस्सा के. के. आर. या प्रायव्हेट इक्विटी कंपनीला विकला. दर्शन पटेल पुढेही या कंपनीची कमान संभाळणार आहेत. फॉग हा ब्रँड असाच मार्केटवर राज्य करत राहोण्याची शक्यता आहे.
लेखक: निखिल देशपांडे
आणखी वाचा: