१८००मध्ये सहज परदेश दौरे करणारा आणि तलवार गिळून गोऱ्यांना वेड लावणारा रामो सामी!!

आज एका चमत्कारीक विद्येची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कथेचा नायक आहे रामो सामी. निदान त्याचे इंग्लंडमधले नाव रामो सामी होते. भारतातले कदाचित रामस्वामी असेल. रामो सामी ज्या काळात इंग्लंडात जाऊन पोहचला तो कालखंड होता १८१० ते १८४४! विश्वास ठेवणं कठीणच आहे, तो नुसता पोहचलाच नाही, तर त्याच्या जादुगारीने गोर्यांना त्याने अगदी वेड लावलं होतं. ही जादू होती तलवार गिळण्याची!

भारतात इसवी सनाच्या २००० वर्षांपूर्वीपासून फकीर आणि मसणजोगी यांना ही विद्या अवगत होती. फक्त तलवार गिळणेच नाही, तर आग -निखारे खाणे, आगीवरून चालणे, काटेरी निवडुंगावर झोपणे, खिळ्यांच्या शय्येवर झोपणे,अशा अनेक अघोरी प्रयोगांसाठी भारतीय ओळखले जात होते. पण सातासमुद्रापलीकडे १८१० साली पोहचणारा आणि थेट इंग्लंडला जाऊन स्टेजवर तलवारी गिळण्याचा प्रयोग दाखवणारा रामो सामी एकच!
तलवारी गिळण्याची विद्या कोंडा डोरा जमातीत वंशपरंपरेने पित्याकडून मुलाकडे यायची. या जमातीचे सदस्य त्यांची ओळख पांडवांचे वंशज अशी सांगायचे. आंध्र प्रदेशच्या इस्ट गोदावरी, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम परिसरात या समाजाची वस्ती होती. रामो सामीचा जन्म या जमातीतलाच. पण इतिहासात त्याची बाकी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्याच्याबद्दल जे काही कळते ते इंग्लंड आणि अमेरिकेच्या वर्तमानपत्रातील बातम्या आणि जाहिरातींमधूनच!
तलवार गिळण्याची स्टंटबाजी म्हणजे तलवार चक्क तोंडातून - घशाच्या मार्गे- अन्ननलिकेत सारून ती बाहेर काढणे! ही एक विद्या होती. श्वास आणि स्नायू यांच्यावर पराकोटीचा ताबा मिळवून हे प्रयोग केले जायचे. रामो सामी आधी एकटाच हे प्रयोग करायचा. काही काळाने त्याने काही सोबती पण जमा केले आणि जादूचे नवनवे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. तलवारी गिळण्यासोबत दोरीचा जळता सुंभ पण खाऊन दाखवण्याचे प्रयोग तो करायचा. त्याच्या टीममध्ये नंतर किया खान कुर्से नावाचा एक जादुगार सामिल झाला. तो मणी, दोराआणि सुया गिळायचा. त्यानंतर काही वेळाने ओकल्यावर घशातून मण्यांची ओवलेली माळच बाहेर पडायची. किया खानची आणखी एक खासियत म्हणजे बंदूकीतून झाडलेली गोळी तो चक्क हातानी रोखायचा!!!


त्या काळात भारतातून येणार्या अशा चमत्कारिक जादूगारांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये वाढतच गेली. रामो सामी तर त्या जादुगारांचा बादशहाच म्हणायला हवा. कारण १८५० पर्यंत त्याचे हे प्रयोग गाजतच राहिले. असे म्हणतात त्याच्या मुलाला ही विद्या शिकवत असताना झालेल्या अपघातात मुलगा मरण पावला आणि त्याचे वाईट दिवस सुरु झाले. इतके वाईट की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दफनासाठी पण त्याच्या बायकोकडे पैसे शिल्ल्क नव्हते. हप्त्याहप्त्याने पैसे देऊ या बोलीवर शेवटी त्याला दफनाची जागा मिळाली. वर्तमानपत्रातून मदतीची याचना करण्यात आली. त्यातून मिळालेल्या पैशातून दफनाचे पैसे चुकवण्यात आले.
लक्षात घ्या, १८१० साली जेव्हा भारतात प्रवास करणे सहज शक्य नव्हते तेव्हा हा माणूस इंग्लंड-अमेरिकेत त्याच्या प्रयोगाचे दौरे करत होता. भारतातल्या कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात या माणसाची नोंद नाही. पण परदेशातल्या त्या काळच्या मासिकांमध्ये त्याच्यावर अनेक लेख लिहिले गेले. ही कला त्याच्यासोबत संपली नाही. आजही तलवार गिळण्याची कला अवगत असलेले लोक आहेत. काचा, दाढीच्या ब्लेड खाणारे लोक आहेत, पण रामो सामीची सर कोणालाच नाही.
एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा : पाश्चिमात्य देशातील वैद्यकीय शास्त्राला एक नवीन तंत्र म्हणजे एंडोस्कोपीची प्रेरणा या तलवार गिळणार्या कलाकारांकडून मिळाली!!
(सर्व फोटो प्रातिनिधिक)