अजरामर 'इंटेल बाँग' आणि मायक्रोप्रोसेसर चिपच्या मार्केटिंगची गोष्ट तुम्हाला कदाचित कोणीच सांगितली नसेल !!
वाचकहो वरच्या क्लिपवर टिचकी मारून बघा. एक ओळखीचा आवाज तुमच्या कानावर पडला असेल. आवाजाला 'इंटेल बाँग' असं नाव आहे. जगात दर पाच मिनिटाला हा आवाज कुठे ना कुठेतरी ऐकू येतच असतो. आपल्या संगणकाची 'धडकन', जिला चीप असं म्हणतात त्या चीप बनवणार्या इंटेल कंपनीचा हा निमॉनीक साउंड आहे. आता निमॉनीक म्हणजे काय ते नंतर सांगतोच, पण आधी इंटेलबद्दल थोडं वाचूया!
हो, हे तेच इंटेल. 'इंटेल इनसाइड' असं सांगणारं निळ्या रंगाचं स्टिकर संगणकावर लावलं असतं, तेच ते हे इंटेल. आपण मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल यांच्याबद्दल वारंवार ऐकत असतो कारण सर्वसाधारण माणसांच्या वापरात येणारी बहुतेक सॉफ्टवेअर या कंपन्यांनी लिहिलेली असतात. पण ही सगळी सॉफ्टवेअर्स ज्या घोड्यावर स्वार असतात, तो घोडा म्हणजे इंटेल!!
तर इंटेल काय करतं, तर संगणकात वापरल्या जाणार्या सेमिकंडक्टर चीपचं उत्पादन करतं. ज्यांनी १९८०-९०च्या दरम्यान संगणक वापरायला सुरुवात केली असेल त्यांना २८६-३८६-४८६ ही संख्यात्मक नावं आठवत असतील. नव्या पिढीला पेंटियम आणि पेंटियम-प्रो ही नावं ओळखीची असतील. तर आपल्या वापरातल्या संगणकाच्या चीपचे नाव पिढी-दर पिढी जसे बदलत गेले त्याप्रमाणे त्या कॉम्प्युटर्सची नावे बदलत गेली. एकेकाळी जेव्हा कोणीतरी म्हणायचे की माझ्याकडे ३८६ आहे, तेव्हा अप्रत्यक्ष अर्थ असा होता की माझ्या संगणकात इंटेलची ३८६ ही चीप वापरलेली आहे.
२८६ चीप वापरली जात असतानाच्या काळात इंटेलपुढे दुहेरी समस्या होती. एकतर त्यांची वस्तू वापरली जायची, पण त्यांचे नाव कोणाच्याही स्मरणात नसायचे. दुसरी समस्या अशी होती की सर्व श्रेय आणि ग्राहक हे संगणक बनवणार्या कंपनीकडे आपोआप जात होते. त्या कंपन्या जोपर्यंत नवी चीप वापरत, नाहीत तोपर्यंत इंटेलची नवी वेगवान चीप वापरणारे संगणक बनत नव्हते. त्यामुळे ३८६ तयार असूनही त्याची विक्री होत नव्हती.
म्हणून मग आमची नवी चीप ३८६ तयार आहे ती २८६ पेक्षा जास्त वेगवान आहे हे सांगण्यासाठी इंटेलने डायरेक्ट मार्केटिंग कँपेन करायचे ठरवले. त्यांनी ठिकठिकाणी २८६ ठसठशीत अक्षरात लिहून त्यावर लाल रंगाची फुली मारली आणि बाजूला लिहिले ३८६. काहीच दिवसांत ग्राहकांनी संगणक बनवणार्या कंपन्यांकडे ३८६ ची मागणी करायला सुरुवात केली. इंटेलचचे रेड-x कँपेन यशस्वी झाले.
रेड-x कँपेन यशस्वी होऊनही ग्राहकांशी इंटेलचा थेट संपर्क अजूनही पुरेसा झाला नव्हता. तोपर्यंत ४८६ चीपचाही जन्म झाला होता. पण संगणकाला ३८६ किंवा ४८६ असे नाव देण्यास कायद्याने मनाई होती. आता एकच उपाय होता, तो म्हणजे टेलिव्हिजनवर जाहिरात करणे. पण इंटेलच्या निळ्या लहरणार्या लोगोकडे २० सेकंद लोकं का बघतील हा मोठा प्रश्न होता. म्हणून इंटेलने या ब्रँड इमेजसोबत विशिष्ट सुरावट वापरायचे ठरवले. याला म्हणतात 'साउंड निमॉनीक'. निमॉनीक म्हणजे अनेक प्रतिमा किंवा आवाजांचा समूह जो पाहिल्या किंवा ऐकल्यावर मेंदू विशिष्ट आठवणींसोबत त्याची जोडणी करतो.
आता अशी सुरावट बनवणार कोण? केवळ एक लोगो आणि त्यासोबत सुरावट याच्या जोरावर इंटेलची स्मरणिका बनवायची होती. त्याच वेळी ' एडलवीस' बँडचा संगीत दिग्दर्शक वॉल्टर वेर्झोवा अमेरिकेत आला होता. त्याने हे आव्हान स्वीकारले आणि केवळ पाच सुरांच्या सुरावटीतून आपण ऐकतो तो 'इंटेल बाँग' जन्माला आला.
त्यानंतर आजपर्यंत ही सुरावट कानावर पडली की 'इंटेल इनसाइड' हे वेगळे सांगावे लागत नाही.