'हॅपी न्यू इयर' च्या मेसेजने रोखला आत्मघातकी हल्ला आणि कित्येक प्राण वाचले!!

बऱ्याचदा असं घडतं की सगळं काही सुरळीत चाललं असताना एखाद्या अनपेक्षित गोष्टीमुळे कामाचा बोऱ्या वाजतो. मॉस्कोमध्ये घडलेली २०११ सालची घटना याचं उत्तम उदाहरण आहे.
२४ जानेवारी २०११. रशियाची राजधानी मॉस्को इथल्या डोमेडेडेव्हा विमानतळावर सुसाईड बॉम्बिंग झाले होते. यात ३७ लोक मारले गेले होते, तर १७३ लोक जखमी झाले होते. या घटनेपूर्वीही असाच एक आत्मघातकी हल्ला होणार होता, पण तो चक्क एका स्पॅम मेसेजने रोखला गेला. काय घडलेलं त्यावेळी आणि स्पॅम मेसेजने हजारोंचे जीव कसे वाचले हे आजच्या लेखातून जाणून घेऊया.
२०११ च्या नवीन वर्षाच्या शेवटी मॉस्कोच्या रेड स्क्वेर येथे आत्मघातकी हल्ला कारण्याचं ठरलं होतं. हे काम एका महिलेवर सोपवण्यात आलं होतं. ती आपल्या शरीरावर बॉम्ब फिट करून रेड स्क्वेर येथे जाणार होती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांमध्ये स्फोट घडवणार होती. ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत चाललं होतं. पण ज्या फोनद्वारे स्फोट घडणार होता त्यावर एक स्पॅम मेसेज आला आणि प्लॅनमध्ये नसलेल्या गोष्टी घडल्या. स्पॅम मेसेज आल्यानंतर त्याच क्षणी तिच्या शरीरावरच्या बॉम्बचा स्फोट झाला. हजारोंना सोबत घेऊन जाण्याचा प्लान केलेल्या बाई एकट्याच मेल्या.
पुढे जाऊन या घटनेचा तपास करताना रशियन अधिकाऱ्यांना या गोष्टी लक्षात आल्या. आता नेमकं काय घडलेलं ते जाणून घेऊया
(प्रातिनिधिक फोटो)
आधी आत्मघातकी हल्ला कसा केला जातो ते थोडक्यात जाणून घेऊ. हे हल्ले करण्याचे बरेच प्रकार आहेत. बहुतांशवेळा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आत्मघातकी हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर बॉंम्ब फिट केला जातो. या व्यक्तीला सुसाईड बॉम्बर म्हणतात. स्फोट घडवण्याचं काम कधीकधी या सुसाईड बॉम्बरच्या हातात नसतं. हे काम दूर सुरक्षित अंतरावर बसलेली व्यक्ती करत असते. या व्यक्तीला हॅन्डलर म्हणतात. सुसाईड बॉम्बरला गर्दीच्या ठिकाणी सोडलं जातं आणि जास्तीतजास्त लोक मारण्याचा अंदाज घेऊन स्फोट घडवला जातो. स्फोट घडवण्यासाठी बरेचदा साध्या फोनचा वापर केला जातो. सुसाईड बॉम्बर योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर हॅन्डलर बॉम्बला जोडलेल्या फोनवर एक मेसेज पाठवतो, हा मेसेज ट्रिगरचं काम करतो आणि स्फोट घडतो.
मॉस्कोमधल्या घटनेत त्या महिलेने स्फोटक असलेला बेल्ट शरीराभोवती गुंडाळला होता. ज्या फोनने स्फोट घडणार होता, तो हाताळताना मोठी चूक झाली होती. अतिरेकी हा फोन शेवटच्या क्षणापर्यंत बंद ठेवतात, पण या घटनेत फोन चालू होता. त्यामुळे फोनवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा स्पॅम मेसेज आला आणि त्यामुळे स्फोट घडला.
(प्रातिनिधिक फोटो)
ती बाई नक्की कोण होती हे कधीच समजू शकलं नाही. स्फोट घडल्यानंतर तिचे सहकारी पाळताना दिसल्याची नोंद सरकारी फायलींमध्ये आहे. तिच्या हॅन्डलरबद्दल बोलायचं तर, तिचं नाव Zeinat Suyunova होतं आणि ती अवघ्या २४ वर्षांची तरुणी होती. तिचा नवरा त्यावेळी दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगवास भोगत होता.
तर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा तो मेसेज अनेकांसाठी जीवनदायी ठरला. पण या घटनेमुळे २४ जानेवारीच्या विमानतळ बॉम्बस्फोटाच्या घटनेला जन्म दिला हेही विसरून चालणार नाही. ती घटना रशियन यंत्रणेवर नामुष्की ओढवणारी होती.
टीप: सुसाईड बॉम्बर किंवा आत्मघातकी हल्ल्याबद्दल दिलेली माहिती वाचकांना घटनेबद्दल पूर्ण माहिती मिळावी आणि ज्ञानात भर पाडावी या उद्देशाने देण्यात आली आहे.