computer

अकराव्या वर्षी अमेरिकेतील सर्वात श्रीमंत बनलेली कृष्णवर्णीय मुलगी - सारा रेक्टर

वयाच्या अकराव्या वर्षी ती प्रकाशझोतात आली! त्याकाळात, म्हणजे १९१३ मध्ये "द कन्सास सिटी स्टार"ने तिच्याबद्दल एक हेडलाईन स्टोरी प्रकाशित केली होती,"Millions to a Negro Girl!!" त्या क्षणापासून तिचं आयुष्य गैरसमजुतींनी, कुतूहलाने आणि लोकांनी काढलेल्या अनुमानाने चितारलं गेलं!

पण त्यावेळी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची परिस्थिती खूप वाईट होती. आजच्या काळात जे काही चालू आहे त्यावरून साधारण शंभर वर्षांपूर्वी त्यांना कशी वागणूक मिळत असेल याचा एक अंदाज तसा येतोच. कृष्णवर्णीयांना गोऱ्या लोकांचे गुलाम म्हणून वागवलं जायचं. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. गोरे लोक राहात तिथं जाण्यास त्यांना परवानगी नव्हती. त्यांची प्रसाधनगृहंदेखील वेगवेगळी होती. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान आफ्रिकेतून अमेरिकेत लाखो लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आलं होतं. गुलामांची रसद कमी पडू नये यासाठी त्यांच्यावर मुलं जन्माला घालण्याची सक्ती करण्यात आल्याचंही एका महत्त्वपूर्ण डीएनए संशोधनातून स्पष्ट झालं आहे. तशी १८६०च्या दशकात गुलामगिरी बंद झाली असली तरी काळ्या लोकांची आयुष्यं काही फार सुधारली नव्हती.

अशा सगळ्या काळात सारा कृष्णवर्णीय म्हणून जन्मली होती. साराचा जन्म जोसेफ आणि रोझ यांच्या पोटी ३ मार्च १९०२ रोजी ओक्लाहोमामधील ट्वैन येथे झाला. जन्माच्या वेळी तिचं घर केवळ दोन खोल्यांचं होतं आणि ती जिथे राहत होती ती जमीन Muscogee creak नावाच्या जमातीला मिळालेल्या हिश्याचा भाग होती. साराचे आईवडील creak जमातीचे गुलाम होते. त्यांनी म्हणजेच जोसेफ आणि रोझ यांनी यादवी युद्धात युनियन आर्मीविरुद्धच्या लढाईत भाग घेतला होता.

१९०७ मध्ये ओक्लाहोमाच्या लढाईला यश आलं आणि Daues allotment कायद्यानुसार creak जमीन creak जमातीच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या गुलामांमध्ये वाटण्यात आली. साराचे आईवडील, स्वतः सारा, तिचा भाऊ, बहीण रिबेका या सगळ्यांना जमीन मिळाली. गुलामांना जी जमीन मिळाली होती ती शक्यतो खडकाळ, नापीक होती. रेक्टर घराण्याच्या वाट्याला आलेल्या १६० एकर जमिनीची किंमत त्यावेळी फक्त ५५० डॉलर्स होती. पण नंतर मात्र साराच्या वाढत चाललेल्या संपत्तीने ओक्लाहोमाच्या प्रशासनाला एवढे प्रभावित केलं की त्यांनी तिला चक्क "श्वेतवर्णीय" म्हणून जाहीर करून टाकलं!!

त्या मिळालेल्या जमिनीवरचा ३० डॉलर्सचा वार्षिक कर भरण्यासाठी साराच्या वडिलांनी ती जमिन डेव्होनियन ऑईल कंपनीला भाड्याने दिली. मात्र १९१३ मध्ये वाइल्डकॅट ऑईल ड्रिलरचे बी.बी. जोन्सनी जेव्हा तिथं दिवसाला २५०० बॅरल तेल काढणारं 'गुशर' मशीन आणलं तेव्हा साराचं नशीब खऱ्या अर्थाने पालटलं! वर्षाला ३० डॉलर्स भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेक्टर फॅमिलीला आता दिवसाला ३०० डॉलर्स मिळत होते. हळूहळू रेक्टर फॅमिली स्थिरस्थावर झाली. याचदरम्यान त्यांना टी. जे.पोर्टर याचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. रेक्टर फॅमिलीच्या जमिनीवर तेलाच्या अनेक विहिरी खोदल्या जात होत्या आणि रेक्टर फॅमिलीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होत होती! १९१३ च्या केवळ ऑक्टोबर महिन्यात त्यांनी तब्बल ११,५६७ डॉलर्सची कमाई केली!

सारा हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली. तिला कर्जाबद्दल, लग्न करण्याबद्दल विनवण्या येऊ लागल्या! त्यावेळी ती केवळ १२ वर्षांची होती! १९१४ मध्ये 'द शिकागो डिफेंडर' ने सारावर एक लेख लिहिला. या लेखात तिच्या संपत्तीचा ग्राफ्टर आणि तिच्या दुर्लक्षित आईवडीलांकडून गैरवापर होत आहे असं म्हटलं होतं. त्याचबरोबर ती अशिक्षित, गबाळी असून अस्वच्छ घरात राहते असंही म्हटलं होतं. बुकर टी वॉशिंग्टन, डब्लू इ बी डबोईस सारख्या आफ्रिकन अमेरिकन लीडर्सना तिच्याबद्दल चिंता वाटू लागली होती. मात्र तिच्यावर केला गेलेला एकही आरोप खरा नव्हता. सारा आणि तिचे भाऊबंद दररोज शाळेत जात होते, अत्यंत आधुनिक अशा पाच खोल्यांच्या आलिशान घरात राहत होते, एवढंच नाही तर त्यांच्याकडे एक गाडीसुद्धा होती!bobh

३ मे १९२० रोजी जेव्हा ती १८ वर्षांची झाली तेव्हा तिने Tuskege सोडलं आणि तिची फॅमिली कन्सास शहरात आली. त्यावेळी तिच्या नावावर वेगवेगळ्या स्टॉक आणि बॉण्ड्सची मालकी होती, एक बोर्डिंग हाऊस होत, एक बेकरी होती, बिझी बी नावाचं एक कॅफे होता आणि अत्यंत मोलाची, नदीच्या काठावरची २,००० एकर जमिन होती.

(रेक्टर मँशन)

त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी ती सध्या रेक्टर मँशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरात शिफ्ट झाली. त्याच वर्षी तिने केनेथ कॅम्पबेलशी लग्न केलं. त्या दोघांना एकूण तीन मुले झाली- केनिथ ज्युनिअर, लिओनर्ड आणि क्लारींस. १९३० मध्ये तिचा कॅम्पबेलशी घटस्फोट झाला आणि चार वर्षांनी तिनं विल्यम क्रॉफर्ड नावाच्या माणसाशी दुसरं लग्न केलं. २२ जुलै १९६७ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा तिची संपत्ती बरीच कमी झाली होती. ओक्लाहोमाच्या कब्रस्तानात तिचा दफनविधी करण्यात आला.

(सारा रेक्टर आपल्या मुलासोबत)

आम्हांला प्रश्न पडला की हे भाग्य फक्त साराच्याच वाट्याला कसे आले? तिला भाऊ-बहिण होते किंवा तिच्यासोबत इतरही कृष्णवर्णीय होते, त्यांनाही अशा मिळकतीचा लाभ का झाला नाही? तर याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. कदाचित जी जमीन साराच्या कुटुंबाच्या वाट्याला आली, फक्त तिथेच असा रोकडा देणारं खनिज सापडलं असेल. मात्र तिच्या भाऊ-बहिणीबद्दल अशी काही माहिती सध्यातरी कुठे मिळत नाहीय.

काही असो.. तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्त्व देणाऱ्या जगात किमान एका मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं जीवन याच पैशांमुळं थोडं सुसह्य झालं असावं हे काय वाईट आहे?

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required