दुष्काळात जीवनदायी ठरलेला हँडपंप आणि त्याचा अज्ञात निर्माता....वाचा सोलापूर हँडपंपच्या निर्मितीचा प्रवास !!

हा फोटो कसला आहे हे तुम्हाला सांगायलाच नको. अजूनही हा पंप आपण गावागावात बघतो. सोप्या भाषेत याला हँडपंप असं नाव आहे. लोकप्रिय संस्कृतीत त्याला अनेक टोपण नावंही दिली गेली आहेत. अधिकृत सरकारी भाषेत याचे नाव आहे India Mark II किंवा Sholapur Hand Pump. एकेकाळी महाराष्ट्रातल्या तहानेने व्याकुळलेल्या अनेक खेड्यांना या पंपाने तारून नेले आहे, जीवनदान दिले आहे. आताशा हा पंप फारसा वापरात दिसत नाही. बहुतेक गावात बंद असलेला हा पंप महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक कालखंडाचा साक्षीदार आहे. आजच्या लेखाचा उद्देश केवळ या पंपाविषयी माहिती देणे इतकाच मर्यादित नसून या पंपाच्या निर्मिती करणार्या अभियंत्याला धन्यवाद देणे असाही आहे.
हा कालखंड आहे १९६८ ते पुढच्या सत्तरीच्या दशकाचा! पावसासाठी मौसमी वार्यावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्राला दुष्काळाची एक मोठी निसर्गदत्त परंपरा आहे. या दशकात लागोपाठ अनेक वेळा मौसमी वार्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली होती. सरकारने याला दुष्काळ हा शब्द वापरू नये असे फर्मान काढले होते. दुष्काळाला 'अवर्षण' असे नवे नाव देण्यात आलेले होते. नाव बदलून दुष्काळ कसा कमी होणार ?
सर्वत्र दुष्काळी छावण्या उभारल्या गेल्या होत्या. अमेरिकेने PL 480 य कराराअंतर्गत दिलेल्या लाल गव्हावर आणि लाल ज्वारीवर जनतेची पोटं भरायची वेळ आली होती.
दोन वेळेची भ्रांत मिटली. पण पिण्याच्या पाण्याचे काय?
तो प्रश्न युनिसेफने या पंपाच्या माध्यमातून सोडवला. युनिसेफ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अमेरिकेत वापरला जाणारा हा पंप भारतात आणला. अमेरिकेत हा पंप दिवसभरात चार पाच वेळा वापरला जातो, पण इथे भारतात आख्खा गाव चोवीस तास हा पंप वापरायचा. भूगर्भात पाण्याची पातळी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. त्यामुळे काही ठिकाणी काही वेळच या पंपाला पाणी यायचे. त्याचे गणित निश्चित नसल्याने पाणी येईल या आशेने कोरडा पंप मात्र दिवसरात्र लोकं वापरून बघायचे. परिणामी ७५% पंप बंद पडले.
पंप दुरुस्त करण्यासाठी लागणारे कौशल्य असणारी गॅरेज-वर्कशॉप पण गावात नव्हती. थोडक्यात पंप आला, थोडे दिवस चालला आणि बंद पडला अशी स्थिती निर्माण झाली. गावातच सहज दुरुस्त करता येईल अशा सोप्या साध्या डिझाईनवर आधारीत पंप ही काळाची गरज होती. या गरजेतून जन्माला आला India Mark II किंवा Sholapur Hand Pump.
या पंपामुळे युनिसेफचे नाव झाले, पण पंपाच्या निर्मात्याचे नाव मात्र अंधारातच राहिले. आता वाचूया त्याच्या निर्मात्याबद्दल!
(ऑस्कर कार्लसन)
India Mark II किंवा Sholapur Hand Pump च्या निर्मितेचे श्रेय ऑस्कर कार्लसन या गृहस्थाकडे जाते. स्वीडनचा नागरीक असलेला हा अभियंता आणि त्याची पत्नी मार्था हे दोघेही हिंदुस्थानी कॉवेनंट चर्च या ख्रिस्ती धर्मप्रचारक संस्थेमार्फत अनेक वर्षं सोलापूरात वास्तव्याला होते. व्यवसायाने अभियंता आणि शिक्षक असलेल्या या गृहस्थाने बंद पडत जाणार्या हँडपंपचे नवे डिझाईन बनवले. काहीतरी वेगळे म्हणजे 'आउट ऑफ द बॉक्स' विचार करण्याची त्यांची सवय होती. रोज येणार्या समस्या तंत्रज्ञानाच्या आधारे सहज सोडवणे हा त्यांचा छंद होता. बंद पडणारे पंप हे आव्हान त्यानी स्वीकारले. त्यांनी हँडलचे डिझाइन बदलले. त्यामुळे बेअरींगवर येणारा ताण कमी झाला. कनेक्टींग रॉड आणि चेन यांची रचना बदलली. अशा रितीने पंपाचे नवे डिझाईन तयार झाले. युनिसेफने हे डिझाईन वापरून नवे पंप तयार केले. त्याला नाव दिले India Mark II किंवा Sholapur Hand Pump. युनिसेफचे नाव झाले, पण ऑस्कर कार्लसन यांचे नाव विस्मृतीत गेले. आजच्या तारखेस ऑस्कर कार्लसनच्या
डिझाइनवर आधारीत साठ लाखांहून अधिक Mark II पंप भारतात आणि आफ्रिकेत वापरले जातात. कॉवेनंट चर्चच्या विचारांचा प्रभाव असल्याने ऑस्कर कार्लसन यांना त्यांचे नाव झाले नाही याची कधीच खंत नव्हती. काही वर्षांनी स्वीडनला परत गेल्यावरही भारतासारख्या देशातल्या लोकांसाठी काय तंत्रज्ञान विकसित करता येईल यावर त्यांचा विचार चालू असायचा. दुर्दैवाने आयुष्याची शेवटची काही वर्षे ते अल्झायमरने ग्रस्त झाले आणि त्यातच कॅन्सर झाल्याने वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले.
India Mark II चे मॉडेल आता कालबाह्य झाले आहे. त्याची जागा India Mark III, आफ्रीडेव्ह, ब्लूपंप आणि VLOM या पंपांनी घेतली आहे. पण ऑस्कर कार्लसन यांचे या क्षेत्रातील योगदान न विसरणार्यासारखे आहे.