तुरुंग फोडून पळालेला परदेशी गुन्हेगार भारतात येऊन कसा राहातो? उत्तर कदाचित शांताराम पुस्तकावरच्या वेब सिरीजमध्ये असेल!!

भारतातून परदेशात पब्लिक दरवर्षी ढिगाने जात असते. या लोकांना तिथे जाऊन त्यांच्या स्वप्नातले आयुष्य जगायचे असते. बरेच भारतीय परदेशात राजकारण, सिनेमा ते उद्योग अशा बऱ्याच ठिकाणी महत्वाच्या पदांवर जाऊन बसले आहेत. याउलट इतर देशांतून भारतात लोकांचे येण्याचे प्रमाण तसे कमी दिसते. 

ही आयात कमी असली तरी अगदीच नाही अशी नाही. अनेक लोक भारतातही येतात. बऱ्याचजणांनी बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले आहे. भारतात अध्यात्मासाठी येणारेही आहेत. इथे आल्यावर देशाशी आणि देशाच्या संस्कृतीसोबत एकरूप झालेले अध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचा अनुभव पुस्तकरूपाने लिहिल्यावर तो गाजला अशीही उदाहरणे आहेत. पण हे सोडून इतरही लोक अगदी काही गुन्हेगारदेखील भारतात आले. आणि या गुन्हेगारांनी रंगवलेले विश्व देखील तितकेच गाजले. 

असाच एक गडी आस्ट्रेलियातून भारतात आला. कसा आला? तर तिथल्या जेलमधून पसार होऊन आला. पठ्ठ्या मुंबईत येऊन राहिला आणि चक्क पुस्तक लिहिता झाला. यातही भन्नाट बाब म्हणजे हे पुस्तकातल्या मुंबईच्या चित्रणाला भल्याभल्यांनी नावाजले आहे आणि या पुस्तकाने विक्रीचे अनेक उच्चांक गाठले आहेत. हे पुस्तक आहे, शांताराम!!! लेखक आहेत ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस!!

ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या स्वतःच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांपासून प्रेरणा घेतलेले हे पुस्तक जबरदस्त चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारे आहे. २० वर्षांपूर्वी आलेल्या या पुस्तकावर एक जबरदस्त सिनेमा होऊ शकतो असे पुस्तक वाचल्यावर प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज ना उद्या शांताराम लोकांना सिनेमा स्वरूपात भेटेल अशी अपेक्षा शांतारामच्या चाहत्यांना होती. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

 

 

ऍपल टीव्ही प्लस या कादंबरीवर वेब सिरीज घेऊन येत आहे आणि असून येत्या १४ ऑक्टोबरला या सिरीजचा पहिला एपिसोड रिलीज होणार आहे. एकूण १० एपिसोडची ही सिरीज जस्टीन कुर्झेल आणि भारत नालुरी यांनी डायरेक्ट केली आहे. भारत नालुरी हे एचबीओवरील त्सुनामी या प्रसिद्ध सिरीजचे डायरेक्टर आहेत. ते भारतीय इंग्लिश डायरेक्टर म्हणून ओळखले जातात. शांतारामवर सिनेमा करण्याचे प्रयत्न हे २००५ पासून सुरू आहेत. पण दरवेळेस काहीतरी अडचण येऊन हा प्लॅन रखडला जात असे. 

या सिरीजमध्ये राधिका आपटे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शुभम सराफ भारतीय वंशाचा अभिनेता देखील यात काम करत आहे. यासह या सिरीजच्य कास्टवर नजर टाकली तर अनेक भारतीय नावे दिसतात. शांताराम हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचवेळी वॉर्नर ब्रदर्सकडून याचे सिनेमा तयार करण्यासाठी हक्क विकत घेण्यात आले होते. या सिनेमासाठी जॉनी डेपला घ्यायचे हे देखील ठरले होते. कारण जॉनी डेप देखील या पुस्तकाच्या प्रेमात होता. 

तेव्हापासून अनेक कारणं येत गेली आणि शांताराम पडद्यावर येण्याचे पुढे ढकलण्यात येऊ लागले. २०१८ साली पॅरामाऊंट स्टुडिओजने शांतारामचे हक्क विकत घेतले आणि ऍपल टीव्ही प्लसची पहिली इंटरनॅशनल सिरीज ही शांताराम असेल असे घोषित करण्यात आले. पुढे पूर्वतयारी पूर्ण होत असताना लॉकडाऊन आणि इतर अनेक अडचणी आल्या. असा सर्व प्रवास पूर्ण करत शांताराम एकदाचा स्क्रीनवर भेटण्यासाठी येत आहे. 

Shantaram

आता ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस हा ऑस्ट्रेलियातील तरुण शांताराम कसा झाला तेही बघून घेऊ. ग्रेगरीच्या सुखी संसाराचा घटस्फोट झाला आणि त्याला त्याच्या मुलीचे अधिकार देखील मिळाले नाहीत. इथून त्याची गोष्ट सुरू होते. मग नैराश्यातून आलेली व्यसनाधीनता आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी असा दुर्दैवी प्रवास त्याचा सुरू झाला. 

यातही ग्रेगरीची विशेषता उठून दिसत होते. त्याला सज्जन चोर म्हटले जात असे. ज्या संस्थांचा चांगला इन्शुरन्स असे त्याच संस्थांमध्ये तो चोरी करत असे. सूट बूट घालून चोरी करायला जायचे आणि तिथे जाऊन त्यांना प्लिज, थँक यु असे अतिशय सभ्य शब्दात बोलून तो दरोडा घालत असे. पुढे जे व्हायचे तेच झाले आणि तो पकडला गेला. तब्बल १९ वर्षाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. पण १९८० साली तो त्या तुरुंगातूनही सटकला. लिंडसे फोर्ड या खोट्या नावाने पासपोर्ट बनवून तो मुंबईत आला.

त्याचा प्रवास खरंतर मुंबईहून न्यूझीलँड आणि मग जर्मनी असा होणार होता. पण भाऊला मुंबई आवडली आणि तो इथेच थांबला. मुंबईत त्याने प्रभाकर नावाच्या एक स्थानिक माणसाला गाईड म्हणून सोबत घेतले. याच प्रभाकरच्या आईने ग्रेगरीचे नामकरण हे शांताराम म्हणून केले. शांतारामचे सर्व सामान चोरीला गेले आणि त्याला झोपडपट्टीत दिवस काढावे लागले. इथेही त्याने लोकांना मदत केली. 

या झोपडपट्ट्यांमध्ये राहून त्याने मुंबईची विविधता, इथली संस्कृती सर्वकाही आत्मसात केले. एवढेच काय तो मराठी देखील अस्खलित बोलू लागला. या काळात तो कार्ला नावाच्या एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडला. मुंबई देखील तो परत गुन्हेगारी विश्वात अडकला आणि थेट आर्थर रोड जेलमध्ये गेला. इथे त्याची मदत अब्दुल कदर खानने केली म्हणून तो अफगाणिस्तानला त्याच्याकडे जाऊन शस्त्र स्मगलिंग करू लागला. इथे त्याला काही गोष्टींचा पश्चाताप झाला आणि आपण चांगले आयुष्य जगायला हवे असे वाटू लागले.

पुस्तक हे अतिशय चित्तथरारक घटना, प्रसंग आणि प्रवासाने भरले असले तरी यातले किती घटना खऱ्या आणि किती त्याच्या कल्पनेची किमया हे सांगणे कठीण आहे. १९९० साली त्याला फ्रॅंकफर्ट येथे अटक करण्यात आली. इथूनही तो सटकला. पण एकदाचा काय तो चोर पोलीसचा खेळ संपवून टाकू आणि सुखात जगू असे म्हणत तो आपली उरलेली शिक्षा पूर्ण करण्यासाठी तुरुंगात परतला. 

याच ठिकाणी त्याने शांताराम पूर्ण केली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने आपली ही कांदबरी प्रकाशित केली आणि नंतर स्वत:ला सामाजिक कामांमध्ये गुंतवून घेतले. पुढे त्याला त्याच्या मुलीला देखील भेटता आले. २०१५ साली द माऊंटन शाडोज नावाचे दुसरे पुस्तक प्रकाशित केले. याचवर्षी द स्पिरीच्युअल पाथ नावाचे तिसरे पुस्तक देखील आले आहे.

एक माणूस आपल्या ७३ वर्षांच्या आयुष्यात इतक्या प्रचंड प्रमाणावर आयुष्य विविधांगाने जगतो आणि तरीही आज तो माणूस सेलेब्रिटी म्हणून जगत आहे आणि जगाला मार्गदर्शन करत आहे. आयुष्य हे कुठल्याही टप्प्यावर सुरू करता येते याचे शांताराम उत्तम उदाहरण आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required