computer

स्टीम हॉर्स : रुळावरून धावण्यापूर्वी रेल्वे अशी चालायची!! हा घ्या चालणाऱ्या इंजिनचा इतिहास!!

रेल्वे हा तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. सन १८५३ मध्ये जेव्हा ठाणे ते बोरीबंदर दरम्यान पहिल्यांदा रेल्वे धावली तेव्हा बिनबैलाची हाकली जाणारी ही गाडी बघून एतद्देशियांनी साहेबाच्या अकलेला मनोमन सलाम ठोकला होता. पण ही बिनबैलाची गाडी उत्क्रांत होताना २०० वर्षं खर्ची पडली आहेत. तसा पाहता वाफेच्या पूर्णपणे स्वयंचलित यंत्रापासून आजवरच्या आधुनिक रेल्वेपर्यंतचा रेल्वे इंजिनिअरींगचा २०० वर्षांचा इतिहास आहे. त्यादरम्यान इंजिनिअर्सनी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा कस लावण्याचा प्रयत्न केला. कुशल तंत्रज्ञांनी व कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असलेली इंजिन्स बनवली. यात काही कल्पना उत्तम होत्या, काही अभूतपूर्व होत्या, तर काही तितक्याच वैचित्र्यपूर्ण होत्या. या खटपट्या लटपट्या माणसांमधलाच एक म्हणजे विल्यम ब्रन्टन नावाचा अवलिया.

या विल्यम ब्रन्टनचा जन्म स्कॉटलंडमधला. त्याच्या वडिलांचं घड्याळं बनवायचं दुकान होतं. यातूनच ब्रन्टनला यंत्रांविषयी आवड निर्माण झाली. यंत्रं ‘खोलून’ पाहणं, त्याच्याशी खेळणं सुरू झालं. पुढे 3-4 ठिकाणी नोकरी केल्यावर तो बटर्ले नावाच्या कंपनीत रुजू झाला. त्याआधी त्याने जेम्स वॅट (वाफेच्या इंजिनाचा जनक) काम करत असलेल्या कंपनीतही काम केलं. तो काळ असा होता, जेव्हा वाहतूक मुख्यत: घोडागाडीने होत असे. वाफेचं इंजिन हे काहीसं अवजड आणि धोकादायक प्रकरण वाटायचं. जोडीला त्याचा प्रचंड आवाज. त्यामुळे लोकांच्या मनावर त्याने अजून म्हणावं तितकं गारुड केलं नव्हतं. पण दिवस बदलले. सन १७९९ ते १८१५ हा काळ गाजला तो नेपोलियनच्या लढायांनी. त्या काळात वैरणीचा खर्च खूपच वाढला. त्यामुळे घोडागाडी(ट्राम)च्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न उभं राहिलं. घोडागाडीचा अजून एक तोटा म्हणजे तीव्र चढ असलेल्या ठिकाणी ती तितकीशी उपयोगी पडत नसे. या बाबतीत स्टीम म्हणजेच वाफेचं इंजिन सरस ठरत होतं.

ब्रन्टनचे इंजिननिर्मितीचे प्रयत्न दरम्यानच्या काळातही सुरूच होते. १८१३ मध्ये बटर्लेमध्ये काम करत असताना त्याने एक अभूतपूर्व डिझाइन तयार केलं. चालणार्‍या इंजिनाचं. तेच हे मेकॅनिकल ट्रॅव्हलर किंवा स्टीम हॉर्स. या इंजिनाला रुळावरून चालण्यासाठी चार चाकं तर होतीच, शिवाय इंजिनाच्या मागच्या बाजूला त्याला ढकलणारे दोन यांत्रिक पायही होते. एखादा फिरता विक्रेता आपली हातगाडी जशी ढकलत नेईल अगदी तशाच प्रकारे हे इंजिन त्या दोन पायांनी ढकललं जायचं. फक्त त्या पायाच्या वर धड, शीर वगैरे नव्हतं.

दिसायला हे इंजिन काहीसं विचित्र वाटलं तरी ही कल्पना एकदम नाविन्यपूर्ण होती. सुरुवातीला ब्रन्टनला वाटलं होतं, की लोखंडी रुळावरून लोखंडी चाकं जात असताना जास्त वजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेलं ट्रॅक्शन निर्माण होणार नाही. त्यामुळे मालवाहतुकीत अडथळे येतील. त्याच्यातूनच दोन यांत्रिक पाय (मेकॅनिकल लेग्ज) बसवण्याची आयडिया त्याला सुचली.

त्याचा हा पहिला नमुना जवळपास २ वर्षं चुनखडीचे मोठे ब्लॉक्स वाहून नेण्यासाठी वापरला गेला. तेव्हा त्याचा वेग होता ताशी ३ मैल, म्हणजेच ४.८ किमी. त्यानंतर त्याने अजून एक असंच इंजिन बनवलं. हे आधीच्या तुलनेत मोठं होतं आणि जास्त तीव्र चढ असलेल्या रस्त्यावरूनही जाऊ शकत होतं.

पण... बर्टनचं इंजिन प्रायोगिक अवस्थेच्या फार पुढे जाऊ शकलं नाही. सन १८१५ मध्ये फिलाडेल्फियामध्ये इंजिनाचं प्रात्यक्षिक दाखवताना बॉयलरचा स्फोट झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. रेल्वेच्या इतिहासातला हा पहिलाच मोठा अपघात. या अपघाताने स्टीम हॉर्सची घोडदौड कायमचीच थांबवली.

जगात प्रतिभावंतांची कमतरता नाही. पण सगळ्यांच्याच वाट्याला मानसन्मान येत नाही. काहींची तर ओळखही काळानुरूप विसरली जाते. बर्टनच्याही बाबतीत असंच काहीसं झालं. काय सांगावं, तो अपघात घडला नसता तर कदाचित काही वेगळं चित्रही पाहायला मिळालं असतं...

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required