computer

उंदीर मारण्याचं औषध, टर्पेन्टाईन, टॅक्सीचा अपघात...५ पेक्षा जास्त वेळा खुनाचा प्रयत्न करूनही न मेलेला माणूस !!

आजची गोष्ट १९२९ सालच्या महामंदीच्या काळातली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, उद्योगधंदे बंद पडत होते, पहिल्या महायुद्धातून अजून जग सावरलं नव्हतं. आज आपण जी डोळे दिपवणारी अमेरिका बघतो तिच्यापासूनच या मंदीला सुरुवात झाली. अमेरिकेत लोक गळ्यात पाट्या लावून नोकरी मागत फिरायचे. हा फोटो पाहा.

हे सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या लेखात ज्या घटनेबद्दल आम्ही बोलणार आहोत ती या महामंदीमुळे आलेल्या बेकरीतून घडली आहे. बेकारी ही गुन्हेगारीला जन्म देण्यासाठी कारणीभूत ठरते हा इतिहास आहे. अमेरिकेतल्या महामंदीच्या काळातील बेकारीनेही गुन्हेगारीला जन्म दिला. आपल्या गोष्टीतली पात्रं ही अशीच बेकारीला कंटाळलेली होती.

टोनी मॅरीनो, जोसेफ ‘रेड’ मर्फी, फ्रान्सिस पास्का, हर्षे ग्रीन, डॅनियल क्रिस्बर्ग ही आपल्या कथेतली पात्रं. पात्रं म्हणण्यापेक्षा आपल्या कथेतले व्हिलन म्हणू शकतो. या पाचांपैकी टोनी मॅरीनो हा मुख्य. तो न्यूयॉर्कमध्ये दारूचा गुत्ता चालवायचा. साल होतं १९३३. महामंदीचा काळ शिखरावर होता. हे पाचही तरुण खिसा रिकामा असल्याने पैसे कमावण्याचे मार्ग शोधत होते.

(टोनी मॅरीनो)

गोष्ट पुढे सांगण्यापूर्वी गोष्टीतल्या एका मुख्य पात्राची ओळख करून द्यायला हवी. त्याचं नाव मायकल मोलॉय. हा मायकल मोलॉय म्हणजे आपल्या गोष्टीचा हिरो. तो आयरिश वंशाचा होता. त्याचं वय पन्नाशीच्या जवळपास होतं. आपल्या देशात पोट भरत नाही बघून त्याने नोकरी आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिका गाठली. पण अमेरिकेतली परिस्थितीही काही वेगळी नव्हती. नोकरी नसल्याने अनेकजण बेघर आणि बेकार बसलेले होते. मायकल मेलॉयही त्यांच्यात सामील झाला. तो कचरा उचलायचा किंवा साफसफाईचं काम करायचा आणि संध्याकाळी टोनी मॅरीनोच्या गुत्त्यावर येऊन दारू ढोसायचा.

(टोनी मॅरीनोचा दारूचा गुत्ता)

ज्या दिवसापासून या कथेला सुरुवात होते त्या दिवशी आपल्या व्हिलन गँगमधले पाचजण गुत्त्यावर बसून पैसे कमावण्यासाठी काय शक्कल लढवायची याचा विचार करत बसले होते. त्यांनी पुन्हा एकदा आपली जुनी पद्धत आजमावायचं ठरवलं. ही जुनी पद्धत काय होती ते आधी जाणून घेऊ. एखादी गरीब व्यक्ती पकडायची आणि तिला इन्शुरन्स पॉलिसी काढायला लावायची. या पॉलिसीचे लाभार्थी म्हणून स्वतःचं नाव लावायला सांगायचं. मग त्या गरीब व्यक्तीला मारून टाकायचं आणि पॉलिसीचे पैसे घेऊन चैन करायची. त्यांनी एक वर्षापूर्वी या पद्धतीने यशस्वीपणे पैसे कमावले होते.

टोनी मॅरीनोने माबेला कार्लसन नावाच्या बेघर मुलीशी मैत्री केली होती. तिला २००० डॉलर्सची इन्शुरन्स पॉलिसी काढायला लावून लाभार्थी म्हणून स्वतःचं नाव लावून घेतलं होतं. ते थंडीचे दिवस होते. माबेलाचा जीव घेण्यासाठी टोनीने तिला दारू पाजली, तिच्यावर पाणी ओतलं आणि ती नशेत असताना तिला नग्नावस्थेत खोलीत बंद केलं. बाहेरची थंड हवा आत यावी म्हणून खोलीतली खिडकी उघडी ठेवली होती. रात्रभर ती थंडीत कुडकुडत राहिली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासात हा एक अपघात असल्याचं सिद्ध झालं आणि मॅरीनोला पॉलिसीचे पैसे मिळाले.

टोनी मॅरीनो आणि त्याच्या गँगला वाटत होतं, की हा प्रयोग पुन्हा एकदा करता येऊ शकतो. गरज होती ती एका व्यक्तीची. या व्यक्तीच्या मागेपुढे कोणताही नातेवाईक नसावा आणि मित्रमंडळीही नसावी. या मागणीला पात्र असलेला माणूस त्याच गुत्त्यावर त्यावेळी पेंगत बसला होता. अर्थातच मायकल मेलॉय.

टोनी मॅरीनो आणि गँगने मायकलशी मैत्री केली. त्याला फुकटची दारू पाजली. मायकलच्या माथी एक फ्री स्कीम मारण्यात आली. त्यांनी सांगितलं की, "आम्ही टोनी मॅरीनोला स्थानिक निवडणुकीत जिंकवण्यासाठी आम्ही लोकांच्या सह्या गोळा करत आहोत. जर तू आम्हाला सही दिलीस तर तू उधारीवर हवी तेवढी दारू पिऊ शकतोस." अमर्याद दारूच्या लालसेपोटी मायकलने सही करायची तयारी दाखवली. गँग तर आधीच तयार होती. त्यांनी मायकलकडून ३ इन्शुरन्स पॉलिसीजवर सह्या करून घेतल्या. एका रात्रीत मायकलच्या नावावर एकूण ३५०० डॉलर्सच्या पॉलिसीज झाल्या होत्या.

टोनी मॅरीनो आणि गँगचा समज होता की मेलॉय हा वृद्ध आहे, तो दारू पिऊन लगेच ढगात जाईल. पण मायकल अट्टल दारूबाज निघाला. तो रोज गुत्त्यावर येऊन हवी तेवढी दारू प्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हायचा. मेलॉय मरत नव्हता आणि सगळी योजना बारगळली होती. मग टोनी मॅरीनो आणि गँगने क्रूर पावलं उचलायला सुरुवात केली. टोनीने त्याच्या दारूत Antifreeze हे प्रतिजैवक मिसळलं. आश्चर्य म्हणजे मायकल त्यातूनही बचावला. त्यानंतर टोनीने दारूत टर्पेन्टाईन मिसळलं. मायकल त्यातूनही वाचला. त्यानंतर टोनीने घोड्याला चोळतात तो बामही वापरून बघितला आणि शेवटचा पर्याय म्हणून उंदराचं विषदेखील वापरलं.

मायकल मेला का? नाही!!

टोनी मॅरीनो आणि गँग हतबल होणारी नव्हती. त्यांनी मायकलला दारूत शिजवलेले ऑयस्टर म्हणजे शिंपले खाऊ घातले. ही कल्पना गँगमधल्या फ्रान्सिस पास्काची होती. त्याने एकदा एका माणसाला व्हिस्कीसोबत ऑयस्टर खाऊन मरताना पहिलं होतं. मायकलने हे ऑयस्टर सुद्धा पचवले. एवढंच नाही तर टोनीने दिलेले सडलेल्या माशाचे सँडविचही मायकलने चवीने खाल्ले. या सँडविचमध्ये विष कालवलेलं होतं. मायकलने हे सगळं नुसतंच पचवलंच नाही, तर वजनही वाढवलं.

टोनी मॅरीनो आणि गँगचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आणि या प्रयत्नात स्वतःचंच नुकसान करून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पद्धतीचा अवलंब केला. त्या मुलीला मारलं तसं मायकललाही थंडीनेचे मारण्याची योजना आखण्यात आली. एकदा मायकल नेहमीप्रमाणे भरपूर दारू पिऊन टोनीच्या गुत्त्यातून बाहेर पडला. गुत्त्याबाहेर पडताच गँगने त्याच्यावर थंड पाणी ओतलं. मायकल नशेत एका जागी पडून राहिला. पण तो मेला नाही. रात्री अचानक जाग आल्यावर तो आसऱ्यासाठी पुन्हा टोनीच्या गुत्त्याकडे आला आणि जमिनीवरच बेशुद्धावस्थेत पडून राहिला.

हे प्रकरण आता टोनी मॅरीनो आणि गँगच्या ‘इज्जतीचा सवाल’ झाला होता. एकीकडे मायकल जगत होता तर दुसरीकडे टोनी इन्शुरन्सचे हफ्ते फेडत होता. टोनीची सहनशक्ती एवढी ताणली गेली की त्याने एका टॅक्सी ड्रायव्हरला सांगून मायकलचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. मायकलची हाडं मोडली पण काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढून तो पुन्हा गुत्त्यावर हजर!!

मायकलला अप्रत्यक्षपणे मारण्याचे सगळे प्रयत्न करून झाले होते. आता टोनी मॅरीनो आणि गँगने मायकलला स्वतःच जीवे मारण्याचं ठरवलं. त्यांनी मायकलच्या तोंडात वायूची नळकांडी खुपसली. तो गुदमरावा यासाठी त्याच्या तोंडाभोवती टॉवेल गुंडाळण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या तोंडात वायू सोडण्यात आला. पुढच्या पाच मिनिटांतच मायकल मेला होता.

फ्रान्सिस पास्काने आपल्या एका डॉक्टर मित्राला मृत्युचं खोटं सर्टिफिकेट द्यायला लावलं. या सर्टिफिकेटनुसार मायकलचा मृत्यू लॉबर न्युमोनियाने झाला होता.

मायकलला मारण्याचे एवढे प्रयोग केल्यानंतर ही गोष्ट फक्त या ५ जणांपुरती मर्यादित राहणं शक्य नव्हतं. ही गोष्ट लोकांमध्ये पसरली. मायकलला “Malloy the Durable” म्हणून लोक ओळखू लागले. ही गोष्ट उडत उडत पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचली आणि या गोष्टीचा शेवट झाला.

टोनी मॅरीनो आणि गँगने ज्या वायूच्या सहाय्याने मायकलचा जीव घेतला होता तो कार्बन मोनोक्साईड होता. कार्बन मोनोक्साईड शरीरात गेल्यानंतर तो अनेक महिने शरीरात राहतो. पोलिसांनी मायकलच्या मृतदेहाचं पुन्हा परीक्षण केलं. मायकलच्या शरीरात कार्बन मोनोक्साईड आढळून आला. याखेरीज ज्या डॉक्टरने खोटं सर्टिफिकेट दिलं होतं त्या डॉक्टरला आणि टॅक्सी ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं. थोडा दम दिल्यावर दोघांनी पोलिसांना सगळं सांगितलं.

(वरच्या बाजूला : डॅनियल क्रिस्बर्ग, जोसेफ ‘रेड’ मर्फी. खालच्या बाजूला : फ्रान्सिस पास्का, टोनी मॅरीनो.)

अशा प्रकारे टोनी मॅरीनो आणि गँग पकडली गेली. आजही मायकल मेलॉय आणि त्याची कथा ‘माणूस जो कधीही मरणार नाही’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. महामंदीच्या काळात लोकांनी जगण्यासाठी काय काय उपद्व्याप केले त्याचं हे छोटं उदाहरण.

सबस्क्राईब करा

* indicates required