computer

आठव्या वर्षी हातात कंप्युटर घेण्यापासून ते स्ट्रीमिंग कंपनीची अधिकारी...या जळगावच्या महिलेने इतिहास रचलाय!!

वयाच्या आठव्या वर्षी तिला कंप्युटर मिळाला. आजच्यासारखा घरोघरी कंप्युटर असण्याचा तो काळ नव्हता. त्यामुळे तेव्हा आणि तेही इतक्या लहान वयात कंप्युटर मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती. तिला हे खेळणे मिळाले आणि तिचे जगच पालटून गेले. कंप्युटरमधल्या वेगवेगळ्या आणि नवनवीन गोष्टी शिकणे हेच तिचे पॅशन बनले. भविष्यात कंप्युटर क्षेत्रातच करिअर करायचे हेही पक्के झाले. आज ती कॉन्फ्लूएंट या स्ट्रीमिंग कंपनीची मुख्य तांत्रिक अधिकारी आहे. इतकेच नाही तर फोर्ब्ज मासिकानेही तिच्या या यशाची दखल घेत तिला सेल्फ मेड मिलेनियरच्या यादीत स्थान दिले आहे. नेहा नारखेडे या भारतीय-अमेरिकन अब्जाधीश तरुणीचा हा प्रेरणादायी प्रवास वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही.

नेहा मुळची जळगावची. तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून कंप्युटर सायन्समधली पदवी पूर्ण केली आणि  मास्टर्स डिग्रीसाठी जॉर्जिया टेक या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. २००७ मध्ये तिची मास्टर्स डिग्री पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच तिला ओरॅकल कंपनीत नोकरी मिळाली. पुढे तिने ओरॅकल सोडली आणि लिंकडीनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रूजू झाली. 

लिंकडिनमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर तिने आणि लिंकडिनमध्येच काम करणाऱ्या तिच्या आणखी दोन सहकाऱ्यांनी स्वतःचाच एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करायचं ठरवलं. तिघांनी मिळून २०१४ मध्ये कॉंफ्लूएंट नावाची स्ट्रीमिंग कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा बिझनेस २.५ अब्ज डॉलरच्या वरती पोहोचला आहे.

नेहा कॉंफ्लूएंटमध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी आहे. अलीकडेच फोर्ब्जनेही तिच्या या यशाची दाखल घेत नेहा अमेरिकेतली सर्वात श्रीमंत स्त्री असल्याचा निर्वाळा दिला आहे. फोर्ब्जने तिला सेल्फमेड वूमन म्हटले आहे. नेहाने हे यश स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर खेचून आणले आहे. आज अनेक स्त्रिया तिच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात. 

नेहा मात्र आपल्या या यशाचे श्रेय आपल्या वडिलांना देते. लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी महत्वाकांक्षी होण्याचे स्वप्न तिच्यात रुजवले. तिला लहानपणीच भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पेप्सीच्या सीईओ इंद्रा नुयी, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, अशा कर्तबगार महिलांचा गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलेल्या या गोष्टीनी नेहामध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. या स्त्रियांनी जसे आपले कतृत्व सिद्ध केले अगदी त्याचप्रमाणे आपणही एक दिवस आपले कर्तृत्व सिद्ध करू हे तिच्या बालमनावर तिने ठसवून घेतले. “लहानपणी जर वडिलांनी या महान स्त्रियांची आणि त्याच्या कार्याची ओळख करून दिली नसती तर कदाचित आज मी इथवर पोहोचलेच नसते,” असे ती म्हणते. या गोष्टीतून नकळतपणे तिच्या महत्वाकांक्षेचा पायाच रचला गेला. 

लक्षाधीश होण्याच्यापर्यंतच्या आपल्या प्रवासबाबत बोलताना नेहा म्हणते, “पुरुषप्रधान क्षेत्रात काम करत असताना नेहमीच तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान असते. इथे तुम्ही खरे तर बहिरे होऊनच वावरले पाहिजे कारण, एक स्त्री म्हणून तुम्ही कशा असक्षम आहात याची हजार कारणे तुम्हाला ऐकवली जातात. तुम्ही या सगळ्या नकारात्मक विचारांकडे जितके दुर्लक्ष कराल तितका तुमच्या यशाचा मार्ग सुकर होत जाईल.” 

“आजवर ज्या ज्या स्त्रियांनी आपल्या समोरील अडथळे पार करून स्वतःचा ठसा उमटवला मी त्यांनाच माझी प्रेरणा मानत राहिले. माझ्यासारख्याच दिसणाऱ्या या स्त्रिया जर जे करू शकत असतील तर मी का नाही? हा विचार मला सातत्याने पुढे जाण्याचे बळ देत राहिला.”

“तुमच्या प्रवासात अडथळे तर येतीलच, हे अडथळे जर काचेचे असतील तर त्यांना तोडून पुढे जा पण जर हे अडथळे दगडांचे असतील तर त्याला वगळून पुढे जा, पण चालण्याचे सोडू नका,” असा सल्ला ती सगळ्या धडपडणाऱ्या स्त्रियांना देते. 

“कोणतीही नवी गोष्ट शिकणे किंवा नवे काहीतरी आत्मसात करणे अनेकांना कठीण वाटते, पण सातत्याने आणि चिकाटीने जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलात तर त्यात अशक्य असे काहीच राहत नाही. जेव्हा तुम्ही कोणतीही नवी सुरुवात करता तेव्हा फक्त हेच लक्षात ठेवा,” असे ती म्हणते. “या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलींना/महिलांना माझे तरी हेच सांगणे असेल.”

एका सॉफ्टवेअर इंजिनियर, एका कंपनीची सीइओ असण्याबरोबरच नेहा लेखिका देखील आहे. आपल्या ग्रीट या पुस्तकात तिने तिचा प्रवास आणि यशस्वी होण्याचा तिचा खास मंत्र शेअर केला आहे. ती म्हणते, 'बौद्धिकदृष्ट्या कणखर असणे तुम्हाला कळपापासून दूर ठेवते, तुमच्या वाटेतील अडथळे पार करण्यासाठी तुम्हाला याची गरज असते."
अमेरिकेतील या सर्वात श्रीमंत स्त्रीचा हा प्रवास आणि तिचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वाचून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required