साध्या आईसक्रिमवर प्रयोग करून त्यांनी कोटींची उड्डाणे कशी घेतली? वाचा रघुनंदन कामत यांची यशोगाथा!!

त्यांचे वडील फळं विकून महिन्याला जेमतेम १०० रुपये कमवायचे, आज त्यांच्या कंपनीची वर्षाची कमाई ३०० कोटी रुपये आहे. ही गोष्ट सिनेमातली नाही तर खऱ्या आयुष्यातली आहे. त्यांचं नाव मुलकी रघुनंदन श्रीनिवास कामत. हे नाव तुम्ही ऐकलं नसेल, पण Natural Ice Cream हे नाव कुठे ना कुठे तरी नक्कीच ऐकलं असणार.
रघुनंदन श्रीनिवास यांची यशोगाथा म्हणजे फक्त यशस्वी व्यावसायिकाची यशोगाथा नाही, तर नवीन प्रयोग करून यशस्वी झालेल्या व्यावसायिकाची यशोगाथा आहे. या प्रयोगांबद्दल तर आपण जाणून घेऊच, पण आधी ६० वर्षे मागे जाऊ.
रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकच्या मुलकी येथला. सात भावंडांपैकी ते सर्वात लहान होते. सुरुवातीपासूनच कामत यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील फळझाडे भाड्याने घेत आणि ती फळे विकून कुटुंब गुजराण करत असे. गरिबी आणि पैशांच्या अभावी कामत यांच्या कुटुंबाने कर्नाटक सोडून मुंबईची वाट धरली. त्यांच्या भावाने आधीच मुंबईत छोटं हॉटेल सुरु केलं होतं. या हॉटेलच्या कमाईत संपूर्ण कुटुंबाचा गाडा हाकला जाणार होता. हे संपूर्ण कुटुंब जुहूच्या १२ फुटांच्या खोलीत राहू लागलं. त्यावेळी कामत यांचं वय अवघं १५ वर्षे होतं.
कामत यांनी दोनवेळा बोर्डाची परीक्षा दिली आणि दोन्ही वेळा ते नापास झाले. शेवटी त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या भावाच्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना पाठवलं. हे हॉटेल दक्षिणात्य पदार्थांच होतं आणि सोबतच तिथे घरीच तयार केलेलं आईस्क्रीमही मिळायचं. इथेच कामत यांच्या भविष्यातील कंपनीच्या जन्माला सुरुवात झाली असे म्हणता येईल. हॉटेलमध्ये असताना आईस्क्रीम विकण्याचा आणि तयार करण्याचा अनुभव त्यांना आला. पुढे त्यांनी फक्त शिकून न घेता अभ्यास वाढवला. सरधोपटपणे चॉकलेट आणि व्हॅनिला आईसक्रिम न विकता त्यांना वेगळे प्रयोग करण्याची कल्पना सुचली.
पुढे जाऊन भावाच्या हॉटेलपासून वेगळं झाल्यावर त्यांनी जुहू कोळीवाडा भागात २०० स्क्वेअर फूट जागेत नवीन हॉटेल सुरु केलं. नवीन हॉटेलमध्ये त्यांनी आपली तीच जुनी कल्पना राबवली. चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवर्स वगळून त्यांनी अस्सल फळांपासून तयार कलेल्या आईसक्रिमवर भर दिला. कामत यांना हे नवीन हॉटेल स्थिरस्थावर करायला कष्ट पडले. अनेक यश आणि अपयशाचे प्रसंग पाहिल्यानंतर १९८४ साली कामत यांनी विले पार्ले येथे Natural Ice cream च्या पहिल्या दुकानाचं उद्घाटन केलं. या पहिल्या दुकानात ४ कर्मचारी होते आणि सोबतीला होते कामत यांनी निवडलेले १० आईसक्रिम फ्लेवर्स!!
फळांची निवड करण्याची पद्धत त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केली होती. त्यांचं हे ज्ञान त्यांना आईसक्रिमसाठी फळांची निवड करताना कामी आलं. सोप्या पद्धतीने तयार केलेल्या पण चवीला अफलातून असणाऱ्या या आईसक्रिमने लोकांची माने जिंकली. सुरुवातीच्या काळात आईसक्रिम सोबत पावभाजीही विकली जायची, पण पुढे जाऊन पावभाजी बंद करून केवळ आईसक्रिमवर व्यवसाय चालवला जाऊ लागला. अशा प्रकारे Natural Ice cream हा संपूर्णपणे आईसक्रिम ब्रँड म्हणून समोर आला.
यानंतर Natural Ice cream ची घोडदौड सुरु झाली. Natural Ice cream च्या नावासोबत जोडलेल्या ‘Taste the Original’ या शब्दांना जागत कामत यांनी फळांच्या अस्सल चवीवर जास्त भर दिला. सुरुवातीला जिथे १० फ्लेवर्स होते, त्या जागी आता १२५ फ्लेवर्स आले आहेत. विले पार्लेतील एका दुकानापासून सुरु झालेला व्यवसाय आज १३५ दुकानांपर्यत येऊन ठेपला आहे.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही यशोगाथा प्रयोग करून यशस्वी झालेल्या व्यावसायिकाची आहे. रघुनंदन कामत यांनी आईसक्रिमच्या चाहत्यांना संपूर्णपणे नवीन फ्लेवर्सची ओळख करून दिली. यादीच द्यायची झाली तर आंबा, स्ट्रॉबेरी, काळी द्राक्षेपासून ते मका, चिकू, नारळ, फणस, गाजर, काकडीसारख्या अत्यंत वेगळ्या फ्लेवरपर्यंतच्या आईसक्रिम्स त्यांनी नव्याने बाजारात आणल्या. अशा वेगळ्या फ्लेवर्समुळे Natural Ice cream इतर ब्रँड्सच्या तुलनेत एकदम वेगळं ठरलं. म्हणूनच रघुनंदन कामत म्हणतात की, ‘मला जाहिरातीवर पैसा खर्च करण्याची गरजच पडली नाही. लोकांनीच आमची जाहिरात केली आहे.’
जाहिरातीचा विषय निघाला आहे तर एक घटना नमूद करायला हवी. १९८६ साली सुनील गावस्कर यांचा The Sunny Days कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमामध्ये विविअन रिचर्ड्स म्हणाला की, "मी Natural Ice cream च्या आउटलेटवर गेलो होतो आणि तिथली चिकू आणि सीताफळ आईसक्रिम्स मला प्रचंड आवडली." कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठीच हा क्षण अविस्मरणीय होता.
रघुनंदन कामत आणि त्यांच्या यशाने नवीन प्रयोग करू पाहणाऱ्या व्यवसायिकांना नक्कीच हुरूप येईल. सरधोपट मार्गाने न जाणारेच इतिहास रचतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही यशोगाथा तुम्हाला काही वाटली हे नक्की सांगा.