तामिळनाडूत स्वदेशीचा नारा : बंद होणार पेप्सी आणि कोक विक्री

सद्या तामिळनाडू धुमसत आहे ते बहुचर्चित अशा जलीकट्टू विवादामुळं.  'पेटा' ही  प्राण्यांच्या हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. त्या संस्थेकडून या खेळाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयानं या खेळावर बंदी घातल्यामुळं या निर्णयाविरोधात तामिळनाडूत सर्वत्र निदर्शने चालू आहेत. आता याच आंदोलनातून तिथल्या लोकांनी विदेशी कंपन्यांविरोधात एक वेगळी चळवळ सुरू केली आहे. 

          राज्यातील लोकांकडून विशेषतः तरूण वर्गातून पेप्सी, कोला सारख्या विदेशी सॉफ्ट ड्रिंक्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलीय. आणि यासाठी तामिळनाडू मधल्या प्रमुख व्यापारी संघटनांनीही कंबर कसली आहे. आता येत्या १ मार्च पासून तामिळनाडूत कोक, पेप्सी आणि अशा प्रकारच्या अन्य विदेशी सॉफ्ट ड्रिंक्सची विक्री बंद केली जाईल. 

TNVSP नावाच्या ६००० व्यापारी संघटनांच्या महामंडळाने ही बंदी लागू केलीय. यासाठी त्यांच्याकडून राज्यातील  किरकोळ विक्रेते आणि दूकानदारांना ही उत्पादने न विकण्याबाबत सुचना करण्यात आली आहे. या बंदीमागचं आणखी एक कारण म्हणजे एकीकडे तामिळनाडूत दुष्काळी परिस्थिती असताना या उत्पादनांच्या निर्मितीसाठी नद्यांमधून सतत पाणी उपसलं जातं, ज्याचा फटका राज्यातील शेतकर्‍यांना बसतोय. आणि या कंपन्यांना पाणीही खूप लागतं हो.

             या बंदी बरोबरच राज्यातल्या व्यापार्‍यांकडून पंतजली सारखे स्वदेशी ब्रँड्स आणि नारळ पाणी, बदाम दूध, अशा देशी उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जाईल असं म्हटलं जातंय. थोड्या काळासाठी या निर्णयानं नुकसान होणार असलं तरी भविष्यात हे बरंच फायदेशीर ठरेल यात शंका नाही. त्यामुळं आता पुढच्या वेळी सिनेमा पाहायला गेलेल्या तमिळनाडूवासियांना पॉपकॉर्न आणि कोकऐवजी नारळपाणी आणि बदामदूध मिळेल पाहा..

सबस्क्राईब करा

* indicates required