computer

अखेरचा गोल... खेळाडूंनी मित्राला वाहिलेली श्रद्धांजली पाहून तुमचे डोळेही भरून‌ येतील...

कधीकधी इंटरनेटवर अशा गोष्टी वायरल होतात ज्या आपल्याला अगदी स्तब्ध करून टाकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरतोय, ज्यात फुटबॉल खेळणाऱ्या तरूणांचा समूह आपल्या मृत संघमित्राला अशा आगळ्यावेगळ्या पध्दतीने निरोप देताना दिसत आहे.

अवघ्या ५४ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. त्यात दिसतं एका गोल पोस्टजवळ एक शवपेटी ठेवण्यात आलीय. सभोवती संघातले सर्व सहकारी थांबलेले आहेत. एक तरूण दुसऱ्या तरूणाकडे बॉल पास करतो आणि दुसरा तरूण तो बॉल त्या शवपेटीकडे ढकलतो. बॉल त्या शवपेटीवर आदळून गोल पोस्टमध्ये जातो आणि गोल होतो! खुश झालेला प्रत्येकजण त्या शवपेटीच्या दिशेने धावत जातो आणि तीला कवटाळून रडू लागतो. त्यांच्या सहकाऱ्याने केलेला हा अखेरचा स्कोर होता.

दुहेरी नागरिकत्व असलेला १६ वर्षीय अलेक्झेंडर मार्टिनेझ नावाचा हा तरूण ४ वर्षांआधी अमेरिकेतून मेक्सिकोमध्ये परतला होता. या तरूणाची ओळखीसंदर्भातल्या गैरसमजातून पोलीसांनी गोळ्या घालून हत्त्या केली. त्यानंतर मेक्सिकोमध्ये याचे मोठे पडसाद उमटले, लोकांनी निदर्शनं केली. पण तो ज्या संघातून फुटबॉल खेळायचा, त्या संघ सहकाऱ्यांनी मात्र आपल्या मित्राला ते जिथे नेहमी खेळायचे, त्याच मैदानावर नेऊन त्याला एक अखेरचा गोल करायला देत अशी अनोखी श्रद्धांजली वाहिली.

आजकाल नकारात्मक गोष्टी जिथेतिथे दिसत असताना अशा चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊयात. काय वाटतं तुम्हांला?

सबस्क्राईब करा

* indicates required